Thursday, 10 September 2020

 


जादुगार....


कोण आहेस तू?  जादुगार आहेस का? आणि मनकवडा सुद्धा? तुला कसं कळत मला तुझी गरज आहे. या मोसमात खूप वेळा आलास तू मला भेटायला. पण मी माझ्याच धुंदीत, खरं तर माझ्याच रडगाण्यात मग्न होते. गेले काही महिने मनावर इतकी काजळी साचली होती की सगळं धूसर दिसायला लागल होतं. कळत होतं हे असच राहणार नाही. पण तरी मन मानत नव्हतं.

तसं आज सकाळपासून सुद्धा फार काही छान वाटत नव्हतंच. पण दुपारी एकदम मळभ आलं. तू मला खुणावत होतास खिडकीतून. तसं तू खूप वेळा खुणावलंस. पण मला कळून सुद्धा मी उगाच आपल्या कोशात होते. पण तू पण असा हट्टी आहेस ना... शेवटी माझा मूड बदलवण्यात तू बाजी मारलीस. आज तुला मन भरून पाहिलं. तुझ्या सरींमध्ये मन चिंब भिजवलं. तुझा शीतल शिडकावा एक वेगळा गारवा देऊन गेला. मनाची काहिली थांबली.

काही लोकांना वाटेल हा पहिला पाऊस थोडी आहे.. पण माझ्यासाठी हा पहिला पाऊस ठरलाय. कारण जगात कित्येक गोष्टी आधीपासून अस्तित्वात असतात. पण जेव्हा आपण त्याचा अनुभव घेतो तेव्हा तो आपला पहिला अनुभवच असतो. आज माझं तसं काहीस झालंय. तसा हा अनुभव सुद्धा नवा नव्हता. पण तुझी हीच तर जादू आहे, प्रत्येक वेळी तू  आनंदाची बरसात करतोस.

तुझं येणं किती वादळी, अगदी मला आवडत तसं. सगळं एकदम रानटी. चित्रच बदलून टाकतोस तू. रस्त्यावर अचानक जोरजोरात हॉर्न वाजायला लागतात. लोकांची धावपळ होते. भिजायचं नसत ना म्हणून. का तर म्हणे सर्दी, खोकला होईल. पण तुझ्यामुळे काही होत नाही. असं निदान मला तरी वाटत. कारण मी बऱ्याचदा तुला भेटायचं म्हणून छत्री न घेता बाहेर जाते. तुला खिडकीतून नुसत तासनतास पाहणं हा जबरदस्त अनुभव आहे. त्यापेक्षा जास्त छान आहे तुझ्या सरी अनुभवणं.

मनातलं सगळ अमंगल घालवतोस तू. गाडीला जसं सर्विसिंग लागतं ना तसं आहे तुझं. तू एकदा मस्त बरसून, भिजवून गेलास की मग चांगलं वाटायला आणि घडायला सुरुवात होते. हा पण हे त्यांना जाणवेल जे तुझ्यावर प्रेम करतात.. अगदी मी करते तितकं. हे प्रेम जरा वेगळ आहे. तू फक्त देतोस रे, काही नको असत तुला. रुसलेल्या प्रेयसीला जसं मनवतात ना तसं करतोस तू.  आधी मेघ गर्जना, मग झोंबणारा वारा, दार खिडक्या आपटतील इतका कांगावा हे सगळं work करत नाही असं कळल की धाडधाड कोसळतोस, इतका की मनातला राग कुठच्या कुठे पळून जातो. आणि तू बरसून गेल्यावर तर काय बोलणार बाबा? विकेट उडते. काय सुंदर वातावरण होतं. लबाड तर इतका आहेस ना, बरसून गेल्यानंतर इतका शांतपणे बघत असतोस आणि भासवतोस की जसं काही झालचं नव्हतं.

पण तुला काय माहित, तू काय देऊन जातोस ते. प्रेम, वात्सल्य, चैतन्य, आशा, उमेद अशा सगळ्या भावना तुझ्या येण्याने येतात. आपलं तर नातच वेगळं आहे. तुला thanks तरी कशी म्हणू... कारण तू काही कोणी परका नाहीस. मला हवं असताना किंवा नको असताना तुझं हे येणं आणि माझा मूड एकदम ओके करणं हे मात्र असच ठेव हं....

Wednesday, 25 March 2020



नवा संकल्प ......



गेलं वर्षभर किती कोसळलास. सगळे अगदी वैतागले इतका. पण मी तुझ्याकडे लक्ष दिलं नाही. मी माझ्यातच मशगुल. खर सांगू का रे, तस सुद्धा नव्हत. मी माझ्यात मशगुल नव्हते. मी माझ्यातच नव्हते. कुठे होते? शोधते आहे स्वत:ला. माझं आणि तुझं नात फक्त मला आणि तुलाच माहिती आहे. मला ते तसच हवंय. या वर्षी वारंवार तू आलास रे. पण मी ? काय चालू होतं माझं? जगरहाटी प्रमाणे सगळ काही चालू होत. पण जगण्यातला अस्सलपणा तो कुठे तरी हरवला होता.

मी जरा विचित्र आणि हट्टी आहे. माझ्या मनातला कचरा साफ करण्यासाठी तू किती प्रयत्न केलेस. त्या पायी सगळ्यांच्या शिव्या सुद्धा खाल्ल्यास. आज सुद्धा खाणार आहेस. पण माझ्या विचित्र वागण्याने मला तुझा इशारा कळलाच नाही. माणसांमध्ये अडकलेल्या खोट्या कल्पना विश्वात मी इतकी रममाण झाले की आपल्यामध्ये असलेल्या अव्यक्त नात्याचा मला विसर पडला. पण एक गोष्ट सांगते हा तुला, मी हे मुद्दाम नाही केलं. दिवस कुठे उजाडला आणि कुठे मावळला कळत नव्हत. सोबत होत एक बोजड ओझं. वाकून आणि दमून गेले. गेल्या काही दिवसांमध्ये मला हे प्रकर्षाने जाणवलं आहे की, मी खूप दुखावलं आहे तुला आणि स्वत:ला. न सुटणारी कोडी सोडवत बसले आणि उगाच कष्टी होत राहिले.

आज  तू पुन्हा आलास. अगदी अवेळी. पुन्हा सगळ्यांच्या शिव्या खायला. एक भयानक विषाणू धुमाकूळ घालतो आहे आणि त्यात तू आलास. सगळे म्हणतात तू हा आजार अजून वाढवणार. पण अगदी खर सांगू, मला नाही वाटत तस. कारण साचलेलं सगळं वाहून नेण्यासाठी येतोस तू. आत्ता सुद्धा तू तसच कर. माझ्या मनातील विचारांचा सुगावा तुला कसा लागती माहिती नाही. पण आज एक वेगळाच सूर मनात उमलला आहे. त्याचं सुरेल गाणं करायचय मला. माझ्यात दडलेल्या मला शोधून काढायचं आहे. अर्थात हे श्रेय तुला. ज्याच्याकडे हरण्यासारखं काहीच नसते तो जिंकतो. तू असच सांगतोस न मला नेहमी? आपल्या आनंदाचा रिमोट दुसऱ्याच्या हातात देऊ नकोस. तू नेहमी सांगतोस मला. संवाद माझ्याकडून कमी झाला. तो वाढवण्यासाठी आज तू आलास. कोणताही अहंकार न बाळगता. नाही तर अहंकारी लोकांचाच पसारा आहे रे सगळा. मध्यंतरी मला कोणी तरी म्हणल, तू डोक्याने विचार करू लागलीस. तुझा तो वेडेपणा कुठे गेला?  ठेहेराव हवाय अस सुद्धा कोणी तरी म्हणल. सगळं संपल आहे असं वाटतं तेव्हा’ नव्याने फुलवणारा जादुगार आहेस तू. तापलेल्या धरणीला शांत करणारा सखा आहेस तू. वठलेल्या वृक्षांना नवी पालवी फुलवणारा आहेस तू.  तुझ्या संगतीचा इतका परिणाम व्हायला हरकत नाही, नाही का?  

आज प्रकर्षानी जाणवलं ... नव्या वर्षी नवा संकल्प...  मस्त असत वेडेपण, स्वस्त असत वेडेपण...



Saturday, 7 March 2020


मी माझी...


उद्या जागतिक महिला दिन आहे. तिच्याविषयी बऱ्याच गोष्टी बोलल्या जातील, लिहिल्या जातील, तिच्याविषयी गौरवोद्गार काढले जातील. म्हणजे हे सगळं व्हायला हवंच. पण मुळात स्त्रीला, तिच्या मनाला नेमकेपणाने कोणी समजू शकलं आहे का? अगदी स्वत: ती तरी ओळखते आहे का स्वत:ला?
मला वाटत जागतिक महिला दिनी प्रत्येकीनी स्वत:चा शोध घ्यायला सुरुवात करायला हवी. नाव, आडनाव, पैसा, करिअर यापलीकडे जी आहे तिला शोधायला हवं.  स्वत:च्या गुणांचा, ताकदीचा स्वत:च्या आनंदासाठी उपयोग करायला हवा. छोट्या छोट्या गोष्टीत स्वत:ला दु:खी करणं थांबवायला हवं. उलट लहान लहान गोष्टींमध्ये स्वत:चा आनंद शोधायला हवा. मला स्वत:ला माझ्या व्यतिरिक्त कोणीही सुखी किंवा दु:खी करू शकत नाही; ही खुणगाठ मनाशी बांधायला हवी. स्त्री स्त्रीची शत्रू असते हे वाक्य बदलणं आपल्या हातात आहे. एकमेकींना समजून घ्यायला हवं. आपणच एकमेकींना समजून घेतलं नाही तर पुरुष वर्गाकडून ही अपेक्षा करणं चूक आहे. ट्रेनमध्ये लेडीज डब्यापेक्षा जनरल डब्यात लगेच जागा करून दिली जाते किंवा समजून घेतलं जातं, अशी वाक्य थांबवणं आपल्या हातात आहे. संवेदनशीलता हा दागिना हौसेनी मिरवता येणं खूप आवश्यक आहे. मला कोणीही दुखावलं तरी माझ्या डोळ्यात टचकन पाणी येतं म्हणजे संवेदनशील असणं  ही चुकीची धारणा मनातून काढून टाकून, सहसंवेदना जपणारी मी संवेदनशील असं समीकरण जमलं पाहिजे.  असं म्हणतात की, “जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे” मग आपण एकमेकींना किती कळलो आहे हे समजून घ्यायला हवं. असं वाटत की, स्त्रीनी स्त्रीला समजून घेतलं तर पुरुषाला स्त्रियांना समजून घेणंसुद्धा सोपं जाईल.  मुळात कोणी आपल्याला समजून घ्यावं यापेक्षा मी मला समजून घेणं जास्त गरजेचं आहे. माझ्यात असलेल्या गुण दोषांसहित मी मला स्वीकारलं की एक वेगळा आनंददायी प्रवास सुरु होईल. प्रत्येकीनी असं शोध सुरु केला की तेजस्विनीच्या कवितेप्रमाणे जाणवेल....  
खुशाल ती ही खुशाल आता, तिच्या नशेला रुबाब आहे.
तिला बिचारी करेल जो ही, तिचा तयाला नकार आहे.    

Friday, 1 November 2019


आपल्या अस्तित्वाचं महत्त्व...




हारणं कोणाला आवडतं? तुम्ही म्हणाल काय हा प्रश्न? जिंकायलाच आवडतं सगळ्यांना पण काल एक दुर्दैवी घटना घडली. I will win, not immediately, but definitely असं  माझी लाडकी मैत्रीण निशा कायम म्हणायची. पण दुसऱ्यांना जिंकणं शिकवणारी निशा स्वत:च्या भावनांवर विजय मिळवू शकली नाही. निशाच्या जाण्यानी मन सुन्न झालंय. हजारो प्रश्न मनात निर्माण करून निशा गेली. या प्रश्नांची उत्तरं कोण देणार आता?
निशानी आत्महत्या केली या घटनेमुळे माणसाचं मानसिक आरोग्य किती महत्त्वाचं आहे हे पुन्हा एकदा कळलं. एरवी खंबीर, निर्भीड आणि कणखर वाटणारी निशा इतका टोकाचा निर्णय घेऊ शकते यावर विश्वास बसला नाही. निशा गेलीय, काहीही केलं आणि कितीही रडले तरी ती परत येऊ शकणार नाही. पण अजून अशा कितीतरी "निशा" मृत्युच्या दरीत लोटल्या जाऊ नयेत यासाठी प्रयत्न करायला हवेत. कारण अतिशय प्रगल्भ अशी निशा जर असं वागू शकते तर मनानी कमकुवत मैत्रिणींची काळजी वाटायला लागते. अगदी स्वत:ची सुद्धा...
अशा व्यक्ती जाणं फक्त त्यांच्या कुटुंबाच्या नाही तर समाजाच्या दृष्टीनी हानिकारक आहे. अशा घटना घडू नयेत म्हणून काय केलं पाहिजे मग? कारण निराशेचे क्षण सगळ्यांच्या आयुष्यात येणार आहेतच. घटना, परिस्थिती किंवा आपल्या जवळची वाटणारी माणसं आपण खोल गर्तेत जाण्याला कारणीभूत होऊ शकतात. त्यावेळी स्वत:ला महत्त्व देणं विसरून असे प्रकार घडू शकतात. अगदी शहाणी, शिकली सवरलेली माणस असं वागू शकतात. मनात दु:ख दाबून आनंदी राहण्याचा आभास निर्माण करणाऱ्या माणसांच्या बाबतीत अशा घटना अनाकलनीय होऊन बसतात. त्या त्या वेळी मनानी जगणं नाकारणं हे कसं घडतं माहित नाही. पण हा निर्णय अचानक झालेला नसतो. प्रोसेस असते ती. एखादी अशी घटना घडते आणि मग मृत्यूच जवळचा वाटतो. खरं म्हणजे तिने लढायला हवं होतं. जीव काही इतका वर आलाय का? या आणि अशा बऱ्याच प्रतिक्रिया अगदी बरोबरच आहेत. पण स्वत:चं जगणं नाकारण्याइतकी निराशा किती भयंकर असेल. आपल्यानंतर आपल्यावर अवलंबून असणाऱ्या लोकांच आपण सुरु केलेल्या कामाचं काय होईल हा विचार सुद्धा मनाला शिवत नसेल का? हो... नसेल शिवत हा विचार. कारण मी जाण्यानी सगळे प्रश्न सुटतील असं वाटू लागत असेल. अशा वेळी मन आणि बुद्धी असे दोन भाग न राहता, एक विचित्र गारुड मनावर राज्य करत असेल.   
पण एक नक्की, या भयानक विचारांवर मात करता आली पाहिजे. अगदी बेसिक म्हणजे आपलं स्वत्व हरवू देता काम नये. आपल्या स्वत:पेक्षा अशी कोणतीही व्यक्ती महत्त्वाची नसायला हवी. कारण ज्या व्यक्तीसाठी आपण स्वत:ला संपवण्याचा विचार करतो तिला खरच काही फरक पडणार आहे का? ज्या घटनेमुळे आपण असा निर्णय घेतला त्या घटनेत आपल्या जाण्याने आपल्याला अपेक्षित बदल घडणार आहे का? हे आणि असे अनेक प्रश्न स्वत:ला विचारण्याचं भान कोणत्याही परिस्थितीत शाबूत राहायलाच हवं. स्वत:वर प्रेम केलं पाहिजे आधी, तर दुसऱ्यावर प्रेम करता येईल. आत्मकेंद्री असणं आणि स्वत:वर प्रेम करणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हं. पण बऱ्याचदा बाह्य गोष्टींना आपण इतकं महत्त्व देतो की त्यापुढे आपलं अस्तित्व लक्षातच घेत नाही. एक मात्र प्रकर्षाने जाणवलं, मनानी खंबीर किंवा हळव असं काहीही अशा प्रसंगात उपयोगी पडत नाही. अशा वेळी उपयोगी पडणार आहे ते म्हणजे आपल्या अस्तित्वाचं आपल्याला उमजलेलं महत्त्व. आपलं चांगलं किंवा वाईट दुसऱ्या कोणामुळे होत नाही. त्याला आपणच जबाबदार असतो. त्यामुळे आयुष्याची बिघडलेली चव दुरुस्त करण्याची जबाबदारी आपली आहे. पदार्थ फेकून देणं हा पर्याय योग्य नाही. कारण उत्तर नाही असा एकही प्रश्न या जगात नाही.  
                                                                                                                    डॉ. विनया केसकर 

Monday, 7 October 2019


 स्वीकारुनी आनंदावे .....


कोणतीही गोष्ट स्वीकारणं हा मुख्य मुद्दा असतो. मग ते परिस्थिती असो किंवा माणूस. एकदा ते स्वीकारलं की मग येणाऱ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपण स्वत:ला तयार करतो. बऱ्याचदा असं वाटत की मी सगळ स्वीकारलं आहे. पण खरच तसं नसत. खूप वेळा आपण म्हणतो बघा, “आलीया भोगासी असावे सादर”. मी त्यापुढे अजून एक गोष्ट नेहमी म्हणते, करू नये कुरकुर विनू म्हणे.... विनोदाचा भाग सोडला तर व्यक्ती, परिस्थिती किंवा भावना मनापासून स्वीकारली तर ताण कमी व्हायला मदत होते. निदान मी माझ्याशी प्रामाणिक आहे ही भावना आनंद देऊ जाते.
म्हणणं किती सोप आहे नाही का? परिस्थिती कोणती असावी हे खरच आपल्या हातात असत का? ती परिस्थिती आल्यावर आपण ती स्वीकारतो कशी यावर बरचसं अवलंबून असत. आर्थिक उतार चढाव, मानसिक आंदोलनं, माणसं आपल्याशी कसं वागतात, गैरसमज, मनाविरुद्ध होणाऱ्या गोष्टी हे सगळं आपल्या हातात नसतं. आपल्या हातात असतं ते म्हणजे स्वीकारणं.
मी आत्ता दु:खी आहे हे स्वीकारलं की मग त्या परिस्थितीमधून बाहेर कसं पडायचं यावर मन उपाय शोधू शकतं. पण बऱ्याचदा आपण दु:खी आहे असं न स्वीकारता आनंदी राहण्याचं नाटक करतो. अर्थात प्रत्येकाचा व्यक्त होण्याचा पैटर्न वेगळा असूच शकतो. नका सांगू सगळ्या जगाला. पण निदान आपल्या मनाशी कबुल करून ते स्वीकारणं इतकं तरी करतो का आपण?  दु:ख या एका भावनेबद्दल बोलले मी. पण भावना या एका शब्दांत काय काय सामावलंय बघा...भूक, तहान, आनंद, राग, द्वेष, इर्षा, हाव, सोबतीची भूक, भीती, रडणे, हसणे, रुसणे, काहीही करू नये असे वाटणे, भटकायची इच्छा, झोप, कंटाळा... बापरे ही यादी संपतच नाहीये. दिवसभरात अशा कितीतरी भावना आपल्या मनात येत असतात. त्या स्वीकारणं हे पहिलं महत्त्वाचं काम आहे. बराचसा ताण यामुळे कमी होतो. स्वीकारलं की पुढे कृती सोपी होते. भावना कोणतीही असो, आधी ती स्वीकारावी. मनाला उगाच दामटू नये. मनाला दामटलं की मनाविरुद्ध कृती करण्यात यश मिळू शकतं पण आतून वाटणारं समाधान मिळत नाही. मग का आटापिटा करायचा? शक्य असतील त्या भावना व्यक्त करून, अनुभवून मोकळं व्हावं. भावनांची घागर एका मोठ्या पात्रात रिती करून पुन्हा नव्याने घागर भरायला ठेवावी. कारण आपल्याला कितीही वाटलं तरी भावनांचा प्रवाह थांबत नाही.
सगळं आपल्या मनासारखं कधीही घडू शकत नाही हे स्वीकारायला हवं. माझ्याच बाबतीत असं का? हा प्रश्नच पडायला नको. कारण जेव्हा आपल्या आयुष्यात आनंदाचे क्षण येतात तेव्हा आपण म्हणतो का? माझ्याच बाबतीत असं का? प्रेम, आदर आणि ओलावा या गोष्टी नको असं कोणी आहे का या जगात? पण आपला हट्ट असतो हे आपल्याला हव्या असणाऱ्या व्यक्तीकडून मिळावं.  या सगळ्या गोष्टी मला मिळालेल्या आहेत किंवा मिळू शकतील पण मला हव्या तशा आणि हव्या त्या व्यक्तीकडून नाही एकदा हे स्वीकारलं ना की माझ्याच बाबतीत असं का? हा प्रश्न पडत नाही.
स्वीकारा रे स्वत:ला आहात तसे... कोणाला काय वाटतं याकडे नको लक्ष द्यायला. कारण इथे प्रत्येकाचं दुखणं वेगळं आणि अपेक्षा वेगळ्या. दुसऱ्या कोणामुळे आपण आनंदी किंवा दु:खी होण्याची गरज नाही. असलेल्या परिस्थितीचा स्वत:ला त्रास करून न घेणं आणि आहे ते मोकळ्या मनानी स्वीकारणं ही स्वत:वर प्रेम करण्याची पहिली पायरी आहे. करूया का स्वत:वर सुद्धा प्रेम?
साहिरची ही कविता "स्वीकारार्हता" ही भावना मस्त व्यक्त करते..

मैं ज़िंदगी का साथ निभाता चला गया
हर फ़िक्र को धुएँ में उड़ाता चला गया
जो मिल गया उसी को मुक़द्दर समझ लिया
जो खो गया मैं उसको भूलता चला गया
हर फ़िक्र को धुएँ में उड़ा...
                                                                                                                                  डॉ. विनया केसकर 

Monday, 22 July 2019


समजून घेणे ....


परवा डोळ्यात अंजन घालणारा एक प्रसंग घडला. जेवणाच्या सुट्टीमध्ये आम्ही ऑफिसमधल्या मैत्रिणी नेहमी प्रमाणे ऑफिस जवळ असणाऱ्या एका छोट्या हॉटेलमध्ये गेलो. आमचे डबे आम्ही नेतोच. पण तरी ऑफिस मध्येच बसून खाण्याचा कंटाळा येतो. आपलाच डबा खायचा असतो तर आम्ही तिथे का जातो? हे कोडं आम्हालाही कळत नाही. तो मुद्दा जाऊदे... मला तुम्हाला वेगळच सांगायचं आहे. आम्ही आत डबा खात असताना त्या हॉटेलच्या बाहेर आजी बाहेर बसली होती. आजकाल स्टेशन, चौक, रस्त्याच्या कडेला बऱ्याचदा अशी मंडळी दिसतात. काही वेळा उगाच असं वाटत, सगळेच पैसे मागतात. काही वेळा एखाद्या व्यक्तीला पैसे देणं शक्य आहे, पण सगळ्यांना पैसे देणं शक्य नाही. खूप वेळा असं सुद्धा मनात येतं, धडधाकट आहेत, मग काम का करत नाहीत. त्या आजीला हॉटेल बाहेर बघितल्या पासून हे सगळे विचार मनात आले.
डबा खात असताना सुद्धा तिचा आवाज सारखा कानावर पडत होता. तिला चहा हवा होता.  पण नेमका त्या वेळी चहा नव्हता. माझ्या डब्यात एक पोळी जास्त होती. अर्थात जास्त होती आणि मला नको होती म्हणून मला असं वाटलं की, आजीला द्यावी. माझ्या मैत्रिणीनी तिला बाहेर जाऊन विचारलं, “आजी , चपाती हवीय का?” तर ती आजी “नाही” म्हणाली. आम्हाला थोडा राग आला. असं वाटलं, काय हे? चांगली ताजी चपाती देतोय तर नाही म्हणतीय. नेहमी जसे नकारात्मक विचार मनात येतात तसे आमच्या देखील आले. अन्न दिलं तर नकोय, पैसे हवेत असे शेरे सुद्धा मनात मारले गेले. बाहेर आल्यावर मी त्या आजींना म्हणलं, “का हो आजी, ताजी चपाती देत होते तर का नाही घेतली?” आजींनी दिलेल्या उत्तराने मी पुरती ओशाळले. त्या म्हणाल्या, “अगं पोरी, तुम्ही दिवसभर काम करता. डबा खायला एकदाच मिळतो न्हव का. त्यातून तुझ्या डब्यातली चपाती घ्यायची म्हणजे तू अर्धवट जेवनार. म्हनून नको म्हनल.” आजी या कारणासाठी पोळी घेत नसतील याचा विचार सुद्धा मनात आला नव्हता.
नंतर मनात आलं, बऱ्याचदा समोरच्या व्यक्तीला नीट समजून घेण्यात आपण कमी पडतो नाही? शिक्के मारण्याची ही सवय कमी करत करत जायला हवी. खूप विचार करणारे सुद्धा कधी कधी असे Judgmental वागतात. समजून घेणे आणि मग मत बनवणे हे कायम करता आलं पाहिजे. या प्रसंगांनी डोळ्यात अंजन घातलं. खर तर माझा स्वभाव समजून घेण्याचा आहे. पण काही वेळा सुद्धा असं Judgmental वागणं योग्य नाही. असं आपण किती वेळा म्हणतो की मला आता maturity आलीय. पण मोठ्या गोष्टी समजून घेणे याला maturity म्हणत नाहीत तर छोट्या गोष्टी समजून घेणे म्हणजे maturity.
                                                                                                                            डॉ. विनया केसकर 

Friday, 8 March 2019


वैचारिक समानता.....

महिला दिनानिमित्त काही तरी लिहावं असं वाटत असतानाच एक विचार मनात आला. महिलेमध्ये पुरुषाचे काही गुण असतात, तर पुरुषांमध्ये महिलांचे. उदाहरण द्यायचं झालं तर, एकटी स्त्री अगदी पुरुषाप्रमाणे आपल्या संसाराचा डोलारा खंबीरपणे सांभाळते. तसच पुरुषांमध्ये महिलेचा भावनिक ओलावा असतोच की. ही दोन्ही उदाहरणं सार्वत्रिक नाहीत. काही वेळा असं सुद्धा बघायला मिळत.
मला नेहमी असं वाटत स्त्री आणि पुरुष असा भेद करून त्याच त्याच गोष्टी उगाळून काय मिळणार आहे? कोणीही अति केलं की त्याची माती होणार आहे. मला हे मान्य आहे की स्त्रियांवर तुलनेनी प्रमाणाबाहेर अन्याय झाला आहे, होतोय... पण हळू हळू चित्र बदलतंय. स्त्री किंवा पुरुष असा भेद न करता एक माणूस म्हणून बघायला हवं. कारण कित्येक वेळा पुरुषांमध्ये सुद्धा मातृत्वाची झलक दिसते. ज्ञानेश्वर महाराजांना आपण माउली म्हणतो. शिवाजी राजेंसारखा राजा स्त्री ला सन्मानाने वागवत होता.  राणी लक्ष्मीबाईंनी पतीच्या निधनानंतर आपल्या प्रजेचं रक्षण करण्यासाठी प्राणांच बलिदान केलं. सावित्रीबाई फुलेंनी ज्योतीबांच्या नंतर सुद्धा आपला वसा पूर्ण केला. खर तर समानता विचारांमध्ये यायला हवी. ओरबाडून हक्क मिळू शकतात. पण मनातून आदर, सन्मान असायला हवा. नुसतं gender equality हवी असं म्हणून काय होणार? आधी माणूस म्हणून एका व्यासपीठावर येण्याची दोघांचीही तयारी आहे का? याचा विचार दोघांनी करण्याची गरज आहे. कोणा एकामुळे गाडी पुढे जाणार नाही. एकमेकांना एकमेकांच्या साथीने पुढे जाण्याची इच्छा हवी. पूर्वी झालेल्या त्रासाचा वचपा काढत बसून तरी समाधान मिळणार आहे का? त्यापेक्षा पुढच्या पिढ्यांमध्ये वैचारिक समानता येऊन, एकमेकांवर असलेलं अवलंबित्व मान्य करून, पुढे जाता येईल का?   
                                                    डॉ. विनया केसकर