Thursday, 7 March 2019


सावर रे....

कित्येकदा असं होतं की काही केल्या मनाला सांभाळणं, सावरणं जमत नाही. हे सावरणं आपण आपल करायचं असतं हे कळत असतं. स्वभान, स्वओळख झालेली so called आधुनिक स्त्री असून सुद्धा बऱ्याचदा हे जमत नाही. वास्तवाचं भान येऊनही आलेली उदासी, प्रश्न कोणी तरी सोडवावा असं उगाच वाटतं. खर तर हे सुद्धा माहिती असतं की ही उदासी आपण स्वत:च दूर करू शकतो. पण अवलंबून राहायला छान वाटत काही वेळा. इथेच खरा प्रश्न येतो. कारण एरवी आपले आपण प्रश्न हाताळणारी जेव्हा अवलंबून राहते तेव्हा साहजिक अपेक्षा वाढतात. अपेक्षा हे सगळ्या दुखा:चं मूळ आहे.
गोष्ट अगदी साधी असते. पण या अपेक्षांमुळे गुरफटून जातो आपण. काही वेळा तर नेमकं काय चुकलंय, काय बिनसलंय हेच कळत नाही. सांगता येत नाही आणि सहन होत नाही असं काहीसं. खूप वेळा वाटतं शरीराला पडलेले कष्ट परवडतात. पण मनाला झालेले कष्ट कोणत्या विश्रांतीनी दूर होतील ते समजत नाही.
संदीप खरे ची ती कविता आठवते, कशी ही अवस्था? कुणाला पुसावे? कुणी उत्तरावे? मन आतून म्हणत, सावर रे... आणि मग मनाचं ऐकून सादाला प्रतिसाद म्हणून म्हणावसं वाटतं... हो, मी च बदलू शकेन ही मनस्थिती. कारण जेव्हा हे पटत की, आत्ताच्या स्थितीला, व्यक्तीला, परिस्थितीला दोष देऊन प्रश्न सुटणार नाही. तेव्हा मनातून पुन्हा आवाज येतो... सावर रे, तुझी तूच सावर. होईल त्रास, वाढेल त्रास, पडशील, धडपडशील, पण ते असेल पुन्हा उठण्यासाठी आणि स्वत: सिद्ध होऊन आधार देण्यासाठी... कोणीतरी माझ्यातला खंबीर मी ला सावर रे हे म्हणावं यासाठी....     

Wednesday, 16 January 2019


नव्या वर्षात करूया काही अवघड गोष्टी ....


नवीन वर्ष सुरु झालं... बरेच दिवसात मनापासून काही लिहाव असं वाटत नव्हत. शिवानी दीदींचा एक व्हिडीओ पहिला आणि एक मस्त विचार मिळाला. त्या म्हणाल्या, “आपण दही लावताना जुन्या, आंबट आणि खराब झालेल्या दह्याचं विरजण लावत नाही. तर नवीन दही सुद्धा खराब होऊ शकत. तसच मागील वर्षातील आंबट, कडू आठवणी मनात ठेवून नवीन वर्ष सुरु करू नका. पूणर्पणे नव्यानी वर्ष सुरु करा.” एकदम भारी विचार.
कितीही नाही म्हणल तरी आपल्या मनात अशा नकोशा आठवणी असतातच आणि आपण त्या आठवणी पुढच्या वर्षात carry forward करतोच.
पूणर्पणे नव्यानी वर्ष सुरु करा  हे म्हणणं सोपं आहे पण प्रत्यक्षात असं वागणं शक्य आहे का? जुन्या आठवणी पाठ सोडत नाहीत आणि त्या नकोशा देखील वाटतात. त्या आठवणी विसरून त्या त्या व्यक्तींशी पुन्हा नॉर्मल वागणं इतकं सोप नाही. कारण आपण सामान्य माणस आहोत. राग येण, तो मनात राहणं स्वाभाविक आहे. पण या सामान्य वाटणाऱ्या भावना मनाला खूप त्रास देतात.
त्या व्यक्तीला माफ करण शक्य नसेल तर निदान द्वेष थांबवता येईल का? कारण कोणतीही व्यक्ती कायम तशीच नसते. परिस्थिती प्रमाणे माणसात बदल होतो. या निमित्ताने अजून एक मस्त विचार मिळाला, ठराविक लोक आपल्या अपेक्षेप्रमाणे वागले नाही की respect करत नाहीत असंं वाटतंं. आपला acceptance कमी होतो. कारण हे डोक्यात जाऊन बसतं की ही व्यक्ती माझ्या अपेक्षे प्रमाणे वागत नाहीये. आपल्या मनाप्रमाणे वागले की respect. मन कमजोर असल की अहंकार असतो.  आणि आत्मसन्मान कमी होतो. ती व्यक्ती लवकर डिस्टर्ब होते. संवेदनशील असणं वेगळं, जी व्यक्ती संवेदनशील असते ती लगेच hurt होते आणि react होते, असं आजकाल बोलल जात. पण मनाची स्थिरता लवकर हलते त्यामुळे असं घडतं. जेव्हा दुसऱ्याच्या वागण्यावर माझा आनंद अवलंबून असतो, तिथेच तर प्रोब्लेम्स सुरु होतात.  कारण माझा आनंद मी माझ्यात मिळवू शकत नाही. त्यामुळे आपण  दु:खी होतो. आपला मान आणि अपमान आपण ठरवायचा. आत्म्याची ताकद वाढली की आत्मविश्वास वाढतो आणि आत्मसन्मान वाढतो.  माणसाच्या आयुष्यात सहन न होणारी दु:ख फार कमी असतात. बाकी सगळे प्रश्न आपण ओढवून घेतो. रोजच्या गोष्टीनी आपण लगेच चिडतो आणि त्याला मोठ करतो, दु:खी होतो. आपण आपला आनंद टिकवण्यासाठी आपलं मन आनंदी ठेवायचं आणि एखादी अशी व्यक्ती अआपल्या सहवासात आली जिचं मन कमजोर आहे आणि त्यामुळे ती रागवते, चिडचिड करते असं लक्षात आलं तर त्रास करून घ्यायचा नाही. कारण आपला आनंद आपल्यावर अवलंबून आहे. म्हणजे बघा किती सोप्पंं, आपल्याला राग आला तर आपलं मन कमजोर आहे आणि समोरच्याला राग आला तर त्याचं मन कमजोर आहे. या दोन्ही केसमध्ये चूक कोणाचीही नसल्यानी आनंद कमी होण्याची गरज नाही...
मला माहितीय, अवघड आहे हे, पण अवघड गोष्टी करण्यातच खरी मज्जा आहे. क्यो की, बेटा, तेरी ख़ुशी तुझमेही छुपी हुई है.....   
                                                                                                                             डॉ. विनया केसकर 

Thursday, 22 November 2018


संपल भांडण......



सुरेश वाडकरांची एक खूप छान गझल आज ऐकली,
सीने में जलन, आँखों में तूफ़ान सा क्यों है
इस शहर में हर शख्स परेशान सा क्यों है.....
क्या कोई नयी बात नज़र आती है हममें
आईना हमें देख के हैरान सा क्यों है
मन हेलावून टाकतील असे सुन्दर शब्द आहेत हे. आपण सगळे या Phase मधून जात असतो. कधी कधी सगळं बरोबर चालू आहे असं वाटत असताना एक वेगळीच बेचैनी येते मनात. आणि जेव्हा मन बेचैन होतं तेव्हा सगळ बिघडून जात. वर वर सगळ अलबेल आहे असं वाटत असतं पण रोज एक काही तरी असं घडतं ज्यामुळे सगळं नकोसं होतं. मन पुन्हा उभारी घेतं.
आपलं आपलं असं वाटणार जर काहीच आपलं नाही, मग ते रोज नव्यानी आपलं का वाटतं? मन मोकळ करावं अशी जागा काल्पनिक असावी का? म्हणजे काय चूक आणि काय बरोबर याचं पुन्हा पुन्हा विच्छेदन होणार नाही. कारण झालेल्या चुका आपणच केलेल्या असल्या तरी सतत तुझं हे चुकलच हे ऐकायचा कंटाळा येतो. चुकल ना सांगितलं, कबूल केलं, झालेल्या चुकांची आठवण का द्यायची असते सतत? आणि बाहेरच्या लोकांकडून अपेक्षाच नाही. ज्यांना आपलं समजतो त्यांनीही समजून घेऊ नये असं का?
माझ्या सारख्या स्वभावाची माणस जितक्या लवकर अगदी क्षुल्लक कारणांनी आनंदी होतात, तितकीची फालतू कारणांनी कोशात जातात. हक्काच्या आणि आपल्या वाटणाऱ्या लोकांसोबत भांडतात, तितकच प्रेम करतात. समोरच्या माणसाला समजून घेण्याचा प्रयत्न करतात आणि अशी अपेक्षा ठेवतात की त्यांनी ही समजून घ्यावं. मग कधी तरी समजूतदारपणा हा आपला दोष ठरावा अशी तोंडावर पडतात. Extreme हा शब्द आम्हाला एकदम सूट होतो. म्हणूनच ज्यांच्यावर सर्वात जास्त जीव लावलेला असतो त्यांच्याकडून जास्त अपेक्षा ठेवतात. पण इथे प्रत्येकाला स्वत:च पडलेलं असतं. सगळ्यांना आपल्या वागण्याची Clean chit हवी असते. “मी असं बोलले किंवा बोललो पण मला असं म्हणायचं नव्हत असे dialogue ऐकवले जातात.” मग वाटत का करायचं भांडण, ते ही अशा लोकांशी ज्यांना Clean chit हवी आहे. ठीक आहे ... दिली..... नाही चुकलं तुमच काही, माझच चुकल.... संपल भांडण......

                                                                                                                           डॉ. विनया केसकर 

Wednesday, 12 September 2018


युगायुगांचे नाते आपुले नको दुरावा.....



प्रेमाची गरज नाही असा जीव पृथ्वी वर असणं जरा दुर्मिळच नाही? पण तरी आपण म्हणजे समाज प्रेमाला विरोध करतोच. स्वधर्मीय, स्वजातीय प्रेम चालतं. लग्नाआधी केलेलं प्रेम allowed आहे. आजही प्रेम करण्यासाठी जात, धर्म, पंथ, वय, single असणं आणि gender याचा विचार केला जातोच. जग खूप पुढे गेलंय असं आपण म्हणतो. काही बाबतीत हे मान्य करता येईलही. पण आजही समाजात प्रेम या सहज सुंदर भावनेवर खूप बंधन आहेत. निरपेक्ष, जीवापाड प्रेम हे शब्द पुस्तकात वाचायला छान वाटतात. प्रत्यक्षात असं फार दुर्मिळ झालंय.
एरवी प्रेमावर भरभरून लिहिणारी मी आज अक्षरशः स्तब्ध झाले. खऱ्या प्रेमाची एक खूप छान आणि खरी गोष्ट वाचली. शर्मिला या माझ्या पत्रकार मैत्रिणीनी एक लेख share केला होता, माधुरी सरोदे आणि जय शर्मा यांच्या प्रेम कहाणीचा. तुम्ही म्हणाल त्यात काय मग इतकं स्तब्ध होण्यासारखं? normal प्रेम कहाणीपेक्षा एक वेगळी गोष्ट या दोघांच्या बाबतीत आहे. माधुरी तृतीयपंथी आहे. Transgender, TG, तृतीयपंथी हे सगळं सिनेमात आणि फार तर ट्रेनमध्ये प्रवास करताना आपण पाहतो. आपल्यापैकी किती लोकांना या सगळ्यांच्या भावना, मन आणि जीवन माहिती असतं... घरातल्या आणि अगदी जवळच्या मित्र मैत्रिणींना समजून घ्यायला आपल्याला वेळ नाही, इच्छा नाही. असं एक वेगळ जीवन जगणाऱ्या लोकांशी आपला काय संबंध? संधी मिळेल तेव्हा टिंगल करण्याशिवाय, घाबरण्याशिवाय आणि विचित्रपणे बघण्याशिवाय काय करतो आपण? जाती-धर्मा बद्दल बोलताना आपण बोलतो, आपण सगळे ईश्वराची लेकरं आहोत. मग हे TG त्याचीच लेकरं आहेत ना?
माधुरी आणि जय यांनी आपल्या आगळ्या वेगळ्या प्रेम कहाणीला सत्यात उतरवलं. अगदी normal लग्न होतात तस त्याचं लग्न झालं. आंतरजातीय विवाह केला तर त्याचे पडसाद किती तरी काळ भोगावे लागतात. मग या जोडप्याला समाजाचा किती विरोध पत्करावा लागला असेल. TG सोबत live in मध्ये राहणं किंवा वासना पूर्ण करण्यासाठी त्यांचा वापर करणं हे अगदी common आहे. पण TG वर मनापासून प्रेम करणं आणि ते निभावणं हे किती वेगळ आहे. आपल्यावर प्रचंड प्रेम करणारा, आपली काळजी घेणारा, सन्मानानी वागवणारा नवरा जय च्या रुपात माधुरीला मिळाला आणि स्वत:ला विसरून प्रेम देणारी, जोडीदारासाठी वाट्टेल ते करणारी आणि त्याच्या घराला आपलं म्हणणारी माधुरी जयला मिळाली. त्यांच्याविषयी वाचताना, you tube वर त्यांचे videos पाहताना कुठेही काहीही odd वाटलं नाही.
युगायुगांचे नाते आपुले नको दुरावा, सहवासाची ओढ निरंतर नको दुरावा.... हे गाण ते दोघ जगतायत. आपल्याला हवं तसं वागण्यासाठी जी किंमत द्यावी लागते आहे, ती हे दोघं आनंदानी आणि एकमेकांच्या साथीनी देत आहेत. प्रत्येक जीवाला प्रेम मिळवण्याचा अधिकार आहे. हे पुस्तकी वाक्य जगून दाखवत आहेत. जय म्हणतो, “नवरा म्हणून जी कर्तव्य असतात ती सगळी मी पार पाडेन आणि माधुरीला सुखी ठेवेन.” तर माधुरी म्हणते, “जयच्या सुखात माझं सुख मानेन. TG लोकांना स्त्री म्हणून जगण्याचा अधिकार कोर्टानी दिला आहे. पण सामान्य स्त्री सारखं लग्न व्हाव आणि संसार करावा हा अधिकार अजूनही मिळाला नाही. त्यामुळे marriage certificate मिळवून मुल दत्तक घेणं ही लढाई अजून बाकी आहेच.”
प्रेमात अहंकार, मी पणा, अपेक्षा गळून जाव्यात आणि आपल्या जोडीदाराच्या सुखात आपलं सुख मानावं हे फिल्मी संवाद जगणाऱ्या जय आणि माधुरीला प्रेमभरा सलाम...... 

                                              डॉ. विनया केसकर         

Monday, 3 September 2018


भीती .....


परवा बस स्टॉपवर एक खूप मस्त गम्मत बघायला मिळाली. एक छोटीशी मुलगी दिसली. फार तर बालवाडीत जात असेल. पाठीवर दप्तराच ओझं. दोन शेंड्या बांधलेल्या. अगदी छान तयार झाली होती ती. आजोबांचा हात धरून रस्ता क्रॉस करत होती. इतक्या गाड्या येत होत्या पण ती घाबरली नाही. अगदी धीटपणे आजोबांचा हात धरून, उलट त्यांनाच आधार देत देत तिनी रस्ता क्रॉस केला. पुढे बस स्टॉपवर आल्यावर रस्त्याच्या कडेला एक कुत्रा बसला होता. खरं तर तो तिला काहीही करत नव्हता. पण ती खूप घाबरली होती. धीटपणे रस्ता ओलांडणारी ती चिमुकली घाबरून गेली होती. तिच्या आजोबांना कळतच नव्हतं की हे काय चालू आहे? आपली नात हात सोडून उलट्या बाजूला का पळतीय? ती मात्र त्या कुत्र्याला  टाळून व्यवस्थित पुढे आली... हा सगळा प्रकार बघताना माझ्या मनात एका अनावर पण स्वाभाविक भावनेचा विचार आला. ती म्हणजे... भीती.
अगदी रोजच्या आयुष्यात बघितलं तर आपल्या लक्षात येतं की, भीतीनी आपल्याला किती ग्रासलेलं असतं नाही? किती तरी गोष्टी आपल्या मनाविरुद्ध भीतीपोटी आपण करतो. काही वेळा देवाधर्माचं करतो ते ही भीतीपोटी. मी असं केलं नाही तर माझ्या आयुष्यात काही अडचण तर येणार नाही? या भीतीनी. कित्येकदा कृती करायची म्हणून केली जाते.
नाती जपताना देखील आपण भीतीपोटी काही वेळा मनाविरुद्ध वागतो. कधी समाजाची भीती, तर कधी स्वत:ची. समाजाची वाटणारी भीती यावर मात करता येऊ शकते. पण स्वतःला वाटणाऱ्या भीतीवर मात कशी करायची? नाती तुटू नयेत, काही प्रॉब्लेम होऊ नयेत म्हणून मनात नसताना भीतीपोटी मनाविरुद्ध वागावं लागतं. कारण मनासारखं वागून आपण आपल्याबरोबर अनेकांची फरपट करू ही भीती. काय करणार? सगळ्यांनाच मनस्वी वागणं शक्य नसत ना? मनासारखं वागण्याची भीती.. न वागण्याचा त्रास. या सगळ्यात मनाची होणारी घालमेल..
एक गाणं सारखं मनात रुंजी घालत होतं..
भय इथले संपत नाही... मज तुझी आठवण येते...      


Tuesday, 14 August 2018


हाय हा हळवेपणा....



परवा एक खूप छान वाक्य ऐकलं. आपला हळवेपणा आपली ताकद बनायला हवा, कमजोरी नाही. माझ्यासारख्या हळव्या माणसांच्या डोळ्यात अंजन घालावं असं हे वाक्य आहे. कारण बऱ्याचदा हळवी माणसं फक्त भावनेपोटी निर्णय घेतात. मग या निर्णयामुळे नुकसान होतंय हेदेखील लक्षात येत नाही.
संवेदनशील असणं गरजेचं आहेच. कारण एक माणूस म्हणून जगताना संवेदनशीलता नसेल तर माणसात आणि प्राण्यात फरक तो काय राहिला...फक्त काय होतं.. संवेदनशील माणसांना व्यवहार जमत नाही. वाहात जाणे हा एक दुर्गुण असतो त्यांच्यामध्ये. कोणतही काम, व्यक्ती अगर विचार असो... त्यामागे वाहात जातात अशी माणसं. वेळ पडली तर स्वत:चा सुद्धा विचार करत नाहीत. ही समर्पित वृत्ती चांगली. पण सगळ्याच बाबतीत नाही. आपलं जगणं कठीण होऊन बसेल असं समर्पण कदाचित अडचणीत आणू शकतं. दानदेखील सत्पात्री असावं असं म्हणतात. मग संपूर्ण आयुष्य खर्ची घालताना विचार करायलाच हवा.
मन आणि बुद्धि या दोन्हीचा वापर करून निर्णय घेता येणं खूप आवश्यक आहे. हे बोलणं आणि लिहिणं खूप सोप आहे. पण तसं वागणं तितकंच अवघड. मन आणि त्याची ताकद याचा अनुभव आपण पूर्णपणे घेतच नाही. आपल्याला हवं असणारं चांगलं आणि नको असणारं वाईट. इतकी साधी व्याख्या करून चांगलं काय ते मिळवण्यासाठी धडपड सुरु होते. काही वेळा अशा परिस्थितीमध्ये हळवी माणसं अडचणीत येतात. आणि गम्मत म्हणजे हे जे चांगलं असं वाटत ते फक्त स्वत:साठी असतं असं नाही. naturally अपेक्षा वाढतात. अर्थात अपेक्षाभंग होतो आणि मग दु:ख वाट्याला येत. या सगळ्यातून हळवी माणसं खूप नाराज होतात आणि चांगुलपणावरचा विश्वास उडतो.
संवेदनशील, हळवं असणं चांगलं. फक्त आपलं आणि आपल्यामुळे नकळत दुसऱ्याच नुकसान होत नाहीये ना याचा विचार आवश्यक आहे.   

Sunday, 1 July 2018


अवस्था मनाची....


परिस्थिती  मुळे बदलणारं मन हा नेहमीच कुतूहलाचा विषय वाटतो मला. कारण एका क्षणात 
बदलणाऱ्या या मनाला म्हणाव तरी काय? कधी कधी परिस्थितीमुळे मन अगदी बोथट होतं तर कधी कधी जास्त संवेदनशील. कधी कधी तर बोथटपणा आणि संवेदनशीलता या दोन्हीचा काहूर अनुभवतं हे बिचारं मन.
आपण जसे नाही तसे वागतो अशा परिस्थितीत. एखादी व्यक्ती, परिस्थिती, काळ तर कधी आपण स्वत:जबाबदार असतो या सगळ्याला. सगळं छान मनासारखं चालू आहे असं असलं तरी हे काहूर जाणवतचं. एकसारखे किती अनुभव घेतो आपण. तरी पुढच्या वेळी, तशाच परिस्थितीत शहाणपणा सुचत नाही. वेळ निघून जाते, सगळं अगदी normal होतं. पण मनावर राहिलेल्या खुणा बराच काळ तशाच राहतात.
आकाशात दाटलेल्या मेघांप्रमाणे या सगळ्या भावनांचा कल्लोळ. हे मेघ धड बरसत नाहीत आणि वाऱ्याने निघूनही जात नाहीत. नुसता कोंडमारा. या सगळ्यातून बाहेर पडण्याचा मार्ग ठाऊक असतानाही त्या मार्गावर जाता येत नाही. आहे त्या परिस्थितीमध्ये मन रमत नाही. रेडीओवर गाणी सुद्धा काय लागतात.... मेरा वो समान लौटा दो, यारा सिली सिली, जिंदगीमें जब तुम्हारे गम नही थे...
मनाची घालमेल गाण्यांमधून ऐकताना नकळत डोळे पाणावतात, कोणासाठी? का? कळत नाही. या काहुरामधून सुटका होईल का? असा विचार मनात येतो. पण सुटकेलाही मन घाबरते...
पण परिस्थिती तशीच राहत नाही. काहीही न करता थोडा वेळ गेला की बऱ्यापैकी छान वाटायला लागतं. गाणीही बदलतात... हर घडी बदल रही है, दिल चीज क्या है, देखलो आज हम को जीभरके... मस्त चहाच्या घोट घेत घेत आलेली मरगळ घालवून मनात हे गाण रुंजी घालत... “एकाच या जन्मी जणू, फिरुनी नवी जन्मेन मी”.....