भीती .....
परवा बस स्टॉपवर एक
खूप मस्त गम्मत बघायला मिळाली. एक छोटीशी मुलगी दिसली. फार तर बालवाडीत जात असेल.
पाठीवर दप्तराच ओझं. दोन शेंड्या बांधलेल्या. अगदी छान तयार झाली होती ती. आजोबांचा
हात धरून रस्ता क्रॉस करत होती. इतक्या गाड्या येत होत्या पण ती घाबरली नाही. अगदी
धीटपणे आजोबांचा हात धरून, उलट त्यांनाच आधार देत देत तिनी रस्ता क्रॉस केला. पुढे
बस स्टॉपवर आल्यावर रस्त्याच्या कडेला एक कुत्रा बसला होता. खरं तर तो तिला काहीही
करत नव्हता. पण ती खूप घाबरली होती. धीटपणे रस्ता ओलांडणारी ती चिमुकली घाबरून
गेली होती. तिच्या आजोबांना कळतच नव्हतं की हे काय चालू आहे? आपली नात हात सोडून
उलट्या बाजूला का पळतीय? ती मात्र त्या कुत्र्याला टाळून व्यवस्थित पुढे आली... हा सगळा प्रकार
बघताना माझ्या मनात एका अनावर पण स्वाभाविक भावनेचा विचार आला. ती म्हणजे... भीती.
अगदी रोजच्या
आयुष्यात बघितलं तर आपल्या लक्षात येतं की, भीतीनी आपल्याला किती ग्रासलेलं असतं नाही?
किती तरी गोष्टी आपल्या मनाविरुद्ध भीतीपोटी आपण करतो. काही वेळा देवाधर्माचं करतो
ते ही भीतीपोटी. मी असं केलं नाही तर माझ्या आयुष्यात काही अडचण तर येणार नाही? या
भीतीनी. कित्येकदा कृती करायची म्हणून केली जाते.
नाती जपताना देखील
आपण भीतीपोटी काही वेळा मनाविरुद्ध वागतो. कधी समाजाची भीती, तर कधी स्वत:ची.
समाजाची वाटणारी भीती यावर मात करता येऊ शकते. पण स्वतःला वाटणाऱ्या भीतीवर मात
कशी करायची? नाती तुटू नयेत, काही प्रॉब्लेम होऊ नयेत म्हणून मनात नसताना भीतीपोटी
मनाविरुद्ध वागावं लागतं. कारण मनासारखं वागून आपण आपल्याबरोबर अनेकांची फरपट करू
ही भीती. काय करणार? सगळ्यांनाच मनस्वी वागणं शक्य नसत ना? मनासारखं वागण्याची
भीती.. न वागण्याचा त्रास. या सगळ्यात मनाची होणारी घालमेल..
एक गाणं सारखं मनात
रुंजी घालत होतं..
भय इथले संपत
नाही... मज तुझी आठवण येते...
Kharray
ReplyDeleteVa chaan. Manachi pratarana karanari bheeti hi anadhaich asate.
ReplyDelete