अज्ञात प्रवास...

आज खूप दिवसांनी तुमच्याशी बोलायचं ठरवलं. तस रोज काही ना काही डोक्यात, मनात चालू असतच. पण वेऴेच तंत्र जमेना राव. रोज मनात येणा-या विचारांना वाट करून देण्यासाठीच हे माध्यम निवडलं आणि त्यासाठीच वेळ मिळत नाहीये. खरचं माणसाचं आयुष्य किती चमत्कारिक असतं नाही. ज्यासाठी आटापिटा करतो, अट्टाहास करतो ते तेव्हा न मिळता, आयुष्याच्या अगदी वेगळ्या वऴणावर मिळतं. आपण आपल्या मनानी एखादी गोष्ट मिळावी असं ठरवतो. त्यासाठी प्रयत्न देखील करतो. पण बराच प्रवास केल्यानंतर हे लक्षात येतं की बहुतेक हे काही आपल्याला मिळणार नाही. ''मग कोल्ह्याला द्राक्ष आंबट'' या म्हणीप्रमाणे त्या गोष्टीचा नाद सोडून देतो. ती गोष्ट मिळावी म्हणून सुरू केलेल्या प्रवासात हव्या - नकोशा खूप गोष्टी वाट्याला येतात. पण त्या त्या वेळी मनाला समजावून सांगितलं जातं की, wait.... अच्छे दिन आने वाले है. कधी कधी हा प्रवास इतका लांबतो की मुक्कामाच्या ठिकाणाचा विसर पडतो. त्या सुंदर गोष्टीची वाट बघणं कमी कमी होतं. आहे त्या परिस्थितीत आपण किती सुखात आणि छान राहू शकतो यावर मन विचार करू लागतं. आहे तेच सगळ आवडायला लागतं. हव्या असणा-या गोष्टीशी तुलना करून समोर येणा-या अनेक बाबी स्वीकारल्या जातात. काही वेळा जाणीवपूर्वक, ब-याचदा नाईलाजानी. मग एकदा स्वीकारलं की ते पुढे न्यावच लागत. काहींना वाटतं , अरे तेव्हा तर आनंदानी स्वीकारलं होतं. मग आता काय झालयं ?
पण मन ही चीज काय बनवलीय देवानी.. त्याच्या विरूध्द आपण फार काळ गोष्टी दामटवून नेऊ शकत नाही. मन आपल्याला त्याच्या मनासारख वागायला सतत प्रवृत्त करतं. समाधान हे मानण्यावर आहे. पण ते कोणाच्या मानण्यावर ? ब-याचदा दुस-यांच्या. सगळे नियम, अटी, संवेदना, भावना प्रत्येक जण स्वतःच्या मनाप्रमाणे ठरवतो. पण हे सगळं दुस-याला मान्य असेलच असं नाही. मी म्हणेन तसं.. अशी भूमिका घेणा-यांना हे नाही पटणार. समाज.. समाज म्हणून आपण ज्याचा उदो उदो करतो, तो समाजही घडी घडी बदलतो. स्वतःच्या सोयीप्रमाणे अर्थ लावतो. मग मन विचारतं... हा अधिकार मला का नाही?
या विचार मंथनात चुकीच्या व्यक्ती, चुकीचे विचार, चुकीच्या कृती होण्याची शक्यता जास्त असते. कारण मनाचा शोध चालू असतो. त्याच्या मनासारखं मिळेपर्यंत हा शोध संपत नाही. कित्येकदा त्यासाठी पुन्हा जन्म घ्यावा लागेल की काय असही होतं. चूक, बरोबर या व्यक्तीसापेक्ष संकल्पना आहेत. हे कितीही पटलं तरी अमका चुकला किंवा त्याचा तो विचार चूक आहे असं आपण सगळे सर्रास म्हणतोच की. आपल्या वागण्यानी सो क़ॉल्ड समाजाची घडी बिघडू नये यासाठी मनाचा सुरक्षित प्रवास सुरू होतो. आपल्यासाठी समाज का समाजासाठी आपण. समाजाला रूचेल असं आयुष्य म्हणजे नक्की कोणाचं. कारण समाजानी तर देवांनाही सोडलं नाही. विचारांना वेग देत देत मनाचा प्रवास सुरूच....
अचानक... मुक्कामाचं ठिकाण येतं. अगदी हवं तस. मग मन सांगत, अरेच्चा हेच ते. असच तर हवं होतं. असच जगायचं होतं. चमत्कार घडावा असं होतं सगळं. सुखद अनुभूतींनी मन भारावून जातं. प्रवासात झालेल्या चुका, केलेल्या चुका, चांगल्या गोष्टी, भेटलेली माणसं, घटना सगळ आठवून केलेल्या प्रवासाची निष्फळता जाणवते. कशासाठी मांडला हा पसारा ? असं वाटू लागतं. वास्तव आणि कल्पना यांची जुगलबंदी सहन होत नाही. मिळालेल्या मुक्कामाच्या ठिकाणी मन विसावा घेत पुन्हा एकदा लढण्याचं बळ मिळवतं. सुरू होतो पुन्हा एक अज्ञात प्रवास. खूपसा हवासा.....
प्रेमाचा नवा अर्थ.....

आज सकाळी आकाशवाणी पुणे केंद्रावर माझ्या आवडत्या विषयावर 'चिंतन' लागलं होतं. खरं तर चिंतनमध्ये नेहमी तत्वज्ञान, अध्यात्म या विषयांवर वैचारिक सादरीकरण असतं. अर्थात मला आवडणारा विषयही वैचारिक बैठक असणाराच आहे. पण तो चिंतनमध्ये येईल असं वाटलं नव्हतं. तो विषय म्हणजे अर्थातच प्रेम. मी खूपदा हे बघितलय जेव्हा मनामध्ये विचारांच काहूर उठलेलं असतं तेव्हा देव त्यावर उत्तर म्हणून काहीतरी पाठवतोच. आजही तेच झालं. प्रेम करणा-या माणसाला प्रेम मिळतच असं नाही. अशी लोकं खूप नशीबवान असतात, ज्यांच्या प्रेमाला प्रतिसाद मिळतो. या सगळया विचारांच्या गर्तेत असतानाच एक छान विचार मिळाला. प्रेमाच्या प्रतिसादाची अपेक्षा न करता प्रेम करता आलं तर... विचार वाटतो तितका सोपा नाही. पण अशक्य नाही. कारण कोणावरही बळजबरी करून प्रेमाला प्रतिसाद मिळवता येत नाही, मग ते नातं कोणतही असो. प्रेम मिळवणं ही प्रत्येक जीवाची गरज आहे. आपल्यावर कोणीतरी माया करतय, कोणीतरी आपली काळजी घेतय ही भावनाही जीवाला समाधान देऊन जाते. मग ते मिळवण्याचा प्रयत्न करणं ही अगदी नैसर्गिक गोष्ट आहे. पशुपक्ष्यांपासून सगळे जीव प्रेमाच्या आणि मायेच्या शोधात आहेत. फक्त प्रेमाच्याच नाही तर प्रतिसादाच्या प्रतिक्षेत आहेत. प्रतिसाद न मिळाल्यास नाराज होणं हेही स्वाभाविकच आहे.
मग प्रेमाला प्रतिसाद न मिळाल्यास प्रेम करणं बंद करायचं का ? मुळीच नाही. अपेक्षा न ठेवता प्रेम करायचं . कारण प्रेम करणं ही आपली नैसर्गिक गरज आहे. समोरच्याला त्रास न देताही ते करता येतं. हे सगळ बोलायला खूप सोपं आहे. पण करायला तितकच अवघड. प्रेम या संकल्पनेला चौकटीत अडकवल्यानी अपेक्षित प्रतिसादाची वाट बघून आपण चूक करतो. आई मुलावर प्रेम करते तेही अपेक्षेनीच. पण मुलानी प्रतिसाद नाही दिला तरी तिचं प्रेम कमी होत नाही. अगदी अशीच भावना इतरही नात्यांमध्ये आणता आली तर. विचार करून पहा... प्रेमातून अपेक्षा वजा केली की उरतो फक्त आनंद . हा आनंद मिऴवण्यासाठी आपल्याला कोणाचीही गरज नाही. कारण बळजबरी लादून, त्रास देऊन, त्रागा करून काहीच मिळत नाही. त्यापेक्षा प्रेम करणं आणि मिळवणं ही ज्यांची गरज आहे, त्यांनी फक्त प्रेम करावं... अपेक्षा न ठेवता.
आता तू माझं ऐक....
मनातल्या विचारांवर मात करणं तितकं सोप नाही. कारण हेच मन समोरच्या व्यक्तीबाबत, परिस्थितीबाबत मत तयार करून मोकळं होतं. कित्येकदा अगदी प्रेमात वागणारी अचानक विचित्र वागु लागतात. त्याची नेमकी कारणं कऴत नाहीत. कारण मनाचं कसं असतं, त्याला जशी सवय लावावी तसं ते adjust होतं. त्याला बिच्चा-याला खरच काही कळत नाही. त्यातल्या त्यात अति संवेदनशील मन असणा-यांच जरा कठीणच आहे. एखादी व्यक्ती आपल्याशी नीट, पहिल्यासारखी बोलत नाहीये असं लक्षात आलं की, मन विचारांच्या प्रवासाला निघतं. ब-याचदा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधून मिऴत नाहीत. काही वेळा काळ हेच प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असतं. पण हे सगळ मनाला समजावून सांगण काही सोप नाही.
परिस्थितीवर मात करणं एक वेळ सोपं. पण दुस-याच्या विचित्र वागण्यामुळे होणा-या त्रासावर मात करणं खूप कठीण. कारण परिस्थिती बदलणं आपल्या एकट्याच्या हातात आहे. समोरच्या व्यक्तीनी कसं वागावं हे आपल्या हातातच नाही. मला असं वाटतं, खरचं ज्यांना आपली काळजी वाटते त्यांना आपलं मन, भावना कळतातच. अगदी आपलं चुकत असलं तरी अशी माणसं आपल्या विचित्र वागण्याकडे लक्ष देत नाहीत. आपल्या मनःस्थितीचा विचार करून , आपल्याला बरं वाटावं म्हणून जे करायचं ते करतात. पण नीट विचार केला तर असही वाटतं, खरच असं असतं? म्हणजे आपल्या मनातलं दुःख, नाराजी दूर करणं कोणाला जमू शकतं? किंवा कोणाला खरच त्याचं इतकं पडलेल असतं?
त्रास कमी होऊन आनंदी तर रहायच आहे. पण कोणी मदत करत नाहीये. अशा वेळी त्रास होतो. पण एक मात्र खरं की, अशा परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी मदत न करणारे आपले नाहीत हा साक्षात्कार तरी होतो. मग मनाचा प्रवास सुरू होतो एका वेगळ्या दिशेनी. ही उदासी, एकटेपणा दूर करण्यासाठी मनाला वेगळ्या कामात गुंतवलं की ते ऐकतं. अर्थात ते येड्यागबाळ्याचं काम नाही. कारण मनाला असं नेहमीच वाटतं की, कोणीतरी गोंजारावं, समजूत काढावी . पण मनानी आपल्यावर राज्य करण्याआधी आपणच त्याच्यावर स्वार झालं की मग त्याची थोडी पंचाईत होते. हे सगळं म्हणलं तर अतिशय सोपं आहे, नाही तर अशक्य. पण आपला जन्म अशक्य गोष्टी शक्य करण्यासाठीच झालाय बॉस. कारण दुःखी, कष्टी रहाणं हे काही आपल्यासारख्यांना शोभत नाही. चला तर मनाला वेगळ्या कामांमध्ये गुंतवून त्याची पंचाईत करण्याचा प्रयत्न करू या. पाहू तरी जमतंय का?
स्त्रीचा सन्मान....
स्त्रीचा सन्मान कसा करावा ? माझ्या मनातल्या या प्रश्नाचं उत्तर मला नुकतच मिळालं. आर्मी मध्ये काम करणा-या एका तरूणानी सांगितलं ,'' स्त्री कोणत्याही नात्यात असो मग ती पत्नी, प्रेयसी, मैत्रीण, बहीण, आई, काकू, मामी, आजी, मावशी, मुलगी अगदी कोणीही . तिला आपल्यासोबत असताना Queen असल्याचा Feel आला पाहिजे.'' अगदी थोडक्यात पण किती मार्मिक उत्तर आहे हे. स्त्रीनी ज्याप्रमाणे सगळी नाती निभावणं गरजेचं आहे, तितकाचं महत्त्वाचा आहे तिचा सन्मान... मग नातं कोणतही असो. तिच्या विचारांचा केलेला आदर पुरूषांच्या कृतीतून दिसणं आवश्यक आहे.
काळ कितीही बदलला तरी, निदान माझ्या पिढीतल्या स्त्रियांना तरी मनासारखं वागून Queen असल्याचा Feel घेता येत नाही. कारण आम्ही धड ना आधुनिक , ना परंपरावादी. कित्येकदा अगदी साध्या साध्या गोष्टी करतानाही विचार करावा लागतो. अगदी ताजं उदाहरण, मुंबई - पुणे एक्सप्रेसमध्ये दारात मस्तपैकी बसावं असं वाटलं तर माझ्या चिरंजीवांनी लगेच टोकलं, ''आई, असं काय बसतेस ? त्यापेक्षा उभी रहा.'' (मनात म्हणलं, मामाचा भाच्चा आणि नव-याचा मुलगा बोलला.) त्याच्या जागी तो योग्यही असेल, पण पुन्हा प्रश्न येतो तो Feel घेण्याचा. गोष्ट अगदी साधी असते, पण मनासारखं वागणं जमत नाही. माझ्या आईच्या पिढीतल्या बायका तर या Feel चा विचारही करत नसाव्यात. समर्पित होणं ही त्या पिढीची खासियत. त्यात काय झालं वडिलांच, नव-याचं, मुलाचं ऐकलं म्हणून. आपल्या भल्यासाठीच असतं ना सगळं? हे तिच्या पिढीकडून मिळालेले संस्कार. त्यांच्याही भल्याचं आम्ही मुलींनी काही सांगितलं तर ऐकलं जातच अस नाही. पण हे सगळं बोलायचा प्रश्नच नाही. कारण हा feel असं जे मी म्हणतीय ना, त्याचं गांभीर्यच त्या पिढीला कळलेलं नाही. आणि ते समजावून सांगणं आमच्या पिढीला कळलेलं नाही. नंतर कटकट नको त्यापेक्षा तो, ते काय म्हणतात तसं करूया असं म्हणण्यातच शहाणपणा वाटू लागतो. पण या भावनांचा स्फोट नको तिथे होतो आणि मग अरे ही अशी विचित्र काय बोलतेय ? असंही समोरच्याला वाटू शकतं. मनात चाललेल्या या विचारांसरशी एक गोष्ट जाणवली, आयुष्य खरच खूप साधं , सोप्प असतं. सन्मान दिला तर नक्की मिळतो. हा सन्मान देण्यासाठी मनात आधी प्रेमाची भावना असावी लागते.
पण परवा सहज या प्रश्नाचं उत्तरं मिळालं. ''Queen असल्याचा Feel ''.. wow... ब्लॉग वाचणा-या माझ्या प्रिय मित्रांनो, भावांनो हा Feel देता आला की तुम्ही आपोआप king सारखं Feel करालं.. काय मगं Feeling लक्षात आली ना ?....
अलवार तुझी चाहुल ......
अलवार तुझी चाहुल , का धडधडते हे ऊर ..... तू येणार असलास की असच होतं. तुझ्या येण्याची चाहुल लागताच मन अगदी कातर होतं. तुला कसं कळतं रे मला तुझी आठवण येतीय हे ? मातीच्या मोहमयी सुगंधावरूनच कळत.. आता तू येणार. कदाचित माझ्या आजुबाजुला कुठेतरी तू बरसूनही गेला असशील. अजून मला चिंब भिजवलं नाहीयेस. पण उन्हाच्या या काहिलीमध्ये तुझ्या येण्याची चाहुलच खूप काही देऊन जाते.
आज दुपारीच मळभ दाटून आलं होतं. जस मनात वादळी विचारांच.. कडवट भावनांच.. नकारात्मक आठवणींच येतं अगदी तसच. पण हे मळभ आलं की मनातून कुठेतरी साद येते, आता तू येणार. जेव्हा जेव्हा विचारांच हे मळभ येतं तेव्हा तेव्हा तू हमखास येतोसच. कारण तुझ्या माझ्या नात्याला वेळेचं गणित नाही. हे नातं आहे भावनेचं. मला त्रास होतोय, मनात काहुर उठलय हे तुला कसं कळतं? पण दर वेळी मनातलं हा त्रास तुझ्या येण्यानी मावळतो. पुन्हा एकदा जगण्याची इच्छा निर्माण होते, नुसत्या तुझ्या चाहुलीनी. आज आकाशात ढगांचा गडगडाट ऐकला आणि म्हणलं, 'आला माझा जीवलग'. अगदी आजच नाही आलास तरी तुझ्या येण्याची चाहुल आली. तू येणार असलास की त्याच्या आधी किंवा नंतर शुभ घडणार असल्याची चाहुल लागते. माझ्यासाठी तर तू खुप लकी आहेस.
थंडगार वा-याची झुळूक अंगावर घेताना, शरीराबरोबरच मनालाही थंडावा मिळतो. जगरहाटीच्या काहिलीनी तापलेलं मन तुझ्या अस्तित्वामुळे शांत होतं. ही किमया फक्त तूच करू शकतोस. पाठीमागचं अमंगल मनातून काढून टाकतोस आणि वर्तमानात जगायला शिकवतोस.
ओलेत्याने दरवळले, अस्वस्थ फुलांचे घोस
ओलांडून आला गंध, नि:स्तब्ध मनाची वेस
या ओळी गुणगुणायच्या आहेत. येतोयस ना ?.......
सुंदर मी होणार.....
स्त्री आणि सौंदर्य हे एक सर्वमान्य असं समीकरण आहे. सहज रस्त्यानी जातानाही एखादी सुंदर मुलगी किंवा स्त्री दिसली तर तिच्याकडे वळून वळून बघितलं जातं. अर्थात हे खुप Natural आहे. पण स्त्रीची फक्त तितकी ओळख नक्कीच नाही. सिनेमांमध्ये तर सुंदर अभिनेत्रीच हवी असते. मला अनेकदा प्रश्न पडतो, माझ्यासारख्या किंवा माझ्या आजुबाजुला असणा-या सामान्य स्त्रिया अभिनेत्री का नसतात ? सतत मेकअप, सुंदर फिगर, रेशमी जुल्फे वगैरे कसं maintain होतं? कामाच्या रगाड्यात eye brows करायला जाणं होत नाही आमच्यासारख्या कितीतरी जणींना. मग असं साध सोप का नाही दाखवलं जात? ना कजरे की धार ... ना मोतीयों के हार.. ना कोई किया सिंगार.. फिर भी कितनी सुंदर हो... असं गाण आहे, पण त्या गाण्यातली अभिनेत्री नखशिखांत नटलेली आहे. अपवाद म्हणून काही सिनेमे आहेत, ज्यामध्ये अभिनेत्रींना अजिबात मेकअप केलेला नाही. पण ते अपवादच आहेत. या सगळ्यात भर म्हणून स्त्री आणि तिचं सौंदर्य खुलवणा-या हजारो जाहिराती आपण दररोज बघतोच. सौंदर्याच्या पलिकडे असणारं काही असतं अशी जाहिरात नाही पहायला मिळत.
'नाम शबाना' हा सिनेमा मला यासाठी खुप आवडला. बाकी कितीतरी अशक्य गोष्टी त्यामध्ये होत्या. पण जमेची बाजू म्हणजे सिनेमाची अभिनेत्री तापसी पन्नू . सामान्य म्हणावी अशी. आपल्या ध्येयाकडे लक्ष असणारी तरूणी. अभिनय, साधेपणा खूप आवडला आणि मुख्य म्हणजे तिला आमच्या जीवनाशी सहज relate करता येत होतं. आजकालच्या तरूणांकडे असणारा जोश योग्य ठिकाणी वापरला गेला तर किती चांगलं काम उभ राहू शकत हे सांगणारा हा सिनेमा. नट्टा पट्टा करून, कमी कपडे घालून आपल्या so called सौंदर्याची जाहिरात करण्यापेक्षा करण्यासारखं बरच काही आहे हे सांगणारा हा सिनेमा. आयुष्यात घडलेल्या वाईट प्रसंगामुळे खचून न जाता, ध्येय ठेवून जगण्याची उमेद वाढवणारी तापसी खूप आवडली. त्या संपूर्ण सिनेमात तिचं सौंदर्य हा मुद्दा डोक्यातही येत नाही. असं नाही की ती सुंदर नाही. पण त्याकडे लक्षच जात नाही. पण पावसात न भिजता, कमी कपडे न घालता, प्रणयाचे प्रसंग न दाखवता, मेकअप न करताही ती खूप सुंदर दिसते... म्हणजे सामान्य तरूणीसारखी. भेदक नजर, ध्येयाप्रती असणारी निष्ठा, आत्मविश्वास आणि जिद्द सगळच लई भारी. मला असं वाटतं की असे अधिकाधिक सिनेमे यावेत. म्हणजे शरीरप्रदर्शन, मेकअप म्हणजेच सौंदर्य ही व्याख्या बदलायला मदत होईल.
प्रवास समजुतीचा....
नुकतीच एक खूप छान गोष्ट ऐकली. दोन मित्र असतात. त्यातला एक मित्र शिकारीसाठी जातो आणि तिथेच हरवतो.दुसरा मित्र त्याला शोधायला बाहेर पडतो. तिथे एक कुरूप चेटकीण असते. तिनेच त्या मित्राला डांबून ठेवलेलं असतं. ती दुस-या मित्राला म्हणते, जर तू माझ्याशी लग्न केलस तरच मी तुझ्या मित्राला सोडेन. मित्र प्रेमासाठी तो हो म्हणतो. लग्न झाल्यावर त्याला सजवलेल्या पलंगावर एका टोकावर चेटकीण आणि एका टोकावर एक अतिशय सुंदर स्त्री दिसते. ती चेटकीण त्याला म्हणते , तुझ्यापुढे दोन पर्याय आहेत. एक मी दिवसभर सुंदर असेन आणि रात्री कुरूप. दुसरा पर्याय मी दिवसभर कुरूप दिसेन आणि रात्री सुंदर. तुला काय आवडेल ते सांग. मित्र विचारात पडतो. काहीही निवडलं तरी नुकसान त्याचच होणार असतं. म्हणून तो म्हणतो, तुला जे हवं ते मला चालेल. माझं काही म्हणणं नाही. त्याच्या या उत्तरानी चेटकीण खुष होते आणि सुंदर स्त्री बनून त्याचं आयुष्यही सुंदर करते. गोष्टीचा मतितार्थ हा आहे की, प्रत्येक स्त्रीला तिच्या मनासारखं जगायला मिळालं तर ते हवं असतं.
महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर ही गोष्ट मला फारच आवडली. महिला दिन म्हणजे आमचा गौरव दिन वगैरे असला तरी तिला तिच्या मनासारखं वागण्याची संधी आजही कितपत मिळते? ही शंका आहेच. अगदी लहान सहान गोष्टीतही सगळ्यांचा विचार करण्यातच बरचस आयुष्य निघून जातं. त्यात स्त्रीला त्यागाची मूर्ती बनवून तिच्या मनासारखं वागण्याबाबत तिची गोची करून ठेवली आहे. कालांतरानी मन मारण्याची इतकी सवय होऊन जाते की, मनासारखं काही केलं तरी guilty वाटायला लागतं. परिस्थिती पूर्वी इतकी बिकट नाही. पण ग्रामीण आणि निमशहरी भागात आजही स्त्रियांना साध्या साध्या गोष्टीही मनासारख्या करता येत नाहीत. स्त्रीवाद वगैरे नाहीये माझ्या मनात कारण स्त्रीनी पुरूषावर कुरघोडी करून स्वतःला सिध्द करणे म्हणजे स्त्रीचा विकास नाही. तर दोघांनी एकमेकांना समजून घेऊन प्रगती करणे म्हणजे विकास. कामाचं ठिकाण असो की घर, एकमेकांना साथ देणं फार महत्त्वाचं असतं. पडती बाजू कोण घेतो हे महत्त्वाचं नाही. समजून घेऊन पुढचा प्रवास करणं मह्त्त्वाचं आहे. स्त्रियांनीदेखील समानतेच्या नुसत्या गप्पा न मारता ख-या अर्थाने मुक्तपणे, आत्मनिर्भरतेनी काम करण्याची गरज आहे. स्त्री आणि पुरूष म्हणजे, प्रकृती आणि पुरूष. निसर्गानीदेखील या दोघांना समान महत्त्व दिलं आहे. मग आपण तरी भेदभाव का करायचा ? स्त्री - पुरूष भेदाच्या पलिकडे जाऊन माणूस म्हणून एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. स्त्री म्हणून तिच्याकडे असणारे plus points आणि पुरूष म्हणून असणारे plus points मिऴून एक चांगला समाज घडवण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने एकच सांगावसं वाटतं, उंच भरारी घेण्याच्या स्वप्नामध्ये साथ हवीय. फक्त मागे कोणीतरी आहे हा आधार हवाय. विश्वास हवाय सोबत असण्याचा. मला वाटतं ही गरज फक्त स्त्रीचीच नाही तर प्रत्येकाची आहे. स्त्री आणि पुरूष कोणीच श्रेष्ठ - कनिष्ठ असं काहीही न मानता, समजून घेऊन प्रवास केला तर अपेक्षित साध्यापर्यंत सहज पोहोचता येईल.
जनप्रियत्व .....
अपेक्षा हे सगळ्या दुःखांच मूळ असं म्हटलं जातं. पण तरी आपण त्या ठेवतोच. अपेक्षेप्रमाणे झालं तर आनंद होतो. पण अपेक्षेप्रमाणे झालं नाही तर वाईट वाटतं. हा माणसाचा स्वभाव असतो. एखाद्या व्यक्तिवर स्वतःपेक्षा जास्त विश्वास दाखवला आणि ती व्यक्ती अपेक्षेप्रमाणे वागली नाही तर त्रास होतो. पण नीट विचार केला तर लक्षात येतं की, अपेक्षा आपली असते. ती व्यक्ती तिच्या स्वतःच्या अपेक्षेप्रमाणेच वागते. त्यामुळे त्रास तरी करून का घ्यायचा ? अपेक्षित सुख - दुःखापेक्षा , अनपेक्षित सुख दुःखात माणसाची खरी कसोटी लागते. अनपेक्षित सुखाचा काही प्रॉब्लेम नसतो. कारण ते हवहवसं वाटतं. पण अनपेक्षित दुःखानी माणूस कोलमडतो. या सगळ्यातून सही सलामत सुटणं वाटतं तितकं सोप नाही.
या समस्येवर देखील प्रेमानी मात करता येते. तुम्ही म्हणाल, हे कसं शक्य आहे ? पण या सगळ्यावर रामबाण औषध म्हणजे प्रेमच. प्रेमानी जग जिंकता येतं. संतांकडून जनप्रियत्व शिकावं. कारण जो लोकांना आवडतो तोच देवाला आवडतो असं म्हटलं जातं. जो निःस्वार्थी असेल त्यालाच जनप्रियत्व येईल. आपल्यापुरते न पहाता जगण्याचा प्रयत्न केला की हे सहज जमेल. प्रेमाची उत्कट अवस्था म्हणजे भक्ती. अशी भक्ती ज्याच्या मनात असेल त्याला असं वागणं सहज शक्य आहे. ज्या व्यक्तीवर, भावनेवर आपलं प्रेम आहे तेच प्रेम आपल्या वागण्या - बोलण्यातही हवं. प्रत्येक माणूस कशावर ना कशावर प्रेम करतोच ना... कोणाचं व्यक्तीवर प्रेम, कोणाचं पैशावर, कोणाचं प्रतिष्ठेवर प्रेम तर कोणाचं कर्तृत्वावर, कोणाचं जातीवर प्रेम तर कोणाचं धर्मावर, कोणाचं स्वतःमधल्या सूडाच्या भावनेवर प्रेम तर कोणाचं स्वतःमधल्या क्षमाशील वृत्तीवर , कोणाचं निसर्गावर प्रेम तर कोणाचं देवावर, कोणाचं कलेवर प्रेम तर कोणाचं कामावर.... मग तेच प्रेम , तीच भावना सर्वत्र दिसायला लागली की अपेक्षा, दुःख, द्वेष, सूड या भावनांना काही अर्थ तरी उरतो का?
आपलं कशावरच प्रेम नसेल तर मग कठीण आहे... सॉरी सोप्प आहे. मग आपण हवे नकोपणाच्या पुढे गेलोय असं म्हणायला हरकत नाही. मग आपल्या नजरेत सगळीकडे समता नांदायलाच हवी. अपेक्षा, दुःख , वेदना या गोष्टींच्या पुढे नेणारी अवस्था आहे ही. प्रेमात असाल किंवा प्रेमात नसाल काही प्रॉब्लेम नाही. जनप्रियत्व मिळवण्याचा प्रयत्न करायला हवा. संतांसारखं जनप्रियत्व मिळवण्यासाठी आपल्या विचारांमध्ये परिवर्तन येण्याची गरज आहे. आपण तरी सगऴ्यांचं भलं व्हावं असा विचार करावा. समोरच्यानी काय करायचं हा त्याचा प्रश्न आहे. जशास तसे न वागता मला हवे तसे म्हणजे प्रेमानी वागायला काय हरकत आहे ? कारण प्रत्येकाला वाटतं की समोरच्यानी चांगलं वागावं, मी मात्र हवं तसं वागेन... This is not fair boss...
प्रेम (कशावरही आणि कोणावरही) करणा-यांना अपेक्षाभंगाच्या दुःखाचा सामना करणं सोप आहे. प्रेम न करणा-यांचा प्रश्नच नाही. कारण त्यांना या दुःखाचा सामना करण्याची वेळ येतच नाही. साधं, सोप्प जगण्याचा प्रयत्न, आनंद आणि समाधान नक्कीच देईल. प्रयत्न करूया ?
प्रेमाचा प्रवास ......
आज प्रेमाचा दिवस... तसा रोजच असतो तो. पण प्रेम म्हणजे काय हे कळायला हवं. नाहीतर बाह्य गोष्टींना भुलून प्रेम केलं जातं पण ते अल्पायुषी ठरू शकत. काही वेळा ज्या व्यक्तीवर प्रेम केलय ती सोडून जाते, विसरते किंवा जगातून निघून जाते. काहीही असो. व्यक्तीवर केलेलं प्रेम काळाच्या मर्यादेत केलं जातं. कोणी कितीही प्रिय असलं तरी प्रेम करण्यालासुध्दा मर्यादा आहेत. आज व्हॅलेंटाईन डे आहे म्हणूनच हे सांगावसं वाटतं की, व्यक्तीवर प्रेम केलं तर त्याला मर्यादा आहेत हे लक्षात घेतलच पाहिजे. कारण नंतर होणा-या त्रासापेक्षा याचा आधीच विचार केलेला बरा.
मग काय ? .... प्रेम करायचच नाही का ? जरूर करायचं. पण व्यक्तीवर नाही, प्रेम या भावनेवर. तसं असेल तर ते प्रेम टिकवणं आपल्या मनावर अवलंबून रहातं. समोरचं कोण कस वागतय याला महत्त्वच उरत नाही. अजून एक वाटतं, खरच ज्याला आपल्या प्रेमाची गरज आहे त्यांना ते द्यावं. प्रेमाचं दानही सतपात्री असावं. कारण नको त्याला जेवायला दिल्यानी अजीर्ण होणारच. त्यापेक्षा खरच ज्यांना गरज आहे त्यांना ते द्यावं.
कालच हा अनुभव आम्ही घेतला. माझ्या कॉलेजमधल्या मुलींना घेऊन काल आम्ही वानप्रस्थाश्रम या वृध्दाश्रमात गेलो होतो. कॉलेजचा कोणता प्रकल्प म्हणून नाही. आजी आजोबांना कडकडून भेटायला. आत्ताच्या मुलांना मोठ्यांविषयी आदर , प्रेम, जिव्हाळा नाही हे विधान काल मुलींनी खोटं ठरवलं. अगदी योगायोगानी व्हॅलेंटाईन डे च्या आदल्या दिवशी ही भेट झाली. आपल्या घरापासून लांब राहीलेल्या या आजी आजोबांना आपल्या प्रेमाची, स्पर्शाची किती गरज आहे हे प्रकर्षानी जाणवलं. एकटेपणा फार वाईट असतो. विशेषतः वृध्दपणी सोबतीची गरज असते. आपला जीवनसाथी मरेपर्यंत साथ देईलच असं सांगता येत नाही. कारण जन्म आणि मृत्यूवर माणसाची सत्ता नाही. जोडीदार नसला तरी मुलं आहेत ही आशा असते. त्यांनी आपल्याला सांभाळावं ही अपेक्षा असते. पण अपेक्षा हेच दुःखाचं मूळ. अपेक्षाभंग होतो आणि या आजी आजोबांची रवानगी वृध्दाश्रमात केली जाते.
काल मुली आणि आजी आजोबा अक्षरशः रडले. मुलींनी केलेले कार्यक्रम बघून आजी आजोबांना त्यांच्या नातवंडांची आठवण आली. मुलींनाही आजी आजोबांच्या सहवासानी भरून आलं. निघताना फार वाईट अवस्था झाली होती. लहान मुलं आईचा पदर धरून ठेवतं तसं आजी आजोबा सोडतच नव्हते. आमचाही पाय निघत नव्हता. आजी आजोबांसाठी मुलींनी खाऊ आणला होता. उभं आयुष्य आपल्या संसारासाठी खर्च केलेल्या आजी आजोबांना याचं खूप नवल वाटलं. मुलींनी त्यांना प्रेमानी खाऊ भरवलासुध्दा. डोऴ्यात पाणी आणि मनात आठवणी घेऊन आम्ही निघालो. आजी आजोबांनाही माहिती होतं की हे प्रेम औटघटकेचं आहे. तरी त्यांनी या सगळ्याचा आनंद घेतला. काही आजी आजोबा अजिबात मिक्स होत नव्हते. सुरूवातीला वाईट वाटलं. पण नंतर मनात विचार केला की, त्यांची तरी काय चूक ? प्रेम या भावनेवरचा त्यांचा विश्वासच उडाला असेल. त्यांच मन त्यांच्याच लोकांनी इतकं दुखावलं आहे की, आता पुन्हा नव्यानी गुंतण त्यांना नको असेल.
भरभरून प्रेम करणं यासारखी दुसरी आनंदाची गोष्ट नाही. फक्त ते कोणावर करावं हे लक्षात घ्यायला हवं. ज्यांना गरज आहे त्यांनाच ते द्यावं. अशा अनेक जागा आहेत जिथे आपण आपल्या प्रेमाची बरसात करू शकतो. व्यक्तीवर केलेलं प्रेम अल्पायुषी ठरण्याची भीती असते. पण प्रेम या भावनेवर प्रेम केलं तर त्याला अंत नाही. चला तर मग.... निघायचं प्रेमाच्या प्रवासाला....
अस्तानंतर असते सुरूवात ....
माझ्या अतिशय आवडीच्या विषयावर बोलण्याचा, लिहिण्याचा दिवस जवळ येतोय. अगदी बरोबर व्हॅलेंटाईन डे ... काही जणं म्हणतील , त्यासाठी ठराविक दिवसाची काय गरज आहे? प्रेम तर कधीही व्यक्त करता येतं.प्रेम म्हणजे प्रियकर प्रेयसीचच नाही बरं का... पण नीट विचार केला तर लक्षात येतं की प्रेम व्यक्त करायला आपण खरंच उत्सुक असतो का ? किंवा आपल्याला यासाठी वेळ आहे का? किंवा काहींना वाटेल, प्रेम आहे मग ते व्यक्त करण्याची काय गरज ? इतक्या सगळ्या प्रश्नांना एक प्रतिप्रश्न, मग प्रेम व्यक्त करायला जर एखादा स्पेशल दिवस असेल तर काय हरकत आहे ? कारण धावपळीच्या आजच्या काळात सगळेच स्पेशल दिवस इव्हेंट झालेत.
गेल्या काही दिवसात प्रेम या भावनेची चीड यावी असं काही पाहिलं, वाचलं, अनुभवलं. मग वाटलं, खरं प्रेम म्हणून जो टाहो आपण फोडत होतो ती चूक होती का? अगदी निरपेक्ष नसावं पण प्रेम आहे याची जाणीव करून देणारं खरं प्रेम या जगात अस्तित्वातच नाही का ? कारण सगळीकडे स्वार्थमिश्रित प्रेमच आहे असं वाटायला लागलं होतं. काहीतरी हवं असल्याशिवाय लोक स्नेह वाढवत नाहीतआणि ते काम होताच अनोऴखी होतात. असल्या लोकांना न ओळखता येणं ही चूकच म्हणायला पाहिजे. कारण माणसं ओऴखता न येणं ही त्या माणसांची चूक असूच शकत नाही. ती चूक आपलीच. बरं हीच चूक पुन्हा पुन्हा घडत असेल तर अंतरंग तपासायलाच हवं. काही वेळा बिचारं मनं इतकं थकून जातं की विचार करण्याची ताकदच संपून जाते. असं वाटतं , जाऊदे जे आहे तेच बरोबर आहे. मनाचा, विचारांचा हा आजार फार धोकादायक. अशा वेळी अनेक लोक गृहित धरून गैरफायदा घेण्याची दाट शक्यता असते. विचारांची ही क्षीणता मन बधीर करून टाकते. अगदी लहान सहान बाबतीत विश्वास उडून गेल्याचं एक भयंकर फिलींग हऴुवार मनाला पोखरत रहातं.
पण प्रत्येक गोष्टीला अंत ठरलेला असतो. या फेजलाही तो असतोच. झालेली पडझड, पानगळती विसरून पुन्हा नव्याने आशेची पालवी फुटतेच. सगळ संपलय असं काही नसतं, तो असतो मनाचा खेळ. आशा बगे या माझ्या आवडत्या लेखिकेच्या कथेतलं हे वाक्य खूप प्रेरणादायी आहे.. ''ज्यात पुन्हा काही सुरू करण्याची ताकद असते तो खरा अस्त...'' असा अस्त झाल्यानंतर झालेली सुरूवात कसली विलोभनीय असते. पावसाने सारी घाण, कचरा वाहून जावा, तसं जखमा, त्याचे व्रण हे सगळं संपून जातं. पुन्हा एकदा नव्यानी, आनंदानी जगण्याची उमेद घेऊन येणारी ही सुरूवात.. पुन्हा एकदा प्रेम, विश्वास, श्रध्दा या हऴुवार भावनांवर प्रेम करायला लावणारी ही सुरूवात... मनाला माहिती असतं की या सुरूवातीला अस्त आहेच पण त्या अस्तानंतरही असेल एक आशादायी सुरूवात.... प्रेमाच्या या महिन्यात प्रेम या विषयावर लिहावसं वाटलं त्या आशादायी विचाराला दिलसे थॅंक्स. कारण आपलं ब्रीदवाक्य ठरलय बॉस... जगायचं तर आनंदानी....
मन का बोलाविते......
मन का बोलाविते पुन्हा त्या दिवसांना... काय असतं या मनाचं गणित ? जे आहे त्यात न रमता जे होऊन गेलय त्यामध्ये मन का रमतं ? सगळ्या वेदनांचं मूळ हेच आहे हे समजूनही मनाला समजावण्यात नेहमी कमी का पडतो माणूस. नेमकी विचारधारा निश्चित न झाल्यानी असेल का हे सगळं? पण होतं काय.... एका विचारावर ठाम राहून पुढे जायचं ठरवताच तो विचार, त्याचा पाया किती तकलादू आहे हे लक्षात येतं. मग पुन्हा सुरू होतो मनाचा शोध मनःशांतीसाठी.
कोणत्याही विचारांचा प्रभाव तात्पुरता टिकणं याला आपल्याच मनाचा कमकुवतपणा म्हणावं का ? पण या जगात कायमस्वरूपी काहीच नाही म्हणे. मग अशा शाश्वत सुखाची, आनंदाची अपेक्षा करणच चूक आहे का ? सगळ छान, आनंददायी चाललेल असतानाच अचानक आपल्याच विचारांमुळे त्या आनंदावर पाणी पडतं. ही त्या त्या वेळची मनःस्थिती असते बहुतेक. मग अशा तात्पुरत्या नाराजीवर उपाय आपणच शोधावा लागतो.
मनावर नियंत्रण ठेवावं म्हणे. कसं ठेवायचं ते नियंत्रण? कारण मनच तर पळत मनाविरूध्द. त्याचं ते पळणच गोड वाटू लागतं. पण नंतर जेव्हा दमछाक होते तेव्हा कळतं. या मनाचं न ऐकलेलचं बरं. सगळं तत्वज्ञान कोळून प्यायलेलं हे मन त्या तत्वज्ञानाला न जुमानता आपल्या तालावर नाचायला भाग पाडतं. खरं, शाश्वत, कायमस्वरूपी असं काहीच नाही हे समजूनही त्या शाश्वत सुखाची, प्रेमाची अपेक्षा का करतय हे मन? नेमकं काय हवय हे कळलं असत तर किती बरं झालं असतं नाही ? निदान ते मिळवण्याचा प्रयत्न तरी करता आला असता. आज हवसं वाटणारं सगळ उद्या तसं नसणार आहे. हे माहिती असूनही हवेपणा, नकोपणा का संपत नाही ? साक्षीभावानी पहायला कधी जमणारे ? पण मनाला हे माहितीय की, असं काहीतरी घडेल की आलेलं मळभ ओसरून समाधानाची बरसात नक्की होईल. कारण आपलं स्टेटस ठरलय बॉस, जगायचं तर आनंदानीच.....