असाही वाढदिवस ....
' हॅपी बर्थ डे टू यू ,हॅपी बर्थ डे टू यू , मे गॉड ब्लेस यू डिअर भुजो. ' असा लहानग्यांचा किलबिलाट त्यातच मस्त मोठा केक, सजावटीचा थाटमाट व छान छान बर्थडे कॅप. हे वर्णन आहे एका रंगलेल्या बर्थडे पार्टीचे. फक्त ही पार्टी कोणत्या मुलाची नव्हती तर होती एका कुत्र्याची. तळेगाव स्टेशन विभागातील वतननगर येथे नंदकुमार खंडागळे व मनिषा खंडागळे यांचा भुजो हा पाळलेला कुत्रा. अगदी घरातल्या एखाद्या सदस्याचा वाढदिवस आपण ज्या उत्साहात साजरा करतो तसा भुजोचा पहिला वाढदिवस साजरा करण्यात आला. कॉलनीतील भुजोचे सगळे मित्र वाढदिवसाला आले होते. रीतसर औक्षण, भेटवस्तूंचा मारा, मिसळ पावचा बेत वाढदिवसानिमित्त करण्यात आला होता.
लॅब्राडोर जातीचा एक वर्षाचा भुजो कॉलनीत सर्वांचा लाडका बनला आहे. भुजो रोज सकाळी सकाळचे वर्तमानपत्र आणण्यासाठी मुख्य रस्त्यावर जातो. दूधवाले काका आल्यावर त्यांच्याकडून स्वतःसाठी दूध घेतो. नंदकुमार खंडागळे भुजोला आपल्या मुलाप्रमाणे वाढवतात. त्यामुळे त्याला सर्वात जास्त लळा त्यांचाच आहे. ते ऑफिसमधून येईपर्यंत तो वाट बघतो. गाडीवरुन चक्कर मारण्यासाठी हट्ट करतो. गाडीची चावी आणून देतो. भुजो सकाळी घरातल्या सगळ्यांना उठवतो. घरात कधीही शी शू करत नाही. फूटबॉल मस्त खेळतो. त्याला पट्टा किंवा साखळी कधीच बांधली जात नाही हे विशेष. तो कधीही विनाकारण कोणावरही भुंकत नाही. कॉलनीतील लहान मुले त्याचा घोडा घोडा करतात, त्याचे कान ओढतात पण भुजो त्यांना इजा करत नाही. आदित्य आणि अक्षय या खंडागळे यांच्या दोन्ही मुलांचा तो मित्र आहे. सौ. मनिषा त्याचे खाण्यापिण्याचे लाड आवडीने पुरवितात. कॉलनीत तर तो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या गळ्यातला ताईत बनला आहे. खंडागळे यांच्या घरावरुन जाताना कोणीही भुजोशी बोलल्याशिवाय जात नाही.
भाजी बाजारात विक्रेत्यांचा तो लाडका बनला आहे. सगळे भाजीविक्रेते त्याला टोमॅटो, गवार, काकडी खायला देतात. घरातही त्याची खाण्यापिण्याची अजिबात कटकट नाही. कारल्याच्या भाजीपासून सगळ्या भाज्या त्याला आवडतात. हो पण श्रीखंड पूरीचा बेत त्याला जास्त आवडतो. भुजोला रागाने कोणी खायला दिले तर तो अजिबात खात नाही. कोणी हिडीसफिडीस केले तर त्या व्यक्तिकडे तो ढुंकूनही बघत नाही. चाणक्याने कुत्र्यापासून शिकण्यासारखे गुण असे वर्णिले आहेत खूप भूक लागली असतानाही संतुष्ट रहाणे.गाढ झोपेत असतानाही जागृक रहाणे.मालकाप्रती वफादारी आणि शूरपणा दाखविणे. सदैव कृतज्ञता व्यक्त करणे.तमाम प्राणीमात्रात आपल्या प्रमाणिकपणासाठी आणि मालकाप्रती कृतज्ञता बाळगण्यासाठी कुत्र्याची ख्याती जगन्मान्य आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही युरोपात पाळीव प्राण्यांच्यामुळे मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते असे अहवालात म्हटले आहे.
खंडागळे यांना भुजो इतका प्रिय आहे की एक बाई पंधरा हजार देऊन भुजोला मागत असतानाही त्यांनी तो दिला नाही. खंडागळे म्हणाले, 'भुजो माझ्या मुलासारखा आहे. माणसांनाही जे कळत नाही ते या मुक्या जनावराला कळत. त्याच्यामुळे आमच्या घरात वेगळच चैतन्य आल आहे. इतकच नाही आता तर आमच्या घरात भांडणंच होत नाहीत.' पाळीव प्राण्यावरचे प्रेम आणि त्या प्राण्यातला प्रामाणिकपणा या गोष्टी आपल्याला नक्कीच विचारप्रवृत्त करायला लावण्यासारख्या आहेत नाही?
No comments:
Post a Comment