माझा मामा............
परमार्थ म्हणजे काय? तर आसक्ती सोडणे. ज्याने आपल्याला प्रपंच दिला तो त्याची काळजी घेईल. आपण आपले काम करीत रहावे याला परमार्थ म्हणतात. खरा परमार्थ हा लोकांना उपदेश करण्याकरीता नसून तो स्वतःकरीता असतो. हे सगळे ऐकण्यास सोपे वाटत असले तरी तसे वागणे कठीण आहे. कारण आपल्यासारखे सर्वसामान्य लोक प्रपंचाची काळजी करण्यातच आपले सारे आयुष्य घालवतात. या सगळ्याची जाणीव होऊनही आपण स्वतःला बदलत नाही. मात्र सर्वसामान्यांना भक्तीमार्गाची ओढ लागावी म्हणून परमेश्वर गुरूची नियुक्ति करतो. गुरूंच्या आज्ञेचे पालन केल्याने प्रपंच करीत असतानाच परमेश्वराची प्राप्ती होते. भोर या एका लहानशा गावात डॉ. उदय पेंडसे हे असेच एक व्यक्तिमत्व आहे ज्यांची नियुक्ती परमेश्वराने लोकांना भक्तीमार्गाला लावण्यासाठी केली आहे.
डॉ. पेंडसे हे माझे मामा. त्यामुळे गुरू आणि माझा पालनकर्ता अशा दोन भूमिकांमध्ये माझा मामा मला नेहमीच भेटतो. त्याच्याबद्दल लिहायचे ठरविले तर एक मोठा ग्रंथ तयार होईल. आयुर्वेदाचे अफाट ज्ञान असलेला माझा मामा अतिशय निरागस, संवेदनशील, प्रेमळ, सतत दुस-यांना मदत करणारा आहे. त्याच्याकडे सगळ्यांना समान वागणूक मिळते. आम्ही भाच्चे मंडळी असोत किंवा त्याची मुले तो आम्हाला समान वागणूक देतो. माझ्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्याने मला साथ दिली आहे. अगदी निरपेक्ष भावनेने त्याने मला अनेक मोठ्या संकटांमधून वाट दाखविली आहे. मी आत्ता जे काही आहे ते फक्त माझ्या उदय मामामुळे. कारण असे म्हणतात की तुमच्या हालाखीच्या परिस्थितीत जे तुमच्याबरोबर असतात तेच तुमचे आप्त. माझा मामा आणि अर्थात माझ्यावर आईसारखे प्रेम करणारी माझी आशा मामी हे माझ्यासाठी म्हणूनच अतिशय महत्त्वाचे आहेत. त्याच्याविषयी लिहिताना, बोलताना माझे डोळे नेहमीच पाणवतात. मामाविषयी एक वेगळीच ओढ मला वाटते. अगदी साध्या साध्या प्रसंगात सुध्दा त्याची नुसती आठवण काढली तरी मनाला धीर येतो. मनाची ही शक्तीच त्या संकटातून बाहेर पडायला मदत करते. माझ्या आईसाठी सुध्दा तो श्रीकृष्णासारखा धावून यायचा. मला आई, बाबा नाहीत त्यामुळे खर तर मी अनाथ आहे. पण माझ्या मामानी मी अनाथ असल्याची जाणीव मला कधीच होऊ दिली नाही. नाहीतर हल्ली नात्यांमधला दुरावा किती पराकोटीचा वाढतो आहे याचा अनुभव आपण सगळे घेतोच.
अगदी माझ्या जन्मापासून आजतागायत मी मामाला खुप त्रास दिला आहे. पण त्यानी कधीच तो त्रास मानला नाही. त्याची 'नन्या' अशी प्रेमळ हाक ऐकली की एकटेपणा कुठच्याकुठे पळून जातो. मला माहित नाही तो माझा गुरू आहे, वडिल आहे, की आई, पण एक मात्र नक्की की जगाच्या या पसा-यात त्याच्या रूपाने मला एक असा आधार मिळाला आहे जो फार कमी लोकांच्या नशीबात असतो. या लेखात कोणताही एक प्रसंग लिहून माझे अनुभव शेअर करणे मला शक्य नाही. माझ्या आयुष्यात प्रत्येक चांगल्या - वाईट प्रसंगात त्याचे अस्तित्व मी अनुभवले आहे. त्यामुळे हा पट एवढा विस्तृत आहे की तो शब्दबध्द करणे अशक्य आहे. 'श्रीराम ग्रुप' या साधकांच्या समूहाला मामाचे गुरू म्हणून अनेक अनुभव आले असतील. पण माझ्या बाबतीत माझा मामा माझ्याबरोबर सावलीप्रमाणे असतो. त्यामुळे माझे असणे आणि माझे नसणे त्याच्याच हातात आहे. माझे यश त्याचेच आहे. कारण मला योग्य ती दिशा दाखवणारा तोच आहे. आपल्याला सगळ्यांनाच सगुण रूपात ईश्वर भेटावा असे वाटते. तसा तो प्रत्येकाच्या हृदयात असतोच. पण ज्याच्या हृदयात माया, ममता, प्रेम भरलेले असते त्याच्याकडे ईश्वराचे अस्तित्व अधिक असते. कदाचित त्यामुळेच मामा आपल्याला गुरूस्थानी आहे. त्यानेदेखील त्याच्या गुरूंच्या आज्ञेचे पालन केले आहे. मामा त्याच्या शिष्यांना किंवा त्याच्या कुटुंबियांना कधीच आज्ञा करीत नाही. त्याची विनंती असते की नामस्मरण करा. मामा म्हणतो,' सदगुरूच्या सांगण्याप्रमाणे नामस्मरण करा. त्याने नामाची गोडी लागते. पोटभर केलेल्या नामस्मरणानेच आत्मा तृप्त होतो.'