मन की बात....
माझा हा ब्लॉग म्हणजे माझ्या मनातल्या भावनांच प्रतिबिंब. तिथं डेडलाईन नाही की जिलब्या पाडणं नाही (बऴेच लिहिलेला लेख म्हणजे जिलब्या पाडणं). म्हणूनच आज तुमच्याशी काहीतरी बोलावसं वाटतय. माझ्या एका friend cum guide नी माझ्यातल्या लेखिकेला जागवलं. आत्ताच्या चाललेल्या नोटाबंदीवर तू लिहायला पाहिजेस असं सुचवलं. मग काय माझ्यातली लेखिका जागी झाली आणि मी ब्लॉगच्या माध्यमातून तुमच्या भेटीलाआले.
नोटाबंदीच्या निर्णयावर लिहिण्याइतकं माझं ज्ञान पुरेसं आहे की नाही हे माहिती नाही. पण हा ब्लॉग म्हणजे माझी 'मन की बात' आहे. व्हॉटस् अॅपचे सगळे विचारवंत आणि प्रसारमाध्यमं यांच्यामुळे ज्ञानात बरीच भर पडली आहे. एक व्यक्ती आणि तिनी घेतलेला निर्णय सगळ्यांना आवडेल अशी आशा करणं चुकीचं आहे. पण मला असं वाटतं आपली बुध्दी आणि अर्थात मन याला विचारून आपली मतं मांडायला हवीत. विरोध करणं तसं फारच सोपं आहे. पण मग त्यावर पर्याय सुचवता येतात का विरोध करणा-यांना? आत्ताच्या सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतलाय, पण खरं तर तो नोटाबदलाचा निर्णय आहे. घरातलं एखादं कार्य असेल तर त्यामध्ये कितीतरी गोंधळ होतो. कितीही काटेकोर नियोजन केलं तरी ' नक्टीच्या लग्नाला सतराशे विघ्न 'असं होतच की. मग प्रचंड लोकसंख्या असलेल्या या देशाला बदलणं इतकं का सोपं आहे ? कुटुंबप्रमुखाला विरोध करत राहीलं तर ते कुटुंब संकटांचा सामना करू शकेल का ? 'wait and watch' अशी भूमिका का घेत नाही आपण? आपल्याला जे कळलय ते दुस-यांपर्यंत पोहोचवायला हवं. नोटाबदलाच्या निर्णयात आपण काय भूमिका बजावू शकतो? याचा विचार करायला हवा. सुशिक्षितांनी फेसबुक आणि व्हॉटस् अॅप पेक्षा प्रत्यक्ष मदतीसाठी वेळ द्यायला हवा. कारण या माध्यमांचा वापर सगळेच करत असतील असं नाही. विशेषतः सुशिक्षित असूनही अशिक्षितासारखं वागणा-यांनी थोडं सबुरीनं घ्यायला हवं. ज्या लोकांमध्ये या निर्णयामुळे संभ्रम निर्माण झाला आहे त्यांना प्रत्यक्ष मदत करायला हवी. इतका मोठा निर्णय आहे, त्याची अंमलबजावणी व्हायला काही वेळ तर द्या ना राव.
लग्न झाल्यावर हे सगळे लोक आपलेच आहेत हे माहिती असूनही त्या मुलीला सासरच्या घरात रूऴायला काही तरी वेळ लागतो. हे तर फक्त एका व्यक्ती आणि कुटुंबापुरतं झालं. नोटाबदलण्याच्या निर्णयाबाबत सगळ्या देशासाठी एक व्यक्ती कशी पुरी पडू शकते? या निर्णयाचे सकारात्मक बदल आपण बातम्यांमधून वाचतोय. आपण निवडून दिलेल्या मतावर आपला इतकाही विश्वास नाहीये का ? म्हणजे आपला आपल्यावरच विश्वास नाही असं म्हणावं लागेल. आपल्याच नवीन घरात रहायला गेल्यानंतर सगऴं स्थिरस्थावर होईपर्यंत थोडाफार गोंधळ होतोच. पण घर आपलच असतं आणि घर बदलण्याचा निर्णयही आपलाच. मग तोच समजुतदारपणा आता दाखवुया.
कमी पैशातही किती छान जगता येतं. लग्नकार्यासाठी कल्पकतेनी प्रेझेंटस देता येतात. एका प्लेटमध्ये पाणीपुरी खाता येते. गाडीवर न जाता मस्तपैकी चालत जाऊन एकमेकांशी संवाद साधता येतो. बाहेर कुठेही न जाता आपल्याच घरात खूप मजा करता येते याचा साक्षात्कार होऊ शकतो. या दोन महिन्यातच सगळं जग खरेदी करण्याचा वेडेपणा करायचाच कशाला ? श्रध्दा और सबुरी हा साईबाबांचा संदेश कोणत्याही परिस्थितीत. महत्त्वाचा ठरतो.
संत तुकाराम महाराजांचा हा संदेश खूपच मोलाचा वाटतो. किती पैसा कमावला म्हणजे माणूस श्रीमंत
समजावा ? नीतीधर्माचे आचरण करता यावे, मुलाबाळांचे संगोपन करता याव, आईवडिलांची काळजी करता यावी, अब्रूने जगता यावं इतका पैसा जवळ असला की तो मनुष्य श्रीमंत समजावा. मग काय आपण सगळे भारतीय आहोत ना श्रीमंत ?
मना तुझे मनोगत मला कधी कळेल का ? .......
'कळत नकऴत' सिनेमामधलं 'मना तुझे मनोगत मला कधी कळेल का ?' हे गाणं ऐकलं आणि मीही माझ्या मनाशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मोठमोठ्या कार्यक्रमांमध्ये आता अमुक तमुक आपलं मनोगत व्यक्त करतील असं सांगितलं जातं. ते खरच मनोगत असतं का ? ब-याचदा समोरच्याला काय आवडेल हेच बोलाव लागतं. आपल्या मनातलं अगदी खरं बोलण्याची संधी किती वेळा मिळते ? खरं तर आपल्या मनासारखं वागणारी लोक भाग्यवानच म्हणायला हवी. कारण बाकीच्यांच्या मनाचा विचार करून आपल्या मनाला वळवणं हेच खूपदा वाट्याला येतं. मग ते बिचारं मन एखाद्या दिवशी बंड करून उठतं. अरे काय चाललय काय ? ऐकून घेतं म्हणून किती अति करायचं.
लहान सहान गोष्टीतही मनाचं मनोगत न ऐकता जगरहाटीचा विचार करून मनाला समजावलं जातं. सगळे आनंदी तर आपण आनंदी ही आदर्शवादी भूमिका नक्कीच चांगली. पण या आदर्शवादाचाही कधीतरी उबग येतो. अनेक गोष्टी मनाविरूध्द करण्याची मनाला इतकी सवय लागून जाते की मनाचं मनोगत ऐकू येईनासं होतं. मग काही वेळा आतून एक प्रश्न विचारला जातो, तुला नक्की हे हवय का ? त्याचं उत्तर द्यायलाही ते तयार नसतं. कारण उत्तर नकारात्मक असेल आणि त्याचा परिणाम दुस-याच्या मनाविरूध्द होणार असेल तर... त्यापेक्षा नकोच मनाशी संवाद. नाही तरी त्याचं मनोगत ऐकून कृती घडणारे कुठे.
गम्मत म्हणजे आजुबाजुची माणसं सांगतात , 'ऐकावं जनाचं, करावं मनाचं '. पण खरचं मनाचं ऐकून त्या सगळ्यांशी वागायच ठरवलं तर कितीतरी लोकांना दुखवावं लागेल. कारण दुस-याकडून अपेक्षा ठेवल्याच जातात, त्या पूर्ण झाल्या नाही की मनाला त्रास होतो. अपेक्षा पूर्ण झाल्या की मन खुष होईल, पण घडी बिघडेल का ? संबंध तुटतील का? नात्यांच काय मग? अशा विचारांनी त्या मनाचं न ऐकलेलं बर असं वाटतं. काही प्रॅक्टिकली विचार करणारे लोक म्हणतात, 'मन आणि बुध्दि जे सांगेल ते ऐकावं.' पण ब-याचदा मन आणि बुध्दिची युती होतच नाही. समाज समाज म्हणून जे म्हणलं जातं, त्यात वावरताना बुध्दिच वरचढ ठरते. मन बिचारं माघार घेतं. मनातले मांडे मनातच खावे लागतात.
जगरहाटी वगैरे ठीक आहे. पण त्या मनाचंही ऐकलं पाहिजे थोडं. कारण जग साथ सोडून जाणार आहे. पण मन.... ते आपल्यासोबतच रहाणार शेवटच्या श्वासापर्यंत . अगदी मनातल्या साथीदारासारखं. कारण आपलं मन जपणारे आपणच. आपल्याला जपणारं आपलं मनच. बाकीचे सगळे व्यवहार. म्हणूनच आता तरी मनाचं मनोगत ऐकण्याची बुध्दि मनानी द्यावी. गा-हाणं देवापुढे मांडतात. पण तोही मनातलाच ना?
शिक्षक म्हणजे काय असतं रे भाऊ?
आज ब-याच महिन्यांनी मी तुम्हाला भेटतीय. आठवण रोजच येते आणि मनात विषयही खूप असतात. पण एका वेगळ्या लिखाणात अडकल्यामुळे मनातलं शेअर करायला वेळ पुरत नाही. आज एका वेगळ्याच अपप्रवृत्तीविषयी बोलायचं आहे मला. गेली दोन वर्ष शिक्षणक्षेत्राशी थोडा जवळून परिचय आला आहे. कोणत्या वर्गाला कोणता शिक्षक क्वॉलिफाईड असतो हे या निमित्तानी कळलं. या क्षेत्राला क्वॉलिफाईड लोकांइतकीच क्वॉलिटी असणा-या लोकांची खूप जास्त गरज आहे. कारण शिक्षणानी माणूस सुसंस्कृत होतोच असं नाही. शिक्षण आवश्यक आहेच. पण शिक्षक या श्रेणीसाठी शैक्षणिक पात्रतेबरोबर मुलांना घडवण्याची तीव्र इच्छा आवश्यक आहे. एखाद्या ऑफिसमध्ये पाटी टाकणा-या कारकुनासारखं काम शिक्षकानी करता कामा नये. कारण आपल्यासमोर बसणारी सगळी मुलं उद्याचे भावी नागरिक आहेत. त्यांना घडवताना आपल्या हातून झालेली छोटीशी चूक आपल्या देशाचं , पर्यायानी आपलं नुकसानं करू शकते.
सिनिअर कॉलेजला आलेल्या विद्यार्थ्यांचं मराठी इतकं भयंकर का असतं ? ज्या गोष्टी अगदी पायाभूत आहेत, त्या समजावून सांगण्याची वेळ का येते ? या सगळ्याला तो विद्यार्थी जबाबदार आहे का? वाचनाची आवड नसणं ही विद्यार्थ्यांची चूक आहे का ? आपल्या कामाविषयी शिक्षकांची अनास्था वाढण्याची कारणं काय आहेत ? या सगळ्याचा नीट विचार केला पाहिजे. अगदी कावळ्याच्या छत्र्यांसारखी शिक्षणसंकुलं तयार होत आहेत. धनिक, राजकारणी आपल्या नावानी या संस्था सजवत आहेत. मुलांकडून वारेमाप फीया घेतल्या जात आहेत. पण या संस्थेचा कणा असलेले शिक्षक त्यांना मात्र अगदी कमी मोबदल्यात नोकरी करावी लागत आहे. अनुदान नसलेल्या शाळा- कॉलेजची स्थिती अशीच आहे. 'गरजवंताला अक्कल नसते' या म्हणीप्रमाणे शिक्षक नोकरी करतात. पण तुझा पगार किती आणि तू बोलतोस किती ? या प्रश्नाप्रमाणे त्याचं काम असतं. काही ठिकाणी मी असं ऐकते की शिक्षक मुलांना म्हणतात, ''इतक्या पगारात एवढच शिकवता येतं.'' किती भयंकर आहे हे सगळ.
आमच्या लहानपणी आमच्या बाई घरी बोलवून आम्हाला किती गोष्टी शिकवायच्या. नाट्यवाचन, नाट्यसंगीत, सुगम संगीत, स्नेहसंमेलन या सगळ्यामध्ये त्यांनी केलेली मदत मी आजही विसरू शकत नाही. पण हल्ली स्नेहसंमेलनात सिनेमातल्या गाण्यांवर हिडीस नाचणारी निरागस बालक दिसतात. पालकांनाही याचा अभिमान वाटतो. स्टेजवर २०, २५ मुलं, मुली असतात. त्यात आपलं पिल्लू त्यांना दिसतं का तरी ? ज्या शब्दांचा अर्थही कळत नाही अशा शब्दांवर ही मुलं हावभाव करतात. या सगळ्यामध्ये चूक त्या मुलांची आहे का ?
पैसे भरून नोक-या मिळवण्याचं लोण शिक्षणसंस्थांमध्ये आल्यानी सगळा बट्याबोळ झालाय. ज्याच्याकडे डिगरी आणि पैसा तो परमनंट. ज्याच्याकडे डिगरी आहे, शिकवण्याची तळमळ आहे पण पैसा नाही त्यांनी कायम संघर्ष करायचा. हे सगळं कुठेतरी थांबल पाहिजे. कारण या कारणांमुळे या क्षेत्राकडे बुध्दिजीवी लोक यायला तयार होत नाहीत. आत्ता परिस्थिती निदान हातात आहे. हे असच चालू राहीलं तर मुळात ढासळलेली आपली शिक्षणव्यवस्था कोलमडायला वेळ लागणार नाही. सगळीकडे हे प्रकार चालतात असा माझा दावा नाही. पण ८० टक्के हे प्रकार चालू आहेत. मग उरलेल्या २० टक्यांचा प्रभाव किती पडेल ?
आत्ताच्या काळाशी सुसंगत ज्ञान आपल्या विद्यार्थ्यांना दिलं पाहिजे. आता या नात्यात खूपच मोकळेपणा आलाय. तो खरच स्वागतार्ह आहे. अगदी व्हॉटसअॅप वर शिक्षक आणि विद्यार्थी चॉटिंग सुध्दा करतात. पण या मोकळेपणाचा स्वैराचार न होता त्याचा चांगला उपयोग करून घ्यायला हवा. गुरू शिष्याच्या या पवित्र नात्याचा मान राखला पाहिजे. गरज आहे मानसिकतेतल्या बदलाची. शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि हो संस्थाचालकांची सुध्दा.
बरस आता तू....
खरं म्हणजे या दिवसांमध्ये एव्हाना मी तुझ्यावर तीन चार लेख लिहीले असते. पण तू अजून आलाच नाहीस. तुझ्या येण्याचा गंध , तुझा शिडकावा तनमनाला फुलवणारा... का असा अंत बघतोयस ? मला मान्य आहे आम्ही सगऴ्यांनीच खुप चुका केल्यात त्याची इतकी मोठी शिक्षा नको देऊस. आता तर म्हणे तुझं येणं लांबलय. हवामान खात्यावर विश्वास ठेवावा असं त्यांच भाकित नसतच. पण तू माझा विश्वास गमवू नकोस प्लीज. गेली दोन वर्ष खरचं खूप वाईट गेलीत. पण या वर्षी नाही.
सगळीकडे कोरडं, उदास वाटतय. तू आल्याचा सारखा भास होतोय. समोरच्या घरावरचे पत्रे चिंब भिजलेत की काय असं रोज सकाळी खिडकी उघडल्यावर वाटतय. सगळे डोंगर भकास, कोरडे, पिवळे पडलेत. या सगळ्यामध्ये आणि माझ्या मनामध्ये चैतन्य फुलवण्यासाठी तुला यावच लागेल. तू आल्यानंतर नाकं मुरडणा-यांकडे तू वक्ष देऊ नकोस. तुझी किंमत आता सगळ्यांनाच कळलीय. मला तर तू कधीही आलास तरी आवडतोस. वेळ अवेळ हे आपल्या नात्यातलं गणित नाहीच, नाही का?
मुक्त मनाने तू केलेली उधळण कशी विसरता येईल. संथ लयीत तुझं येणं, त्यानंतरचा तुझा आवेग, बरसून चिंब करण्याचं तुझं कसब, कधी कधी आता पुरे हं असं म्हणायला लावणारा तुझा खोडकरपणा, तुझ्या येण्यानी नव्याने काहीतरी करण्यासाठी मिळणारी उर्मी... ओ हो.... खरचं मी तुला खूप मिस करतीय. बहुतेक तुलाही हे कळत असेल, पण प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते ती वेळ आल्याशिवाय काही होत नाही. पण मला काय वाटतं... आता ती वेळ आलीय. सगळीकडे बरसून, सगळ्यांना तृप्त करून टाक. तू येणार म्हणून किती छान छान गाणी ऐकली पण नाहीत अजून. कांदा भजी नाही, आल्याचा चहा नाही, मक्याचं कणीस नाही. बोअर झालयं खूप. तुझं येणं सगळ्याच दृष्टीनी खूप आवश्यक आहे. वर्षभराचा ओलावा या तीन - चार महिन्यात द्यायचाय तुला. आत्ता उषीर करतोस, मग नको त्या वेळी येऊन सगळा घोळ करतोस. मग सगळे तुला नाव ठेवतात. मला नाही आवडत ते. तुझी काय चूक ? चुका बाकीचे करतातआणि बोल मात्र तुला. आता हे काही नकोच. ठरलं तर.... येतोयस ना ?
कैरीची फोड, लागते गोड..............
हिरवीगार, आंबट, तिखट - मीठ लावलेली मस्त कैरीची फोड. आहाहा... नुसतं म्हणलं तरी तोंडाला पाणी सुटतं. बाजारातून विकत आणून कैरी खाणं हे म्हणजे सणावारी केळ्याची शिकरण खाण्यासारखं वाटतं. कैरी ही काय विकत आणून खायची गोष्ट आहे का ? त्यात माझ्यासारख्या ग्रामीण भागात राहीलेल्यांसाठी तर हास्यास्पदच वाटतं. म्हणजे आमच्या भोरला एस. टी स्टॅंडवर उतरून रिक्षेनी जाणं जितक गमतीदार तितकंच कैरी विकत आणून खाणं. आमच्या गावात रीक्षानी वगैरे फिरायचे लाड नव्हते बरं का. भोरमधले कोणीच रीक्षानी गावात फिरायचे नाही. एस. टी. तून उतरलं की पायी पायी घरी जायचं. आता मात्र परिस्थिती बदललीय. पण आजही मला भोरला उतरून रीक्षा करणं मजेशीरच वाटतं. या भोरमध्येच या दिवसात चोरून कै-या खाणं हा आमचा आवडीचा छंद असायचा.
हे सगळ मला एकदम आठवलं याच कारण आमच्या समोरच्या एका आज्जींनी मला हाक मारून चक्क चार कै-या तोडून दिल्या. वर म्हणाल्या, ''तुला हवं तेव्हा कै-या घेऊन जात जा.'' मी मनात म्हणलं साला हे काय जिणं झालं. कै-या अशा सहजतेनी मिळाल्या तर त्याची काय गोडी? झाडाच्या मालकीणीचं लक्ष नसताना हळूच दुपारच्या झोपेच्या वेळी मस्तपैकी कै-या चोरून, घरात आईच्या नकळत तिखट- मीठ- मसाला चोरून , कै-या पाण्यानी न धुता तशाच फोडून खाण्यात कसलं सॉलिड थ्रिल होतं.
मी आणि माझा भाऊ तर फारच धमाल करायचो. शेजारच्यांच्या झाडाच्या कै-या चौरून आणण्यासाठी आम्ही एक स्पेशल आकडी बनवली होती. किती हे कष्ट.... या बाबतीत देव अगदी आमच्या बाजूनी होता. झाडं दुस-याचं पण कै-या मिळायच्या आम्हाला. ते गाणं नाही का, ''बहरला पारिजात दारी, फुले का पडती शेजारी?'' तसच काहीसं. झाड पूर्णपणे आमच्या घराच्या पत्र्यावर झुकलेलं असायचं. त्यामुळे शेजारच्या आजी झोपी गेल्या की आमचे उपद्व्याप सुरू. चुकून कधी त्यांना आवाजानी जाग आली की मग आम्ही मेलोच. त्यात हा सगळा प्रकार आईला कळला की तिच्याकडून मिळणारे धपाटे वेगळेच. पण हे सगळे कष्ट करून जेव्हा फळ (कैरी)मिळायचं तेव्हा तो थकवा अगदी कुठच्या कुठे पळून जायचा.
शत्रू जितका बलाढ्य तितकं युध्द आणखीन मजेशीर होतं. आमच्या बाबतीत तसच व्हायचं. कैरी काढून आमच्या झोळीत पडताना चुकून त्यांच्या अंगणात पडली आणि आजी आल्या की आम्ही अगदी निरागसतेचा आव आणून त्यांच्याकडे बघायचो. एक कैरी त्यांच्या अंगणात आणि एक आमच्या पत्र्यावर अशा परिस्थितीत त्यांनी पकडलं तर अगदी प्रामाणिकपणे आमची कैरी त्यांच्याकडे टाकायचो. तो प्रामाणिकपणा इतका टोकाचा होता की, ती कैरी बरोबर त्यांच्या गटारीत कशी पडेल अशी फेकायचो. शत्रू बलाढ्य असल्यानी तोही हार मानायचा नाही. ती गटारात पडलेली कैरी सुध्दा त्या आजी उचलून घ्यायच्या. दिवसा हा सगळा प्रकार जरा अवघड वाटू लागला मग आम्ही रात्री कैरीची शिकार करायला बसायचो. आईचा डोळा चुकवून करावी लागणारी ही शिकार आजही उत्साह निर्माण करते. आमचा बलाढ्य शत्रू आज नाही, त्यामुळे अजिबात न घाबरता सगळं वर्णन केलं हा. तसंही आम्ही काय त्यांना घाबरायचो नाही म्हणा, वयाचा मान ठेवून वागायचो झालं.
आमची पिढी खरच खूप नशीबवान आहे. या अशा थ्रिलिंगच्या गोष्टी आम्ही खूप अनुभवल्या. आत्ताच्या मुलांना यातली गंमत कशी कळणार ? कॅंडी क्रशच्या लेव्हल वाढवणं हेच आत्ताच्या पिढीचं थ्रिल....
क्षणिक काजवे......
उजेडाची फसवी निशाणी
आणि काळोखाचेही भासच....
ही कविता वाचत असताना मनात विचार आले, खरचं सुख आणि दुःख हे सुध्दा काजवेच नाही का? क्षणिक , तात्पुरतं सगऴं. पण आपण सगळेच किती गुंततो यात. सुखाचा एखादा क्षण आनंदाच्या लहरी घेऊन येतो. त्या लहरीत हा क्षणही संपणार आहे याचं भानच रहात नाही. सुखाचे क्षण किती पटकन सरतात. अर्थात आपल्या मनाचा खेळच सगळा. वेळ आपल्या गतीनीच धावतो. सुख ही भावना म्हणजे नेमकं काय? आपल्या मनासारखं झालं की सुख. हे खरं सुख आहे हे कसं ओळखायचं. याचं काही परिमाण नाही. ते व्यक्तिनिहाय बदलत रहातं. मग मनात प्रश्न येतो, आपल्याला वाटणारं सुख हे तरी कुठे चिरकाल टिकणारं आहे?
दुःखाचा एखादा क्षण होत्याचं नव्हतं करतो. मनानी त्या गोष्टीला किती महत्त्व दिलय यावर सगळ अवलंबून आहे. त्या क्षणी अगदी धरणी दुभंगुन तिनी आपल्या कुशीत घ्यावं असं वाटतं. शरीर, मन अगदी गऴून जातं. साधा आवाज कोलाहल वाटतो. माणसं नकोशी वाटतात आजुबाजुला. अगदी सहज दिलेली प्रतिक्रियासुध्दा खिजवते. सगळ संपल असच वाटायला लागतं. . आता पुन्हा पालवी फुटणारच नाही. असं वाटत असतानाच जगण्याचं एखादं खुप छान कारण सापडतं. मग काय पुन्हा उभारी.
यालाच जीवन म्हणतात. सगऴ इतकं क्षणिक. हे सगऴ कितीही कळत असलं तरी आनंद आणि वेदना व्हायची ती होणारच. सुखात असताना येणा-या क्षणांचा प्रश्नच नाही. ते हवेहवेसेच वाटतात. पण दुःखातल्या क्षणांना आपल्या पातळीवर शह देण्यासाठी त्यांना म्हणावं....
चमकते क्षणिक काजवे मग
की तेही वाटेवरचे आभासच.....
मला वेड लागले.....
१४ फेब्रुवारी जवळ येतोय. माझ्या आवडत्या विषयावर बोलण्याचा दिवस. आता सगळीकडे वातावरण गुलाबी व्हायला सुरूवात झालीय. नव्यानी प्रेम करणारे, प्रेमात पडलेले आणि प्रेम जुनं झालेले असे सगळेच पुढच्या दोन , तीन दिवसात एकदम फुलऑन जागे होतील. व्हॅलेंटाईन डे साजरा करावा की नाही, या वादात आपण नको पडायला. या मताशी मी सहमत आहे की प्रेम करण्यासाठी कोणत्या एका दिवसाची वाट बघण्याची गरज नाही. पण तरीही ते व्यक्त करण्यासाठी एखादा दिवस निवडला तर काय हरकत आहे ? महत्त्वाचं आहे प्रेम व्यक्त करणं.
आशाताई बगेंची एक मस्त कथा वाचली. प्रेमाचा वेगळा अर्थ सांगणारी. ती वाचुन प्रेमाचा अजुन एक अर्थ समजला. संकुचित अर्थानी प्रेम या भावनेकडे बघताच येणार नाही. एका विशिष्ट नात्यात अपेक्षित प्रेम मिळालं नाही तरी वेगळ्या नातेसंबंधातून ते मिळवता येतं. फ्रेमच्या बाहेर जाऊन, निरपेक्ष असं काहीतरी. दुस-याबरोबर स्वतःला घडवणारं प्रेम. या प्रेमाचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे अपेक्षा ठेवण्याची इच्छाच होत नाही. कारण हे प्रेम कोणत्याही फ्रेममधलं नाही. अगदी निरपेक्ष असं जगात काहीच नसतं. पण या नात्यात त्या मानानी त्रास कमी होतो. आपल्याला हवं ते मिळालं तर आयुष्याची मजाच निघुन जाईल. कारण मग काहीतरी हवयं या इच्छेचा प्रवास संपेल. आपण आहोत तोपर्यंत इच्छा आकांक्षांचा हा प्रवास चालु रहातोच. त्या त्या वेळी पूर्ण न झालेल्या इच्छा कधीतरी डोकं वर काढतातच. त्यापेक्षा या इच्छांवर स्वार व्हायचं, आपण करत असलेल्या कामामधून. आजुबाजुला अशा अनेक गोष्टी, व्यक्ति असतात ज्या आपल्या त्या इच्छेपेक्षा कितीतरी पट महत्त्व द्याव्यात अशा असतात. कारण जगायचं तर आनंदानी असं एकदा ठरवलं की मग जगावर न रागवता प्रेम करावं अशा अनेक गोष्टी मिळतात.
मला वेड लागले प्रेमाचे.... असा भाव एकाच व्यक्तिपुरता ठेवला तर अपेक्षाभंगाचं दुःख वाट्याला येऊ शकत. असं कोणी मिळालं आणि अपेक्षांची पुर्तता झाली तर प्रश्नच नाही. पण ब-याचदा असं होत नाही. पहिलं प्रेम, दुसरं प्रेम, तिसरं प्रेम असं काही नसतं . प्रेम हे प्रेम असतं, आपण गल्लत करतो ते एका ठराविक दृष्टीने त्याकडे बघुन. रस्त्यावरच्या कुत्र्याच्या छोट्याशा पिलाला थंडी वाजत असेल तर त्याच्या अंगावरून प्रेमानी हात फिरवणं, ज्यांना दोन वेळेस अन्न मिळत नाही अशा आपल्याच समाजातील काही लोकांसोबत सण साजरे करणं (फोटो काढुन घेण्यासाठी नाही), वृध्दाश्रमातल्या आजी आजोबांना वेळ देणं (देणग्या नाही), ओझं घेऊन जाणा-या एखाद्या कष्टक-याला मदत करणं, सगळ्यांकडे माणुसकीच्या नात्यानी पहाणं, आपण करत असलेल्या कामावर प्रेम करणं , आपलं एखाद्यावर प्रेम आहे का नाही याचा विचार न करता त्याला त्रास न देता त्याच्या सुखात आनंद मानणं याला प्रेमच म्हणतात ना ? मग असं प्रेमाचं वेड लागलं तर काय हरकत आहे ? हरिवंश राय बच्चन यांची ही कविता असं प्रेम करणा-यांसाठी आणि करू इच्छिणा-यांसाठी
प्यार किसी को करना लेकिन, कह कर उसे बताना क्या,
अपने को अर्पण करना पर, और को अपनाना क्या.
ले लेना सुगंध सुमनों की, तोड उन्हे मुरझाना क्या,
प्रेम हार पहनाना लेकिन,प्रेम पाश फैलाना क्या.
त्याग अंक में पले प्रेम शिशु,उनमें स्वार्थ बताना क्या,
दे कर हृदय हृदय पाने की, आशा व्यर्थ लगाना क्या....
आई होण्याआधी, झाल्यावरही...
एक सिरिअल म्हणून व्हॉट्सअॅप वर सगळीकडेच खुप टिंगल केली गेली अशी सिरिअल म्हणजे होणार सून मी.... याविषयी अनेकांची वेगवेगळी मतं असतील. काहींना ती सिरिअल, त्यामधली पात्रं खूप आवडतही असतील. माझ्या आजच्या ब्लॉगचा विषय तो नाही. पण परवाच्या एपिसोडमध्ये एक कमाल सीन दाखवला. खरच कमाल. आपली बायको आपल्या बाळाला जन्म देत असताना वेदना होणारा नवरा सिरिअलमध्ये दिसला. खुप बरं वाटलं.
हे एक निमित्त झालं . पण त्या निमित्तानी डोक्यात विचार सुरू झाले. बाळ हे दोघांच असतं . पण निसर्गनियमानुसार भोगावं लागतं आईला. अर्थात हे भोग ती आनंदाने भोगते. हे भोग आहेत, दुःख आहे असं तिला कधी वाटतच नाही. आपल्या जीवातून दुसरा जीव जन्माला घालणं ही अदभुत गोष्ट आहे. हे वरदान फक्त स्त्रियांनाच मिळालं आहे. त्यासाठी परमेश्वराचे आभार मानावेत तेवढे थोडे आहेत.
मुलाची चाहुल लागल्यापासून त्याला जन्म देईपर्यंत आई कितीतरी दिव्यं पार करत असते. तिचं आयुष्यच बदलून जातं. स्वतःसाठी काहीतरी करणारी ती आपल्या पिलासाठी जगू लागते. आई कितीही आधुनिक विचारांची असली तरी आपल्या होणा-या मुलाबाबत ती तितकीच सेंटी असते, किंबहुना तिने असलं पाहिजे. शिक्षण, नोकरी या धबडग्यात लग्न, संसार, मुलं होणं या आनंदापासून आपण वंचित रहात नाही आहोत ना ? याचा विचार आत्ताच्या पिढीनी करायला हवा. या संदर्भातले सगळे प्रॉब्लेम्स योग्य वेळी, योग्य गोष्टी न केल्यानी होतायत असा निष्कर्ष पुढे येतोय. नोकरी आणि करिअर हे महत्त्वाचं आहेच. पण आई होण्याचा आनंद त्यापेक्षा कितीतरी मोलाचा आहे. स्वतःपुरतच जगण्यात काय अर्थ? समाजाला एक आदर्श, सुजाण, सुशिक्षित नागरिक देणं हीसुध्दा आपली जबाबदारी आहे. विशेषतः बुध्दिजीवी पिढीची नितांत गरज आहे. त्यामुळेच दात आहेत तिथे चणे नाहीत , चणे आहेत तिथे दात नाहीत अशी अवस्था झालीय.
एकीकडे हा प्रश्न आहे, तर दुसरीकडे कमी होत चाललेली आपुलकी. मुलं जर दोघांच आहे, किंबहुना सगळ्या घराचं आहे तर त्या आईची काळजीदेखील सगळ्यांनी घेतली पाहिजे. विशेषतः तिच्या जोडीदारानी. या दिवसांमध्ये होणारी भावनिक आंदोलनं, चिडचिड, वेदना, अवघडलेपणा समजुन घेतला पाहिजे. ही वेदना शेअर करता येत नाही. पण मी तुझ्यासोबत आहे असा आधार तरी देता आला पाहिजे. कारण या वेदना फक्त ती आईच जाणू शकते. भक्कम मानसिक आधारानी ती ही वेदना सहन करते. सिरिअलमध्ये दाखवलेला श्री फारच अति आदर्श वागतो. पण आपल्या बायकोच्या बाळंतपणात तिची वेदना शेअर करणं अति वाटत नाही. किंबहुना ते आवश्यक वाटतं. खात्या, पित्या घरच्या गरोदर स्त्रियांचे लाड होत असतीलही. पण आजही मोलमजुरी करून बाळाला जन्म देणा-या कुपोषित माता आहेतच. आजही मुलीची गर्भ असेल तर गर्भपात करून घे असं म्हणणारे बाप आहेतच की. त्यांच्या नशीबात दोन वेळचं अन्न सुध्दा नाही, तर प्रेमळ आणि इतकी काळजी घेणारा नवरा शक्यच नाही. स्त्रिच्या या नव्या पर्वाच्या सुरूवातीला त्यानी तिच्याजवळ असणं must आहे. तिला होणारा त्रास त्याला समजणं गरजेचं आहे. निरोगी बाळाला जन्म देण्यासाठी पोषक आहाराची जितकी गरज आहे तितकीच पोषक मानसिकतेची सुध्दा आहेच. तिच्या मनाला होणारा आनंद होणा-या बाळाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचा आहे.
ही फेज अजून ज्यांच्या आयुष्यात यायची आहे त्यांनी याचा विचार करावा. ज्यांच्या आयुष्यात ही फेज येऊन गेलीय, त्यांनी आपल्या बाळाच्या आईची काळजी घ्यायला हवी. निदान उरलेल्या आयुष्यात तरी पोषक मानसिकता जपण्याचा प्रयत्न करायला हवा. तरच आत्ताची पिढी अधिक संवेदनशील, सजग आणि सुजाण होईल.