नवा संकल्प ......
गेलं वर्षभर किती कोसळलास. सगळे अगदी वैतागले इतका. पण मी तुझ्याकडे लक्ष दिलं
नाही. मी माझ्यातच मशगुल. खर सांगू का रे, तस सुद्धा नव्हत. मी माझ्यात मशगुल
नव्हते. मी माझ्यातच नव्हते. कुठे होते? शोधते आहे स्वत:ला. माझं आणि तुझं नात
फक्त मला आणि तुलाच माहिती आहे. मला ते तसच हवंय. या वर्षी वारंवार तू आलास रे. पण
मी ? काय चालू होतं माझं? जगरहाटी प्रमाणे सगळ काही चालू होत. पण जगण्यातला
अस्सलपणा तो कुठे तरी हरवला होता.
मी जरा विचित्र आणि हट्टी आहे. माझ्या मनातला कचरा साफ करण्यासाठी तू किती
प्रयत्न केलेस. त्या पायी सगळ्यांच्या शिव्या सुद्धा खाल्ल्यास. आज सुद्धा खाणार
आहेस. पण माझ्या विचित्र वागण्याने मला तुझा इशारा कळलाच नाही. माणसांमध्ये
अडकलेल्या खोट्या कल्पना विश्वात मी इतकी रममाण झाले की आपल्यामध्ये असलेल्या
अव्यक्त नात्याचा मला विसर पडला. पण एक गोष्ट सांगते हा तुला, मी हे मुद्दाम नाही
केलं. दिवस कुठे उजाडला आणि कुठे मावळला कळत नव्हत. सोबत होत एक बोजड ओझं. वाकून
आणि दमून गेले. गेल्या काही दिवसांमध्ये मला हे प्रकर्षाने जाणवलं आहे की, मी खूप
दुखावलं आहे तुला आणि स्वत:ला. न सुटणारी कोडी सोडवत बसले आणि उगाच कष्टी होत
राहिले.
आज तू पुन्हा आलास. अगदी अवेळी.
पुन्हा सगळ्यांच्या शिव्या खायला. एक भयानक विषाणू धुमाकूळ घालतो आहे आणि त्यात तू
आलास. सगळे म्हणतात तू हा आजार अजून वाढवणार. पण अगदी खर सांगू, मला नाही वाटत तस.
कारण साचलेलं सगळं वाहून नेण्यासाठी येतोस तू. आत्ता सुद्धा तू तसच कर. माझ्या
मनातील विचारांचा सुगावा तुला कसा लागती माहिती नाही. पण आज एक वेगळाच सूर मनात
उमलला आहे. त्याचं सुरेल गाणं करायचय मला. माझ्यात दडलेल्या मला शोधून काढायचं
आहे. अर्थात हे श्रेय तुला. ज्याच्याकडे हरण्यासारखं काहीच नसते तो जिंकतो. तू असच
सांगतोस न मला नेहमी? आपल्या आनंदाचा रिमोट दुसऱ्याच्या हातात देऊ नकोस. तू नेहमी
सांगतोस मला. संवाद माझ्याकडून कमी झाला. तो वाढवण्यासाठी आज तू आलास. कोणताही
अहंकार न बाळगता. नाही तर अहंकारी लोकांचाच पसारा आहे रे सगळा. मध्यंतरी मला कोणी
तरी म्हणल, तू डोक्याने विचार करू लागलीस. तुझा तो वेडेपणा कुठे गेला? ठेहेराव हवाय अस सुद्धा कोणी तरी म्हणल. सगळं
संपल आहे असं वाटतं तेव्हा’ नव्याने फुलवणारा जादुगार आहेस तू. तापलेल्या धरणीला
शांत करणारा सखा आहेस तू. वठलेल्या वृक्षांना नवी पालवी फुलवणारा आहेस तू. तुझ्या संगतीचा इतका परिणाम व्हायला हरकत नाही,
नाही का?
आज प्रकर्षानी जाणवलं ... नव्या वर्षी नवा संकल्प... मस्त असत वेडेपण, स्वस्त असत वेडेपण...