‘कंटाळले मी आता या
आयुष्याला. कोणासाठी आणि का जगू? त्यापेक्षा मी स्वत:ला संपवते. फक्त नक्की संपेल
ना हा त्रास? निदान मेल्यावर तरी… हो , नक्कीच संपेल. आप मेला
जग बुडाला, मला काय मग जगाची पर्वा. माझी कोणी केलीय? या सगळ्या गोळ्या घेते आणि
संपवते सगळं.’
डोक्यातले विचार थांबून
एकाच विचाराचं गारुड निर्माण झालं होतं. सगळं संपवायचं. तिचं आजूबाजूला लक्ष
नव्हतं. तसं तिथे कोणीही नव्हतच म्हणा.
पण अचानक खिडकीवर बसलेला एक
सुंदर पक्षी म्हणाला, ‘काय करते आहेस? म्हणजे इतक्या गोळ्या एकदम?’
ती चक्रावली, देव या
संकल्पनेवर तिचा फार विश्वास नव्हता. पण हिंदी सिनेमामध्ये दाखवतात तसा देव
प्रकटला की काय, असं वाटून चमकून तिने पाहिलं. चक्क तो पक्षी बोलत होता तिच्याशी,
‘तुला काय करायचंय?’
‘मी स्वत:ला संपवणार आहे.’
‘का?’
‘कारण …. कारण…… ज्या ज्या
लोकांवर विश्वास ठेवला आणि प्रेम केलं त्यांनी मला दुखावलं’
‘ बरं मग? त्यात काय?’
‘त्यात काय? म्हणजे तुला माझ्या भावना कळत नाहीयेत कदाचित. मी इतकी
शिकलेली, संवेदनशील आणि हुशार. माझ्या वाट्याला हा अपमान. मला नाही सहन होत. खूप
राग आलाय मला. ’
‘कोणी केला तुझा अपमान?’
‘सगळीकडून
होतोय. घरी – दारी. किंमत नाहीये या लोकांना माझी. घरात सगळ्याचं सांभाळून घडवलं
आहे मी माझ करिअर. जिथे काम करतीय तिथे सुद्धा मन लावून, जीव ओतून केलंय आजवर.
त्याची ही फळं?’
‘फक्त
यामुळे इतका टोकाचा विचार?’
‘तू
कोण ठरवणार हे? हे फक्त आहे का? अजून पण आहे खूप…’
‘बर
मग सांग तरी’
‘आपली
म्हणवणारी माणस असं कस वागू शकतात? मी तर मुद्दाम कोणाला दुखवायला गेले नाही मग माझा
अपमान करायचा अधिकार यांना कोणी दिला? आणि एक सांगू, एखाद्या वेळी झालं असत तर मी
सुद्धा इतका टोकाचा निर्णय नसता घेतला. पण हे आता रोजचं झालंय. मी कशी चुकीची आहे,
मला कस काहीच कळत नाही, मी जे करते ते काही उपकार करत नाही, गेलीस उडत –
तुझ्यावाचून काही अडत नाही.. हे असल बोललं जातं मला. कोणासाठी करते इतक सगळं? घरात
अशी तऱ्हा आणि बाहेर केलेल्या कामाचे पैसे देतात म्हणून काय वाट्टेल ते बोलायचं?
यांना काय करायचंय माझ्या personal आयुष्यात काय चालू आहे?’
‘पण
जर तुला माहिती आहे, तर का इतका त्रास करून घेतेस ?’
‘होतोय
त्रास, करून नाही घेते. आणि हा त्रास असा नाही संपणार मी
गेल्याशिवाय.’
‘बर
मग तू गेल्यानी सगळं बदलेल ना?’
‘ते
मला नाही माहिती. पण नाही समजू शकते मला कोणी. किती सांगायचा प्रयत्न केला तरी.’
‘मला
एक सांग, तु तुला समजू शकते आहेस न?’
‘म्हणजे
काय? हो.’
‘त्रास
कोण देतंय?’
‘सगळे’
‘कोण
करून घेतंय?’
‘मी’
‘मी
तुला म्हणतो, वेडी आहेस तू , आयुष्यात काही नाही करू शकलीसआणि
करू शकणार पण नाहीस’
‘Mind your language, तुला कळतंय का काय बोलतो
आहेस ते? अस अजिबात नाहीये. कोणी काहीही बोलावं आणि मी ऐकावं याला काय अर्थ आहे.’
‘तुझ्याच भाषेत बोलायचं तर,
there you are … तुला कळतंय की माझ्या बोलण्याला इतकं महत्त्व द्यायची गरजच नाहीये. तेच सगळं तू
इतर लोकांच्या बाबत का नाही करत मग?’
‘तुझा
आणि माझा काही संबंध नाही ना.. पण बाकीच्या लोकांचं तसं नाहीये.’
‘म्हणजे
त्यांचा आणि तुझा संबंध आहे तर’
‘होच
म्हणजे’
‘मग
ते बोलले तर इतकं का रागवायचं?’
‘याला
काय अर्थ आहे? आपले असले म्हणून वाट्टेल ते बोलतात, असं कस चालेल?’
‘जर
ते तुझे आहेत, तर त्यांनी असं काही करायला नको, हा एक मुद्दा. दुसरं,
जर तुला ते आपले वाटतात तर त्यांचं बोलणं मनावर लावून घ्यायला नकोय’.’
हळू
हळू त्याच्या बोलण्यात तिला तथ्य वाटू लागलं.
‘हे
बघ, आपली माणस म्हणजे असं आपल्याला वाटत असत… जाऊदे… हा तर आपली माणस बोलली तर इतक चिडायचं कारण
नाही. आणि जी आपली नाहीत, म्हणजे माझ्यासारखी ती बोलली तर मघाशी जस मला ignore केलस तसं करायचं.’
‘पण
मग अपमान आणि राग त्याच काय?’
‘इथे
एक गम्मत सांगतो ऐक, राग काय किंवा कुठलीही भावना आपल्याला गुलाम बनवते. म्हणजे
राग म्हणेल तसं आपण करतो. म्हणजे तु गुलाम आहेस का?’
‘अजिबात
नाही, मला गुलामीचे जोखड मान्यच नाहीत’
‘Good, मग कोणाचीच गुलाम नको बनू. न व्यक्तीची, न भावनेची, स्वत: मालक
हो. म्हणजे बघ आपण क्रिया करतो तेव्हा आपण मालक असतो आणि आपण प्रतिक्रिया देतो
तेव्हा आपण गुलाम बनतो त्या भावनेचा. आपल्याला गुलाम बनवायला रोज नवीन जाळ तयार
केलं जातंय. पण गुलाम न होता क्रिया करता यायला हवी. आम्ही पक्षी बघ घरट अगदी
कष्टाने विणतो. पण ऊन, वारा, पाउस यामुळे घरट पडलं तर पुन्हा त्याच जोमाने नवीन
घरट बांधतो.’
‘तुम्हा
पक्षाचं बर आहे रे, तुम्हाला काय येत नाही depression वगैरे.’
‘वेडी
आहेस, अस अजिबात नाही. भावना आम्हाला सुद्द्धा आहेतच की, पण आम्ही गुलाम बनून राहत
नाही तुम्हा माणसांसारख. एक गोष्ट सांगतो तुला, एक वकील होते, अगदी
निष्णात वकील. त्यांना केस लढत असताना
कोटाच्या बटणाशी खेळण्याची सवय होती. त्या सवयीने ते केस जिंकत होते का?
तर नाही. त्यांना ती सवय लागली होती. पण त्यांची ही सवय त्यांच्या विरोधकांनी
हेरली. पैसे देऊन त्यांच्या Assistantला ते बटण काढायला लावलं. वकील
साहेब कोर्टात उभे राहिले आणि मग त्यांच्या हे लक्षात आलं. पण त्यावेळी ते काहीच
करू शकत नव्हते. ते अस्वस्थ झाले आणि घाम फुटला त्यांना. मटकन खाली बसले आणि चक्क
केस हरले.’
‘कस
काय पण? इतकं काय त्या बटणाच?’
‘हा…
हे तुला आणि मला वाटतय, पण त्यांना त्या सवयीने पूर्ण
व्यापलं होतं. परिणाम एकच झाला. इतके मोठे वकील पहिल्यांदाच केस हरले.’
‘बापरे,
कसं न दुर्दैव?’
‘दुर्दैव?
मला नाही वाटत.’
‘मग
तुला काय म्हणायचं आहे?’
‘ती
सवय, त्या सवयीची त्यांनी पत्करलेली गुलामी. यामुळे झालं सगळ. आपण सगळ करावं. अगदी
काहीही, पण कशाचाही गुलाम न बनता. आयुष्यात आनंदी रहाव असं बरच काही आहे.
करण्यासारख काही नाही ही भावना पण त्रासदायक आणि खूप काम आहे म्हणून येणारा ताणसुद्धा
त्रासदायक. या त्रासाची गुलामी नाही स्वीकारायची. कारण स्वत:ला हरवून मिळवण्यासारखं या जगात
काहीही नाही.’
तिने
त्या गोळ्या बाटलीत केव्हा भरल्या तिचं तिलाच समजल नव्हतं. एकाच या जन्मी जणू
फिरुनी नवी जन्मेन मी… असं गुणगुणत टी उठली, आल्याचा चहा करायला. खिडकीवर तो सुंदर
पक्षी नव्हता… उडून गेला मुक्तपणे उडण्यासाठी.