युगायुगांचे नाते
आपुले नको दुरावा.....
प्रेमाची गरज नाही
असा जीव पृथ्वी वर असणं जरा दुर्मिळच नाही? पण तरी आपण म्हणजे समाज प्रेमाला विरोध
करतोच. स्वधर्मीय, स्वजातीय प्रेम चालतं. लग्नाआधी केलेलं प्रेम allowed आहे. आजही
प्रेम करण्यासाठी जात, धर्म, पंथ, वय, single असणं आणि gender याचा विचार केला
जातोच. जग खूप पुढे गेलंय असं आपण म्हणतो. काही बाबतीत हे मान्य करता येईलही. पण
आजही समाजात प्रेम या सहज सुंदर भावनेवर खूप बंधन आहेत. निरपेक्ष, जीवापाड प्रेम
हे शब्द पुस्तकात वाचायला छान वाटतात. प्रत्यक्षात असं फार दुर्मिळ झालंय.
एरवी प्रेमावर
भरभरून लिहिणारी मी आज अक्षरशः स्तब्ध झाले. खऱ्या प्रेमाची एक खूप छान आणि खरी गोष्ट
वाचली. शर्मिला या माझ्या पत्रकार मैत्रिणीनी एक लेख share केला होता, माधुरी
सरोदे आणि जय शर्मा यांच्या प्रेम कहाणीचा. तुम्ही म्हणाल त्यात काय मग इतकं
स्तब्ध होण्यासारखं? normal प्रेम कहाणीपेक्षा एक वेगळी गोष्ट या दोघांच्या बाबतीत
आहे. माधुरी तृतीयपंथी आहे. Transgender, TG, तृतीयपंथी हे सगळं सिनेमात आणि फार
तर ट्रेनमध्ये प्रवास करताना आपण पाहतो. आपल्यापैकी किती लोकांना या सगळ्यांच्या
भावना, मन आणि जीवन माहिती असतं... घरातल्या आणि अगदी जवळच्या मित्र मैत्रिणींना
समजून घ्यायला आपल्याला वेळ नाही, इच्छा नाही. असं एक वेगळ जीवन जगणाऱ्या लोकांशी
आपला काय संबंध? संधी मिळेल तेव्हा टिंगल करण्याशिवाय, घाबरण्याशिवाय आणि
विचित्रपणे बघण्याशिवाय काय करतो आपण? जाती-धर्मा बद्दल बोलताना आपण बोलतो, आपण
सगळे ईश्वराची लेकरं आहोत. मग हे TG त्याचीच लेकरं आहेत ना?
माधुरी आणि जय यांनी
आपल्या आगळ्या वेगळ्या प्रेम कहाणीला सत्यात उतरवलं. अगदी normal लग्न होतात तस
त्याचं लग्न झालं. आंतरजातीय विवाह केला तर त्याचे पडसाद किती तरी काळ भोगावे
लागतात. मग या जोडप्याला समाजाचा किती विरोध पत्करावा लागला असेल. TG सोबत live in
मध्ये राहणं किंवा वासना पूर्ण करण्यासाठी त्यांचा वापर करणं हे अगदी common आहे.
पण TG वर मनापासून प्रेम करणं आणि ते निभावणं हे किती वेगळ आहे. आपल्यावर प्रचंड
प्रेम करणारा, आपली काळजी घेणारा, सन्मानानी वागवणारा नवरा जय च्या रुपात माधुरीला
मिळाला आणि स्वत:ला विसरून प्रेम देणारी, जोडीदारासाठी वाट्टेल ते करणारी आणि
त्याच्या घराला आपलं म्हणणारी माधुरी जयला मिळाली. त्यांच्याविषयी वाचताना, you tube
वर त्यांचे videos पाहताना कुठेही काहीही odd वाटलं नाही.
युगायुगांचे नाते
आपुले नको दुरावा, सहवासाची ओढ निरंतर नको दुरावा.... हे गाण ते दोघ जगतायत. आपल्याला हवं तसं
वागण्यासाठी जी किंमत द्यावी लागते आहे, ती हे दोघं आनंदानी आणि एकमेकांच्या साथीनी
देत आहेत. प्रत्येक जीवाला प्रेम मिळवण्याचा अधिकार आहे. हे पुस्तकी वाक्य जगून
दाखवत आहेत. जय म्हणतो, “नवरा म्हणून जी कर्तव्य असतात ती सगळी मी पार पाडेन आणि
माधुरीला सुखी ठेवेन.” तर माधुरी म्हणते, “जयच्या सुखात माझं सुख मानेन. TG
लोकांना स्त्री म्हणून जगण्याचा अधिकार कोर्टानी दिला आहे. पण सामान्य स्त्री सारखं
लग्न व्हाव आणि संसार करावा हा अधिकार अजूनही मिळाला नाही. त्यामुळे marriage certificate
मिळवून मुल दत्तक घेणं ही लढाई अजून बाकी आहेच.”
प्रेमात अहंकार, मी
पणा, अपेक्षा गळून जाव्यात आणि आपल्या जोडीदाराच्या सुखात आपलं सुख मानावं हे
फिल्मी संवाद जगणाऱ्या जय आणि माधुरीला प्रेमभरा सलाम......
डॉ. विनया केसकर
डॉ. विनया केसकर