Thursday, 7 June 2018


नेहमी आनंदी रहा...




आपलं आयुष्य क्षणभंगुर आहे असं म्हणतात. सुख सुध्दा  क्षणभंगुर  आणि दुःख सुध्दा. म्हणजे काय झालं... काल एका पुस्तकात मी वाचलं की, सुख मिळवण्याच्या आपल्या सगळ्या कल्पना खोट्या ठरतात. म्हणजे एकच वस्तू एकाला  सुखस्वरूप तर,     दुस-याला दुःखस्वरूप वाटते. हे वाचून मी एकदम विचार करायला लागले. म्हणजे, सगळा गोंधऴच आहे म्हणायचा.पण नीट विचार केल्यावर जाणवलं,  हे सगळ अगदी खरं आहे. कारण असे अनुभव आपण सगळे सुध्दा घेतोच की. पण हे सगळ मान्य करणं थोड जड जातं. कारण आपल्याला आपलं दुःख मोठ वाटत. पण आपल्याला दुःख मिळाल्याने कोणाला तरी आनंद झालाय, किंवा सुख मिळालय अशी कल्पना आपण कधी करतो का ?
 अगदी साधी गोष्ट .... बसमध्ये बसायला जागा मिळाली नाही तर आपली किती चिडचिड होते. पण जेव्हा आपण निवांत हेडफोन कानात घालून , गाणी ऐकत बसलेले असतो, तेव्हा उभ्या असणा-या माणसांकडे आपण बघून न बघितल्यासारख करतोच ना. हे सगळं खूप नॅचरल आहे. कारण प्रत्येक वेळी उठून जागा देणं शक्य नसत. दर वेळी मीच का ?  असे प्रश्न पडू शकतात. पण हाच प्रश्न जेव्हा आपण उभे असतो, तेव्हा बसलेल्याला पडत असेल ना ? आपल्याला मिळणा-या सुख दुःखाला एका वेगळ्या पातळीवर जाऊन बघण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण सामान्य माणसं आहोत. त्यामुळे सुख मिळाल्यावर आनंद होणं आणि दुःख  झाल्यावर वाईट वाटणं स्वाभाविक आहे. पण फक्त त्या सगळ्याचा किती त्रास करून घ्यायचा हे ठरवायला हवं. नाहीतर एखाद्याने ठरवल्याप्रमाणे फोन न केल्यानी किंवा भेटायला न आल्यानी प्रचंड डिप्रेशन यायचं कारण नाही. थोडसं लेट गो करायला शिकलं पाहिजे. कल्पना करून त्याचं सुख, दुःख बाळगणं चूक आहे. कारण कल्पनेचं खरे खोटेपण अनुभवांती कळतं. एखादी आनंद देणारी वस्तू, व्यक्ति कायम तशीच रहाते का ? तर नाही. कारण अमुक एक वस्तू किंवा व्यक्ति आपल्याजवळ आहे , म्हणून आपण सुखी आहोत. ही संकल्पना बदलायला हवी. शाश्वत आणि स्थिर असं काहीच नसलं तरी जीवनातला आनंद शोधला पाहिजे. कारण आपण इथे आनंदी रहायलाच आलोत. हो ना ? 

थोडं समजून घे ना यार मला... 


थोडं समजून घे ना यार मला... अगदी सगळ्या नात्यांमध्ये नेहमी वापरलं जाणारं हे वाक्य आहे. मित्र - मैत्रिणी, नवरा – बायको, आई – मुलं, ऑफिस मधले सहकारी - बॉस, कुटुंबीय किंवा अगदी देवाला सुद्धा आपण सगळे असं म्हणतो.
काय असतं हे समजून घेणं. आपल्या मनासारखं समोरच्यानी वागणं म्हणजे समजून घेणं का? पण अगदी आपल्या मनासारखं सगळं चालू असलं तरी समजून घेतलं जातंच असं सांगता येत नाही. कारण या मनात नेमकं काय चालू आहे हे त्या – त्या व्यक्तीला तरी कळत का? एका क्षणापूर्वी आनंदानी बागडणारं मन दुसऱ्याच क्षणी निराशेच्या गर्तेत जातं. या दोन क्षणांमधल्या अंतरात काही तरी असं घडतं जिथे समजून घेण्याची नितांत गरज असते. मग ते समजून घेणं आपल्या मनासारखं वागणं असतं असं नाही. कारण प्रत्येक वेळी आपल्याला जे वाटतं ते योग्यच असतं असं नाही. त्यावेळी हवा असतो एक मानसिक आधार, ‘ठीक आहे यार... बोलू नंतर’ असं म्हणणारा.
कारण तो क्षण निघून गेल्यावर कळत आपलं आपल्याला. पण तेव्हा कोणी स्वत:च (कितीही खरं असलं तरी) घोडं दामटायला लागलं की मग त्रास होतो. Actually आपल्याला खरं समजून घेणारे लोक असं वागत नाहीत. पण खरच, आपल्याला कोणी समजून घेत का? बऱ्याचदा या एका क्षणाच्या आतीतायीपणामुळे सगळे प्रश्न निर्माण होतात. अर्थात या सगळ्या गोष्टी आपल्यालाही लागू आहेतच.
बरेचसे छोटे – मोठे वाद या एका क्षणाच्या समजून घेतल्यानी टळू शकतात. कारण वादामुळे कटुतेशिवाय काहीही मिळत नाही. रागाच्या भरात जे बोलू नये ते बोललं जातं, मनं दुखावली जातात. मनात चाललेली विचारांची वादळं जास्तंच घोंघावू लागतात. काही वेळा ही वादळं छोटं नुकसान घडवतात तर काही वेळा माणूस म्हणून संपवतात. हे सगळं टाळता येईल का?  मान्य आहे की प्रत्येक वेळी हे समजून घेणं शक्य नाही. पण थोडा विचार करून समजून घ्यायला काय हरकत आहे?