Saturday, 24 February 2018

हवाहवाई.....



आज मी खूप ऱडले... कोणाला कळेल असं नाही... आतल्या आत...नेहमी आनंदी रहा असं म्हणणारी मी आजची घटना डील करू शकले नाही. आज माझी सर्वात आवडती अभिनेत्री गेली.. हो.. श्रीदेवी गेली.. काही लोक नकळत आपल्या आयुष्याचा भाग होतात. प्रत्यक्षपणे involved असतातच असं नाही. श्रीदेवीचं आणि माझं असंच काहीसं नातं होतं. अगदी पाचवीत असल्यापासून मी तिची फॅन आहे. काही वेळा तिच्या आवाजावरून तिची टिंगल करणा-या माझ्या अनेक मैत्रिणींना मी गप्प केलं आहे. 
ती या जगात  नाही हे जेव्हा मला कळलं तेव्हा खूप पोकळी निर्माण झाल्यासारखं वाटलं. इतक्या सगऴ्या अभिनेत्रींमध्ये मला तीच का आवडते माहिती नाही .अगदी सुरूवातीच्या काळातले तिचे सिनेमे असो की इंग्लिश विंग्लिश असो सिनेमात श्रीदेवी आहे म्हणून मला तो आवडायचा. तिचे डोळे, तिचा चेहरा, तिचा डान्स सगळच लाजवाब. सौंदर्य आणि अभिनय याचा ती सुंदर मिलाफ होती. काही वेळा मला चिडवायचे सुध्दा, खरं तर एखादा हीरोदेखील आवडायला हरकत नव्हती. पण श्रीदेवीइतकं मला कधीच कोणीही आवडलं नाही. 
मला आठवतय पाचवीपासून मी तिचे वेगवेगवळे फोटोज जमा केले होते. आम्हा मैत्रिणींमध्ये डिलही व्हायचं. माझ्या एका मैत्रिणीला अमीर खान खूप आवडायचा. मला श्रीदेवी. मग माझ्याकडे अमीर खानचे फोटो असतील तर मी तिला द्यायची आणि तिच्याकडे श्रीदेवीचे असतील तर ती मला द्यायची. पण त्यामध्ये २ अमीर तर ४ श्रीदेवी असं असायचं. आत्ताही हे सगळं लख्ख आठवतय. मला ती आवडायची , पण तिला प्रत्यक्ष भेटावं असं कधी नाही वाटलं. तिचा सदमा हा सिनेमा मी ८ वेळा पाहिलाय. ''हरिप्रसादको पट्टा मिलेगा''  म्हणणारी निरागस श्रीदेवी आणि सिनेमाच्या शेवटी ट्रेनमध्ये बसून जाणारी सुंदर श्रीदेवी.. लाजवाब अभिनय... अर्थात या सगळ्यात कमल हसनचाही वाटा आहे. 
वैयक्तिक आयुष्यात इतकी दुःखी असणारी ही अभिनेत्री पडद्यावर किती Full of life होती. परवाच तिचा चांदनी पुन्हा एकदा पाहिला. भुरळ पाडणारं  नैसर्गिक सौंदर्य, निरागसपणा, तितकाच खोडकरपणा, आर्मीमधला तिचा सूड घेण्याची इच्छा असणारा चेहरा, सदमा मधला भाबडेपणा, हवाहवाई म्हणून तिनी केलेली जादू, चालबाजमधला डबल रोल अशी कितीतरी  रूपं धडाधड डोळ्यासमोर तरळून गेली. 
पण एक बरं वाटलं श्रीदेवीला खितपत राहून मृत्यू आला नाही. सतत हसणारी श्रीदेवी हसतमुखानीच गेली. ''ना जाने कहा से आयी है ना जाने कहाको जायेगी... दिवाना हमे बनायेगी ये लडकी'' असं तिचे रसिक आजही म्हणतील. पण तिचं तिनी खरं केलं..'' किसीके हात ना आयेगी ये लडकी... ''
तिची आठवण माझ्यासारख्या असंख्य रसिकांच्या मनात कायम रहाणार आहे. त्या  आठवणींच्या रूपात ती जिवंतच असणार आहे.... 

Tuesday, 13 February 2018


या जन्मावर शतदा प्रेम करावे...




आज प्रेमदिन आहे आणि आज काही लिहावं वाटू नये असं होऊचं शकत नाही. ‘पीनेवालो को पिने का बहाना चाहिये’ तस आहे. प्रेम या भावनेवर लिहिण्यासाठी कोणत्या दिवसाची गरज काय? पण तरी आज प्रेमदिनाच्या दिवशी काही तरी लिहावं असं मनात आलं. प्रेम या भावनेवर प्रेम करावं असं मला नेहमी वाटत. व्यक्तीवर केलेल्या प्रेमाला खूप मर्यादा आहेत. मुळात संपूर्णपणे आपली वाटावी अशी व्यक्ती मिळणच दुरापास्त. फार कमी नशीबवान लोकांना असं प्रेम मिळतं. पण असं प्रेम मिळाल नाही तर .... आयुष्यात इतर अनेक गोष्टी आहेत ज्यावर आपण प्रेम करू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं आपल्या स्वत:च्या जीवनावर, जगण्यावर प्रेम करणं.
काल एक खूप छान गोष्ट समजली. चित्रकार जेव्हा चित्र काढतो तेव्हा तो त्याच्या मनातले विचार चित्रातून मांडत असतो. चित्रकाराच्या मन:स्थितीचं, विचारांचं चित्रण त्या चित्रात असतं. खर तर प्रत्येक कलाकृतीचं तसच आहे. पण चित्राच्या बाबतीत काल एक खूप छान गोष्ट समजली. जी आपल्या जीवनात लागू पडते. माझ्या एका चित्रकार मित्रानी सांगितलं, ‘जेव्हा एखाद चित्र up to the mark होत नाही किंवा अगदी साध्या भाषेत बिघडतं तेव्हा ते चित्रं दुरुस्त करणं फार कमी चित्रकारांना जमत. बऱ्याचदा कॅनवास फेकून देण्याकडे कल असतो.’ आयुष्यात अशा अनेक गोष्टी घडतात ज्यामुळे आयुष्याचा कॅनवास फेकून द्यावासा वाटतो. पण खरा चित्रकार बनून त्या बिघडलेल्या चित्रावर काम करणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण कॅनवास फेकून देणं तुलनेनी सोपं आहे. एकदा असं बिघडलेलं चित्र पुन्हा एकदा डोळ्यांना आनंद देणारं झालं की त्या चित्राची किंमत काय असेल हे आपण सांगूच शकत नाही.
प्रेमदिनाच्या निमित्तानी हा संदेश मनात कायम मनात ठेवायला हवा. जीवन एकदाच मिळतं, काही कारणांनी ते अगदी नकोसं झालं तरी त्यामध्ये हवेपणाचे रंग भरणं आपलच काम आहे. स्वत:वर, आपल्या जीवनावर प्रेम करण्यानी हे सहज शक्य होईल. कारण प्रेमात खूप ताकद असते. अगदी नव्हत्याचं होतं करण्याची. अनेक वेळा आपल्या मध्ये असणाऱ्या ताकदीचा आपल्यालाच अंदाज नसतो. कारण आपलं स्वत:वर प्रेमच नसतं. सगळ्या जगाची काळजी घेता घेता आपण आपल्याकडे कसं दुर्लक्ष करू लागतो ते कळतच नाही. आज प्रेमदिनाच्या निमित्तानी जगावर प्रेम करता करता स्वत:कडे लक्ष देऊया का?