मन का बोलाविते पुन्हा त्या दिवसाला.........
मला माणसाच्या मनाचं नेहमी कुतूहल वाटतं. एकाच वेळी असंख्य विचारांची गर्दी मनात असते. अगदी आत्ता सुध्दा मी हे लिहिताना आणि तुम्ही हे वाचताना आपल्या मनात कितीतरी विचार आहेत. आहेत ना ? त्यातल्या त्यात मनस्वी लोकांच्या बाबतीत हे आणखीन कठीण होऊन बसतं. कारण मनात आलय तसच वागणं शक्य नसतं. जगाच्या नियमावलीप्रमाणे वागायला गेलं तर घुसमट होते. अर्थात खरे मनस्वी लोक या घुसमटीचा विचार न करता मनाप्रमाणेच वागतात. पंचाईत होते ती माझ्यासारख्या लोकांची आणि मला वाटतं तुमच्यापैकी काही लोक पण यामध्ये असतील. आपलं काय होतं ... आपल्याला मनासारखं वागायचं असत पण आपण समाजाचा फार विचार करतो.
मला नाही आवडत असं कृत्रिम वागायला. पण अगदी खरं सांगु का ? खरं वागलेलं लोकांना चालत नाही. मग उगाच कृत्रिम वागायला लागतं. मॅनर्सचा भाग म्हणे. नुकतीच एका पुस्तकाच्या निमित्ताने डोंगरकपारीत वसलेल्या एका गावात जाण्याचा योग आला. आश्चर्य म्हणजे, तिथे सगऴी माणसं मनस्वी होती. कारण त्यांची मनं निर्मळ होती. एकदम स्वच्छ..... जे मनात आलं ते बोलून रिकामे. किती छान. जगण्याच्या गरजा थोड्या, त्यामुळे मनाचे चोचले नाहीतच. जे आहे त्यात आनंद मानून आयुष्य जगायची कला या लोकांमध्ये मी अनुभवली. खूप हेवा वाटला. आपण नाही असं जगू शकत. कारण आपणच आपल्या जगण्यातला नैसर्गिकपणा हरवलाय. त्या गावात 95 वर्षांच्या आजीला सुध्दा जगण्याची जिद्द होती. जीवावर बेतलेल्या दुखण्यातून ही आजी वाचली आहे. पण तिचा पाठीचा ताठ कणा पाहून मला लाज वाटली. त्या आजीची करडी तरीही प्रेमळ नजर खूप काही शिकवून गेली. तिच्या घरातला दूध न घातलेला कोरा चहा पिऊन फ्रेश वाटलं.
शहरात राहून आपण आपली मनं फार कमकुवत करून घेतोय असं प्रकर्षानी जाणवलं. रिफ्रेश होण्यासाठी हजारो, लाखो रूपये घालवून ट्रीप करण्यापेक्षा अशा खेड्यांमध्ये जाऊन राहिलं पाहिजे. क्षणार्धात जन्मोजन्मीची नाती जोडणारी आणि तरीही विलक्षण अलिप्तता जपणारी ही मंडळी मनाचे डॉक्टर आहेत. नुसत्या एका हाकेवर एकमेकांसाठी धावणारे हे लोक मला फार आवडले. कोणाच्या घरात काय चाललय? कोण गावाला गेलय ? इथपासून कोणाच्या घरात काय भाजी केलीय ? हे सगळ मोकळेपणानी शेअर करणारी ही माणसं मला खूप आवडली. हल्ली आपण सारखं म्हणतो, मनातले विचार शेअर करावेत, त्यानी दुःख हलकं होतं, सुख वाढतं. पण इथे शेअरिंग करा असं वेगळं सांगायची गरजच नाही. सगळ जीवन म्हणजे खुली किताब. किती छान ना ? मोकळा श्वास, मोकळं जगणं. नो लपवा छपवी. काहींना वाटेल की असं एकमेकांच प्रायव्हेट लाईफ कसं शेअर करतात हे लोक? पण त्यापेक्षाअसं म्हणूया की एखाद्याच्या आयुष्यात असं काही असलं आणि त्यानी मनस्वीपणे ते सांगितलं तरी त्याचा बाऊ करून घेत नाहीत हे लोक.
मोकळं जगायला आवडणा-या लोकांसाठी अशी गावं म्हणजे सुखाचं आगर. पण आपल्याला कृत्रिम वागायची इतकी सवय झालीय की अशा गावात आपलं मन फार काळ रमणार नाही. सोयीसुविधांचा अभाव असला तरी मोकळ्या मनानी जगण्यासाठी म्हणावसं वाटतं....... खेड्याकडे चला............या मनस्वी लोकांमध्ये घालवलेला हा दिवस मी विसरूच शकत नाही. पुढे सुध्दा माझं मन मला या दिवसाची साद घालून म्हणेल, मन का बोलाविते पुन्हा त्या दिवसाला.........