समजून घेणे ....
परवा डोळ्यात अंजन घालणारा एक प्रसंग घडला. जेवणाच्या सुट्टीमध्ये आम्ही
ऑफिसमधल्या मैत्रिणी नेहमी प्रमाणे ऑफिस जवळ असणाऱ्या एका छोट्या हॉटेलमध्ये गेलो.
आमचे डबे आम्ही नेतोच. पण तरी ऑफिस मध्येच बसून खाण्याचा कंटाळा येतो. आपलाच डबा
खायचा असतो तर आम्ही तिथे का जातो? हे कोडं आम्हालाही कळत नाही. तो मुद्दा
जाऊदे... मला तुम्हाला वेगळच सांगायचं आहे. आम्ही आत डबा खात असताना त्या हॉटेलच्या
बाहेर आजी बाहेर बसली होती. आजकाल स्टेशन, चौक, रस्त्याच्या कडेला बऱ्याचदा अशी
मंडळी दिसतात. काही वेळा उगाच असं वाटत, सगळेच पैसे मागतात. काही वेळा एखाद्या
व्यक्तीला पैसे देणं शक्य आहे, पण सगळ्यांना पैसे देणं शक्य नाही. खूप वेळा असं
सुद्धा मनात येतं, धडधाकट आहेत, मग काम का करत नाहीत. त्या आजीला हॉटेल बाहेर
बघितल्या पासून हे सगळे विचार मनात आले.
डबा खात असताना सुद्धा तिचा आवाज सारखा कानावर पडत होता. तिला चहा हवा
होता. पण नेमका त्या वेळी चहा नव्हता.
माझ्या डब्यात एक पोळी जास्त होती. अर्थात जास्त होती आणि मला नको होती म्हणून मला
असं वाटलं की, आजीला द्यावी. माझ्या मैत्रिणीनी तिला बाहेर जाऊन विचारलं, “आजी ,
चपाती हवीय का?” तर ती आजी “नाही” म्हणाली. आम्हाला थोडा राग आला. असं वाटलं, काय
हे? चांगली ताजी चपाती देतोय तर नाही म्हणतीय. नेहमी जसे नकारात्मक विचार मनात
येतात तसे आमच्या देखील आले. अन्न दिलं तर नकोय, पैसे हवेत असे शेरे सुद्धा मनात
मारले गेले. बाहेर आल्यावर मी त्या आजींना म्हणलं, “का हो आजी, ताजी चपाती देत
होते तर का नाही घेतली?” आजींनी दिलेल्या उत्तराने मी पुरती ओशाळले. त्या
म्हणाल्या, “अगं पोरी, तुम्ही दिवसभर काम करता. डबा खायला एकदाच मिळतो न्हव का.
त्यातून तुझ्या डब्यातली चपाती घ्यायची म्हणजे तू अर्धवट जेवनार. म्हनून नको म्हनल.”
आजी या कारणासाठी पोळी घेत नसतील याचा विचार सुद्धा मनात आला नव्हता.
नंतर मनात आलं, बऱ्याचदा समोरच्या व्यक्तीला नीट समजून घेण्यात आपण कमी पडतो
नाही? शिक्के मारण्याची ही सवय कमी करत करत जायला हवी. खूप विचार करणारे सुद्धा
कधी कधी असे Judgmental वागतात. समजून घेणे आणि मग मत बनवणे हे कायम करता आलं पाहिजे. या प्रसंगांनी
डोळ्यात अंजन घातलं. खर तर माझा स्वभाव समजून घेण्याचा आहे. पण काही वेळा सुद्धा असं
Judgmental वागणं योग्य नाही. असं आपण
किती वेळा म्हणतो की मला आता maturity आलीय. पण मोठ्या गोष्टी समजून घेणे याला maturity
म्हणत नाहीत तर छोट्या गोष्टी समजून घेणे म्हणजे maturity.
डॉ. विनया केसकर
डॉ. विनया केसकर