Friday, 8 March 2019


वैचारिक समानता.....

महिला दिनानिमित्त काही तरी लिहावं असं वाटत असतानाच एक विचार मनात आला. महिलेमध्ये पुरुषाचे काही गुण असतात, तर पुरुषांमध्ये महिलांचे. उदाहरण द्यायचं झालं तर, एकटी स्त्री अगदी पुरुषाप्रमाणे आपल्या संसाराचा डोलारा खंबीरपणे सांभाळते. तसच पुरुषांमध्ये महिलेचा भावनिक ओलावा असतोच की. ही दोन्ही उदाहरणं सार्वत्रिक नाहीत. काही वेळा असं सुद्धा बघायला मिळत.
मला नेहमी असं वाटत स्त्री आणि पुरुष असा भेद करून त्याच त्याच गोष्टी उगाळून काय मिळणार आहे? कोणीही अति केलं की त्याची माती होणार आहे. मला हे मान्य आहे की स्त्रियांवर तुलनेनी प्रमाणाबाहेर अन्याय झाला आहे, होतोय... पण हळू हळू चित्र बदलतंय. स्त्री किंवा पुरुष असा भेद न करता एक माणूस म्हणून बघायला हवं. कारण कित्येक वेळा पुरुषांमध्ये सुद्धा मातृत्वाची झलक दिसते. ज्ञानेश्वर महाराजांना आपण माउली म्हणतो. शिवाजी राजेंसारखा राजा स्त्री ला सन्मानाने वागवत होता.  राणी लक्ष्मीबाईंनी पतीच्या निधनानंतर आपल्या प्रजेचं रक्षण करण्यासाठी प्राणांच बलिदान केलं. सावित्रीबाई फुलेंनी ज्योतीबांच्या नंतर सुद्धा आपला वसा पूर्ण केला. खर तर समानता विचारांमध्ये यायला हवी. ओरबाडून हक्क मिळू शकतात. पण मनातून आदर, सन्मान असायला हवा. नुसतं gender equality हवी असं म्हणून काय होणार? आधी माणूस म्हणून एका व्यासपीठावर येण्याची दोघांचीही तयारी आहे का? याचा विचार दोघांनी करण्याची गरज आहे. कोणा एकामुळे गाडी पुढे जाणार नाही. एकमेकांना एकमेकांच्या साथीने पुढे जाण्याची इच्छा हवी. पूर्वी झालेल्या त्रासाचा वचपा काढत बसून तरी समाधान मिळणार आहे का? त्यापेक्षा पुढच्या पिढ्यांमध्ये वैचारिक समानता येऊन, एकमेकांवर असलेलं अवलंबित्व मान्य करून, पुढे जाता येईल का?   
                                                    डॉ. विनया केसकर   

Thursday, 7 March 2019


सावर रे....

कित्येकदा असं होतं की काही केल्या मनाला सांभाळणं, सावरणं जमत नाही. हे सावरणं आपण आपल करायचं असतं हे कळत असतं. स्वभान, स्वओळख झालेली so called आधुनिक स्त्री असून सुद्धा बऱ्याचदा हे जमत नाही. वास्तवाचं भान येऊनही आलेली उदासी, प्रश्न कोणी तरी सोडवावा असं उगाच वाटतं. खर तर हे सुद्धा माहिती असतं की ही उदासी आपण स्वत:च दूर करू शकतो. पण अवलंबून राहायला छान वाटत काही वेळा. इथेच खरा प्रश्न येतो. कारण एरवी आपले आपण प्रश्न हाताळणारी जेव्हा अवलंबून राहते तेव्हा साहजिक अपेक्षा वाढतात. अपेक्षा हे सगळ्या दुखा:चं मूळ आहे.
गोष्ट अगदी साधी असते. पण या अपेक्षांमुळे गुरफटून जातो आपण. काही वेळा तर नेमकं काय चुकलंय, काय बिनसलंय हेच कळत नाही. सांगता येत नाही आणि सहन होत नाही असं काहीसं. खूप वेळा वाटतं शरीराला पडलेले कष्ट परवडतात. पण मनाला झालेले कष्ट कोणत्या विश्रांतीनी दूर होतील ते समजत नाही.
संदीप खरे ची ती कविता आठवते, कशी ही अवस्था? कुणाला पुसावे? कुणी उत्तरावे? मन आतून म्हणत, सावर रे... आणि मग मनाचं ऐकून सादाला प्रतिसाद म्हणून म्हणावसं वाटतं... हो, मी च बदलू शकेन ही मनस्थिती. कारण जेव्हा हे पटत की, आत्ताच्या स्थितीला, व्यक्तीला, परिस्थितीला दोष देऊन प्रश्न सुटणार नाही. तेव्हा मनातून पुन्हा आवाज येतो... सावर रे, तुझी तूच सावर. होईल त्रास, वाढेल त्रास, पडशील, धडपडशील, पण ते असेल पुन्हा उठण्यासाठी आणि स्वत: सिद्ध होऊन आधार देण्यासाठी... कोणीतरी माझ्यातला खंबीर मी ला सावर रे हे म्हणावं यासाठी....