आपल्या अस्तित्वाचं महत्त्व...
हारणं कोणाला आवडतं? तुम्ही म्हणाल काय हा प्रश्न? जिंकायलाच आवडतं सगळ्यांना पण काल एक दुर्दैवी घटना घडली. I will win, not
immediately, but definitely असं माझी लाडकी मैत्रीण निशा कायम म्हणायची.
पण दुसऱ्यांना जिंकणं शिकवणारी निशा स्वत:च्या भावनांवर विजय मिळवू शकली नाही. निशाच्या
जाण्यानी मन सुन्न झालंय. हजारो प्रश्न मनात निर्माण करून निशा गेली. या प्रश्नांची
उत्तरं कोण देणार आता?
निशानी आत्महत्या केली या घटनेमुळे माणसाचं मानसिक आरोग्य किती महत्त्वाचं आहे
हे पुन्हा एकदा कळलं. एरवी खंबीर, निर्भीड आणि कणखर वाटणारी निशा इतका टोकाचा
निर्णय घेऊ शकते यावर विश्वास बसला नाही. निशा गेलीय, काहीही केलं आणि कितीही रडले
तरी ती परत येऊ शकणार नाही. पण अजून अशा कितीतरी "निशा" मृत्युच्या दरीत लोटल्या जाऊ नयेत
यासाठी प्रयत्न करायला हवेत. कारण अतिशय प्रगल्भ अशी निशा जर असं वागू शकते तर मनानी
कमकुवत मैत्रिणींची काळजी वाटायला लागते. अगदी स्वत:ची सुद्धा...
अशा व्यक्ती जाणं फक्त त्यांच्या कुटुंबाच्या नाही तर समाजाच्या दृष्टीनी
हानिकारक आहे. अशा घटना घडू नयेत म्हणून काय केलं पाहिजे मग? कारण निराशेचे क्षण
सगळ्यांच्या आयुष्यात येणार आहेतच. घटना, परिस्थिती किंवा आपल्या जवळची वाटणारी माणसं
आपण खोल गर्तेत जाण्याला कारणीभूत होऊ शकतात. त्यावेळी स्वत:ला महत्त्व देणं
विसरून असे प्रकार घडू शकतात. अगदी शहाणी, शिकली सवरलेली माणस असं वागू शकतात.
मनात दु:ख दाबून आनंदी राहण्याचा आभास निर्माण करणाऱ्या माणसांच्या बाबतीत अशा
घटना अनाकलनीय होऊन बसतात. त्या त्या वेळी मनानी जगणं नाकारणं हे कसं घडतं माहित
नाही. पण हा निर्णय अचानक झालेला नसतो. प्रोसेस असते ती. एखादी अशी घटना घडते आणि
मग मृत्यूच जवळचा वाटतो. खरं म्हणजे तिने लढायला हवं होतं. जीव काही इतका वर आलाय
का? या आणि अशा बऱ्याच प्रतिक्रिया अगदी बरोबरच आहेत. पण स्वत:चं जगणं
नाकारण्याइतकी निराशा किती भयंकर असेल. आपल्यानंतर आपल्यावर अवलंबून असणाऱ्या
लोकांच आपण सुरु केलेल्या कामाचं काय होईल हा विचार सुद्धा मनाला शिवत नसेल का?
हो... नसेल शिवत हा विचार. कारण मी जाण्यानी सगळे प्रश्न सुटतील असं वाटू लागत
असेल. अशा वेळी मन आणि बुद्धी असे दोन भाग न राहता, एक विचित्र गारुड मनावर राज्य
करत असेल.
पण एक नक्की, या भयानक विचारांवर मात करता आली पाहिजे. अगदी बेसिक म्हणजे आपलं
स्वत्व हरवू देता काम नये. आपल्या स्वत:पेक्षा अशी कोणतीही व्यक्ती महत्त्वाची
नसायला हवी. कारण ज्या व्यक्तीसाठी आपण स्वत:ला संपवण्याचा विचार करतो तिला खरच
काही फरक पडणार आहे का? ज्या घटनेमुळे आपण असा निर्णय घेतला त्या घटनेत आपल्या
जाण्याने आपल्याला अपेक्षित बदल घडणार आहे का? हे आणि असे अनेक प्रश्न स्वत:ला
विचारण्याचं भान कोणत्याही परिस्थितीत शाबूत राहायलाच हवं. स्वत:वर प्रेम केलं
पाहिजे आधी, तर दुसऱ्यावर प्रेम करता येईल. आत्मकेंद्री असणं आणि स्वत:वर प्रेम
करणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हं. पण बऱ्याचदा बाह्य गोष्टींना आपण इतकं
महत्त्व देतो की त्यापुढे आपलं अस्तित्व लक्षातच घेत नाही. एक मात्र प्रकर्षाने
जाणवलं, मनानी खंबीर किंवा हळव असं काहीही अशा प्रसंगात उपयोगी पडत नाही. अशा वेळी
उपयोगी पडणार आहे ते म्हणजे आपल्या अस्तित्वाचं आपल्याला उमजलेलं महत्त्व. आपलं
चांगलं किंवा वाईट दुसऱ्या कोणामुळे होत नाही. त्याला आपणच जबाबदार असतो. त्यामुळे
आयुष्याची बिघडलेली चव दुरुस्त करण्याची जबाबदारी आपली आहे. पदार्थ फेकून देणं हा
पर्याय योग्य नाही. कारण उत्तर नाही असा एकही प्रश्न या जगात नाही.
डॉ. विनया केसकर