Thursday, 22 November 2018


संपल भांडण......



सुरेश वाडकरांची एक खूप छान गझल आज ऐकली,
सीने में जलन, आँखों में तूफ़ान सा क्यों है
इस शहर में हर शख्स परेशान सा क्यों है.....
क्या कोई नयी बात नज़र आती है हममें
आईना हमें देख के हैरान सा क्यों है
मन हेलावून टाकतील असे सुन्दर शब्द आहेत हे. आपण सगळे या Phase मधून जात असतो. कधी कधी सगळं बरोबर चालू आहे असं वाटत असताना एक वेगळीच बेचैनी येते मनात. आणि जेव्हा मन बेचैन होतं तेव्हा सगळ बिघडून जात. वर वर सगळ अलबेल आहे असं वाटत असतं पण रोज एक काही तरी असं घडतं ज्यामुळे सगळं नकोसं होतं. मन पुन्हा उभारी घेतं.
आपलं आपलं असं वाटणार जर काहीच आपलं नाही, मग ते रोज नव्यानी आपलं का वाटतं? मन मोकळ करावं अशी जागा काल्पनिक असावी का? म्हणजे काय चूक आणि काय बरोबर याचं पुन्हा पुन्हा विच्छेदन होणार नाही. कारण झालेल्या चुका आपणच केलेल्या असल्या तरी सतत तुझं हे चुकलच हे ऐकायचा कंटाळा येतो. चुकल ना सांगितलं, कबूल केलं, झालेल्या चुकांची आठवण का द्यायची असते सतत? आणि बाहेरच्या लोकांकडून अपेक्षाच नाही. ज्यांना आपलं समजतो त्यांनीही समजून घेऊ नये असं का?
माझ्या सारख्या स्वभावाची माणस जितक्या लवकर अगदी क्षुल्लक कारणांनी आनंदी होतात, तितकीची फालतू कारणांनी कोशात जातात. हक्काच्या आणि आपल्या वाटणाऱ्या लोकांसोबत भांडतात, तितकच प्रेम करतात. समोरच्या माणसाला समजून घेण्याचा प्रयत्न करतात आणि अशी अपेक्षा ठेवतात की त्यांनी ही समजून घ्यावं. मग कधी तरी समजूतदारपणा हा आपला दोष ठरावा अशी तोंडावर पडतात. Extreme हा शब्द आम्हाला एकदम सूट होतो. म्हणूनच ज्यांच्यावर सर्वात जास्त जीव लावलेला असतो त्यांच्याकडून जास्त अपेक्षा ठेवतात. पण इथे प्रत्येकाला स्वत:च पडलेलं असतं. सगळ्यांना आपल्या वागण्याची Clean chit हवी असते. “मी असं बोलले किंवा बोललो पण मला असं म्हणायचं नव्हत असे dialogue ऐकवले जातात.” मग वाटत का करायचं भांडण, ते ही अशा लोकांशी ज्यांना Clean chit हवी आहे. ठीक आहे ... दिली..... नाही चुकलं तुमच काही, माझच चुकल.... संपल भांडण......

                                                                                                                           डॉ. विनया केसकर