हाय हा हळवेपणा....
परवा एक खूप छान
वाक्य ऐकलं. आपला हळवेपणा आपली ताकद बनायला हवा, कमजोरी नाही. माझ्यासारख्या
हळव्या माणसांच्या डोळ्यात अंजन घालावं असं हे वाक्य आहे. कारण बऱ्याचदा हळवी
माणसं फक्त भावनेपोटी निर्णय घेतात. मग या निर्णयामुळे नुकसान होतंय हेदेखील
लक्षात येत नाही.
संवेदनशील असणं गरजेचं
आहेच. कारण एक माणूस म्हणून जगताना संवेदनशीलता नसेल तर माणसात आणि प्राण्यात फरक तो
काय राहिला...फक्त काय होतं.. संवेदनशील माणसांना व्यवहार जमत नाही. वाहात जाणे हा
एक दुर्गुण असतो त्यांच्यामध्ये. कोणतही काम, व्यक्ती अगर विचार असो... त्यामागे
वाहात जातात अशी माणसं. वेळ पडली तर स्वत:चा सुद्धा विचार करत नाहीत. ही समर्पित
वृत्ती चांगली. पण सगळ्याच बाबतीत नाही. आपलं जगणं कठीण होऊन बसेल असं समर्पण
कदाचित अडचणीत आणू शकतं. दानदेखील सत्पात्री असावं असं म्हणतात. मग संपूर्ण आयुष्य
खर्ची घालताना विचार करायलाच हवा.
मन आणि बुद्धि या दोन्हीचा
वापर करून निर्णय घेता येणं खूप आवश्यक आहे. हे बोलणं आणि लिहिणं खूप सोप आहे. पण तसं वागणं तितकंच अवघड. मन आणि त्याची ताकद याचा अनुभव आपण पूर्णपणे घेतच नाही. आपल्याला हवं असणारं
चांगलं आणि नको असणारं वाईट. इतकी साधी व्याख्या करून चांगलं काय ते मिळवण्यासाठी
धडपड सुरु होते. काही वेळा अशा परिस्थितीमध्ये हळवी माणसं अडचणीत येतात. आणि गम्मत
म्हणजे हे जे चांगलं असं वाटत ते फक्त स्वत:साठी असतं असं नाही. naturally अपेक्षा
वाढतात. अर्थात अपेक्षाभंग होतो आणि मग दु:ख वाट्याला येत. या सगळ्यातून हळवी
माणसं खूप नाराज होतात आणि चांगुलपणावरचा विश्वास उडतो.
संवेदनशील, हळवं असणं
चांगलं. फक्त आपलं आणि आपल्यामुळे नकळत दुसऱ्याच नुकसान होत नाहीये ना याचा विचार
आवश्यक आहे.