Sunday, 1 July 2018


अवस्था मनाची....


परिस्थिती  मुळे बदलणारं मन हा नेहमीच कुतूहलाचा विषय वाटतो मला. कारण एका क्षणात 
बदलणाऱ्या या मनाला म्हणाव तरी काय? कधी कधी परिस्थितीमुळे मन अगदी बोथट होतं तर कधी कधी जास्त संवेदनशील. कधी कधी तर बोथटपणा आणि संवेदनशीलता या दोन्हीचा काहूर अनुभवतं हे बिचारं मन.
आपण जसे नाही तसे वागतो अशा परिस्थितीत. एखादी व्यक्ती, परिस्थिती, काळ तर कधी आपण स्वत:जबाबदार असतो या सगळ्याला. सगळं छान मनासारखं चालू आहे असं असलं तरी हे काहूर जाणवतचं. एकसारखे किती अनुभव घेतो आपण. तरी पुढच्या वेळी, तशाच परिस्थितीत शहाणपणा सुचत नाही. वेळ निघून जाते, सगळं अगदी normal होतं. पण मनावर राहिलेल्या खुणा बराच काळ तशाच राहतात.
आकाशात दाटलेल्या मेघांप्रमाणे या सगळ्या भावनांचा कल्लोळ. हे मेघ धड बरसत नाहीत आणि वाऱ्याने निघूनही जात नाहीत. नुसता कोंडमारा. या सगळ्यातून बाहेर पडण्याचा मार्ग ठाऊक असतानाही त्या मार्गावर जाता येत नाही. आहे त्या परिस्थितीमध्ये मन रमत नाही. रेडीओवर गाणी सुद्धा काय लागतात.... मेरा वो समान लौटा दो, यारा सिली सिली, जिंदगीमें जब तुम्हारे गम नही थे...
मनाची घालमेल गाण्यांमधून ऐकताना नकळत डोळे पाणावतात, कोणासाठी? का? कळत नाही. या काहुरामधून सुटका होईल का? असा विचार मनात येतो. पण सुटकेलाही मन घाबरते...
पण परिस्थिती तशीच राहत नाही. काहीही न करता थोडा वेळ गेला की बऱ्यापैकी छान वाटायला लागतं. गाणीही बदलतात... हर घडी बदल रही है, दिल चीज क्या है, देखलो आज हम को जीभरके... मस्त चहाच्या घोट घेत घेत आलेली मरगळ घालवून मनात हे गाण रुंजी घालत... “एकाच या जन्मी जणू, फिरुनी नवी जन्मेन मी”.....