Sunday, 15 April 2018


बाळा आम्हाला माफ कर.... 

सगळं बरं चाललय असा फील येताच मन हेलावून टाकणारं, मनस्ताप देणारं आणि हतबलतेची भावना वाढवणारं काहीतरी घडतं. आपल्या आजुबाजुला त्रासदायक असं बरच काही घडतच असतं. पण जास्त त्रास तेव्हा होतो जेव्हा एखाद्या घटनेबाबत मनस्ताप करून घेण्यापलिकडे आपण काहीच करू शकत नाही.  माणूस म्हणून लाज वाटावी आणि त्यासाठी आपण काहीच करू शकत नसावं ही हतबलता अशी भावना या क्षणी जोर धरून आहे. हो मी असिफाबद्दल बोलतीय. आत्ता हे लिहिताना सुध्दा डोळ्यात पाणी येतय. काय झालं असेल त्या पिल्लूला ते सगळं सहन करताना ? काय चुकलं होतं तिचं? आपल्या शरीराशी कोणी असं घाणेरडं काहीतरी करतय हे कळल तरी असेल का तिला? ती एवढीशी पोर काय प्रतिकार करणार अशा हीन लोकांचा. 
ती एक असहाय्य मुलगी होती म्हणून तिच्या बाबतीत असं घडलं. ज्या नराधमांनी तिच्यावर अत्याचार केला त्यांना काय सुख मिळालं असेल त्या अपरिपक्व शरीरातून? स्त्रीच्या शरीराचा भोग घेताना पुरुष म्हणून मिळणारं समाधान तर नक्कीच नाही. मग ही वृत्ती कुठून आली असेल ? एका कोवळ्या जीवाचा असा बाजार मांडताना जनाची जाऊदे मनाची लाज वाटायला हवी होती यांना. काही वेळा मुलींच्या कपड्यांवरून असं बोललं जातं की, आजकाल मुली कमी कपडे वापरतात, नको त्या फॅशन्स करतात.  मग मुलांनी - पुरूषांनी त्रास दिला की ओरडतात. पण असिफाच्या बाबतीत काय झालं होतं? हेच काय कोणतीही चूक नसताना तिच्या वाट्याला हे का आलं मग? 
असिफासाठी आता खूप मोर्चे निघतील. लोक हळहळतील. सोशल मिडियावर, पेपरमधून लेख येतील. पण असिफा तर गेली. काहीही कारण नसताना. हा सगळा प्रकार कुठे घडला यापेक्षा हे सगळं करणा-यांच्या मानसिकतेचा संताप येतोय. कारण माणसाचं मन बेडर झालं की देऊळ काय आणि घर काय . त्याला काही फरक पडत नाही. पवित्र अशा धार्मिक उत्सवात दारु पिऊन झिंगणारे आपल्यासाठी नवीन नाहीत. त्यामुळे धर्म, जात, ठिकाण या सगळ्यापेक्षा हे घाणेरडं कृत्य करणा-यांच्या हीन मानसिकतेचा राग येतोय. 
या हरामखोरांना अशी शिक्षा व्हायला हवी ही यापुढच्या काळात असा विचार मनात आला तरी हातपाय चळाचळा कापायला हवेत. काय होईल माहित नाही. काही दिवस चर्चा, वर्षभरानी काहीतरी शिक्षा. दरवर्षी याच दिवशी मोर्चा. यापलिकडे काय होणार? कधी कधी वाटतं,  हिंदी सिनेमात दाखवतात तसं सामान्य लोकांच्या ताब्यात द्या यांना. ज्या वेदना त्या छोट्या जीवानी सहन केल्या त्या या राक्षसांना सुध्दा करूदेना. ती परत येणार नाही. तिच्या आई बाबांना कितीही संताप आला तरी दडपणांमुळे ते काय करू शकतील माहिती नाही. ही अस्वस्थता मात्र त्रास देत राहील. एकच म्हणावसं वाटतं, असिफा, बाळा, अश्रू ढाऴण्यापलिकडे आणि संताप व्यक्त करण्यापिलकडे तुझ्यासाठी आम्ही काहीही करू शकत नाही. प्लीज , बाळा आम्हाला माफ कर.