Sunday, 17 December 2017


अज्ञात प्रवास...

आज खूप दिवसांनी तुमच्याशी बोलायचं ठरवलं. तस रोज काही ना काही डोक्यात, मनात चालू असतच. पण वेऴेच तंत्र जमेना राव. रोज मनात येणा-या विचारांना वाट करून देण्यासाठीच हे माध्यम निवडलं आणि त्यासाठीच वेळ मिळत नाहीये. खरचं माणसाचं आयुष्य किती चमत्कारिक असतं नाही. ज्यासाठी आटापिटा करतो, अट्टाहास करतो ते तेव्हा न मिळता, आयुष्याच्या अगदी वेगळ्या वऴणावर मिळतं. आपण आपल्या मनानी एखादी गोष्ट मिळावी असं ठरवतो. त्यासाठी प्रयत्न देखील करतो. पण बराच प्रवास केल्यानंतर हे लक्षात येतं की बहुतेक हे काही आपल्याला मिळणार नाही. ''मग कोल्ह्याला द्राक्ष आंबट'' या म्हणीप्रमाणे त्या गोष्टीचा नाद सोडून देतो. ती गोष्ट मिळावी म्हणून सुरू केलेल्या प्रवासात हव्या - नकोशा खूप गोष्टी वाट्याला येतात. पण त्या त्या वेळी मनाला समजावून सांगितलं जातं की, wait.... अच्छे दिन आने वाले है. कधी कधी हा प्रवास इतका लांबतो की मुक्कामाच्या ठिकाणाचा विसर पडतो. त्या सुंदर गोष्टीची वाट बघणं कमी कमी होतं. आहे त्या परिस्थितीत आपण किती सुखात आणि छान राहू  शकतो यावर मन विचार करू लागतं. आहे तेच सगळ आवडायला लागतं. हव्या असणा-या गोष्टीशी तुलना करून समोर येणा-या अनेक बाबी स्वीकारल्या जातात. काही वेळा जाणीवपूर्वक,  ब-याचदा नाईलाजानी. मग एकदा स्वीकारलं की ते पुढे न्यावच लागत. काहींना वाटतं , अरे तेव्हा तर आनंदानी स्वीकारलं होतं. मग आता काय झालयं ? 
पण मन ही चीज काय बनवलीय देवानी.. त्याच्या विरूध्द आपण फार काळ गोष्टी दामटवून नेऊ शकत नाही. मन आपल्याला त्याच्या मनासारख वागायला सतत प्रवृत्त करतं. समाधान हे मानण्यावर आहे. पण ते कोणाच्या मानण्यावर ? ब-याचदा दुस-यांच्या. सगळे नियम, अटी, संवेदना, भावना प्रत्येक जण स्वतःच्या मनाप्रमाणे ठरवतो. पण हे सगळं दुस-याला मान्य असेलच असं नाही. मी म्हणेन तसं.. अशी भूमिका घेणा-यांना हे नाही पटणार. समाज.. समाज म्हणून आपण ज्याचा उदो उदो करतो, तो समाजही घडी घडी बदलतो. स्वतःच्या सोयीप्रमाणे अर्थ लावतो. मग मन विचारतं... हा अधिकार मला का नाही? 
या विचार मंथनात चुकीच्या व्यक्ती, चुकीचे विचार, चुकीच्या कृती होण्याची शक्यता जास्त असते. कारण मनाचा शोध चालू असतो. त्याच्या मनासारखं मिळेपर्यंत हा शोध संपत नाही. कित्येकदा त्यासाठी पुन्हा जन्म घ्यावा लागेल की काय असही होतं. चूक, बरोबर या व्यक्तीसापेक्ष संकल्पना आहेत. हे कितीही पटलं तरी अमका चुकला किंवा त्याचा तो विचार चूक आहे असं आपण सगळे सर्रास म्हणतोच की. आपल्या वागण्यानी सो क़ॉल्ड समाजाची घडी बिघडू नये यासाठी मनाचा सुरक्षित प्रवास सुरू होतो. आपल्यासाठी समाज का समाजासाठी आपण. समाजाला रूचेल असं आयुष्य म्हणजे नक्की कोणाचं. कारण समाजानी तर देवांनाही सोडलं नाही. विचारांना वेग देत देत मनाचा प्रवास सुरूच.... 
अचानक... मुक्कामाचं ठिकाण येतं. अगदी हवं तस. मग मन सांगत, अरेच्चा हेच ते. असच तर हवं होतं. असच जगायचं होतं. चमत्कार घडावा असं होतं सगळं. सुखद अनुभूतींनी मन भारावून जातं. प्रवासात झालेल्या चुका, केलेल्या चुका, चांगल्या गोष्टी, भेटलेली माणसं, घटना सगळ आठवून केलेल्या प्रवासाची निष्फळता जाणवते. कशासाठी मांडला हा पसारा ? असं वाटू लागतं. वास्तव आणि कल्पना यांची जुगलबंदी सहन होत नाही. मिळालेल्या मुक्कामाच्या ठिकाणी मन विसावा घेत पुन्हा एकदा लढण्याचं बळ मिळवतं. सुरू होतो पुन्हा एक अज्ञात प्रवास. खूपसा हवासा.....