Wednesday, 16 August 2017


प्रेमाचा नवा अर्थ.....



आज सकाळी  आकाशवाणी पुणे केंद्रावर माझ्या आवडत्या विषयावर 'चिंतन' लागलं होतं. खरं तर चिंतनमध्ये नेहमी तत्वज्ञान, अध्यात्म या विषयांवर वैचारिक सादरीकरण असतं. अर्थात मला आवडणारा विषयही वैचारिक बैठक असणाराच आहे. पण तो चिंतनमध्ये येईल असं वाटलं नव्हतं. तो विषय म्हणजे अर्थातच प्रेम. मी खूपदा हे बघितलय जेव्हा मनामध्ये विचारांच काहूर उठलेलं असतं तेव्हा देव त्यावर उत्तर म्हणून काहीतरी पाठवतोच. आजही तेच झालं. प्रेम करणा-या माणसाला प्रेम मिळतच असं नाही. अशी लोकं खूप नशीबवान असतात, ज्यांच्या प्रेमाला प्रतिसाद मिळतो. या सगळया विचारांच्या गर्तेत असतानाच एक छान विचार मिळाला. प्रेमाच्या प्रतिसादाची अपेक्षा न करता प्रेम करता आलं तर... विचार वाटतो तितका सोपा नाही. पण अशक्य नाही. कारण कोणावरही बळजबरी करून प्रेमाला प्रतिसाद मिळवता येत नाही, मग ते नातं कोणतही असो. प्रेम मिळवणं ही प्रत्येक जीवाची गरज आहे. आपल्यावर कोणीतरी माया करतय, कोणीतरी आपली काळजी घेतय ही भावनाही जीवाला समाधान देऊन जाते. मग ते मिळवण्याचा प्रयत्न करणं ही अगदी नैसर्गिक गोष्ट आहे. पशुपक्ष्यांपासून सगळे जीव प्रेमाच्या आणि मायेच्या शोधात आहेत. फक्त प्रेमाच्याच नाही तर प्रतिसादाच्या प्रतिक्षेत आहेत. प्रतिसाद न मिळाल्यास नाराज होणं हेही स्वाभाविकच आहे. 

मग प्रेमाला प्रतिसाद न मिळाल्यास प्रेम करणं बंद करायचं का ? मुळीच नाही. अपेक्षा न ठेवता प्रेम करायचं . कारण प्रेम करणं ही आपली नैसर्गिक गरज आहे. समोरच्याला त्रास न देताही ते करता येतं. हे सगळ बोलायला खूप सोपं आहे. पण करायला तितकच अवघड. प्रेम या संकल्पनेला चौकटीत अडकवल्यानी अपेक्षित प्रतिसादाची वाट बघून आपण चूक करतो. आई मुलावर प्रेम करते तेही अपेक्षेनीच. पण मुलानी प्रतिसाद नाही दिला तरी तिचं प्रेम कमी होत नाही. अगदी अशीच भावना इतरही नात्यांमध्ये आणता आली तर. विचार करून पहा... प्रेमातून अपेक्षा वजा केली की उरतो फक्त आनंद . हा आनंद मिऴवण्यासाठी आपल्याला कोणाचीही गरज नाही. कारण बळजबरी लादून, त्रास देऊन, त्रागा करून काहीच मिळत नाही. त्यापेक्षा प्रेम करणं आणि मिळवणं ही ज्यांची गरज आहे, त्यांनी फक्त प्रेम करावं... अपेक्षा न ठेवता.