Tuesday, 7 March 2017


प्रवास समजुतीचा....



नुकतीच एक खूप छान गोष्ट ऐकली.  दोन मित्र असतात. त्यातला एक मित्र शिकारीसाठी जातो आणि तिथेच हरवतो.दुसरा मित्र त्याला शोधायला बाहेर पडतो. तिथे एक कुरूप चेटकीण असते. तिनेच त्या मित्राला डांबून ठेवलेलं असतं. ती दुस-या मित्राला म्हणते, जर तू माझ्याशी लग्न केलस तरच मी तुझ्या मित्राला सोडेन. मित्र प्रेमासाठी तो हो म्हणतो. लग्न झाल्यावर त्याला सजवलेल्या पलंगावर एका टोकावर  चेटकीण आणि एका टोकावर एक अतिशय सुंदर स्त्री दिसते.  ती चेटकीण त्याला म्हणते , तुझ्यापुढे दोन पर्याय आहेत. एक मी दिवसभर सुंदर असेन आणि रात्री कुरूप. दुसरा पर्याय मी दिवसभर कुरूप दिसेन आणि रात्री सुंदर. तुला काय आवडेल ते सांग. मित्र विचारात पडतो. काहीही निवडलं तरी नुकसान त्याचच होणार असतं. म्हणून तो म्हणतो, तुला जे हवं ते मला चालेल. माझं काही म्हणणं नाही. त्याच्या या उत्तरानी चेटकीण खुष होते आणि सुंदर स्त्री बनून त्याचं आयुष्यही सुंदर करते. गोष्टीचा मतितार्थ हा आहे की, प्रत्येक स्त्रीला तिच्या मनासारखं जगायला मिळालं तर ते हवं असतं. 
महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर  ही गोष्ट मला फारच आवडली. महिला दिन म्हणजे आमचा गौरव दिन वगैरे असला तरी तिला तिच्या मनासारखं वागण्याची संधी आजही कितपत मिळते? ही शंका आहेच. अगदी लहान सहान गोष्टीतही सगळ्यांचा विचार करण्यातच बरचस आयुष्य निघून जातं. त्यात स्त्रीला त्यागाची मूर्ती बनवून तिच्या मनासारखं वागण्याबाबत तिची गोची करून ठेवली आहे. कालांतरानी मन मारण्याची इतकी सवय होऊन जाते की, मनासारखं काही केलं तरी guilty वाटायला लागतं. परिस्थिती पूर्वी इतकी बिकट नाही. पण ग्रामीण आणि निमशहरी भागात आजही स्त्रियांना साध्या साध्या गोष्टीही मनासारख्या करता येत नाहीत. स्त्रीवाद वगैरे नाहीये माझ्या मनात कारण स्त्रीनी पुरूषावर कुरघोडी करून स्वतःला सिध्द करणे म्हणजे स्त्रीचा विकास  नाही. तर दोघांनी एकमेकांना समजून घेऊन प्रगती करणे म्हणजे विकास. कामाचं ठिकाण असो की घर, एकमेकांना साथ देणं फार महत्त्वाचं असतं. पडती बाजू कोण घेतो हे महत्त्वाचं नाही. समजून घेऊन पुढचा प्रवास करणं मह्त्त्वाचं आहे. स्त्रियांनीदेखील समानतेच्या नुसत्या गप्पा न मारता ख-या अर्थाने मुक्तपणे, आत्मनिर्भरतेनी काम करण्याची गरज आहे. स्त्री आणि पुरूष म्हणजे, प्रकृती आणि पुरूष. निसर्गानीदेखील या दोघांना समान महत्त्व दिलं आहे. मग आपण तरी भेदभाव का करायचा ? स्त्री - पुरूष भेदाच्या पलिकडे जाऊन माणूस म्हणून एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. स्त्री म्हणून तिच्याकडे असणारे plus points आणि पुरूष म्हणून असणारे plus points मिऴून एक चांगला समाज घडवण्याचा प्रयत्न करणं गरजेचं  आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने एकच सांगावसं वाटतं, उंच भरारी घेण्याच्या स्वप्नामध्ये साथ हवीय. फक्त मागे कोणीतरी आहे हा आधार हवाय. विश्वास हवाय सोबत असण्याचा. मला वाटतं ही गरज फक्त स्त्रीचीच नाही तर प्रत्येकाची आहे. स्त्री आणि पुरूष कोणीच श्रेष्ठ - कनिष्ठ असं काहीही न मानता, समजून घेऊन प्रवास केला तर अपेक्षित साध्यापर्यंत सहज पोहोचता येईल.