Thursday, 5 January 2017


मन का बोलाविते......


मन का बोलाविते पुन्हा त्या दिवसांना... काय असतं या मनाचं गणित ? जे आहे त्यात न रमता जे होऊन गेलय त्यामध्ये मन का रमतं ? सगळ्या वेदनांचं मूळ हेच आहे हे समजूनही मनाला समजावण्यात नेहमी कमी का पडतो माणूस. नेमकी विचारधारा निश्चित न झाल्यानी असेल का हे सगळं? पण होतं काय.... एका विचारावर ठाम राहून पुढे जायचं ठरवताच तो विचार, त्याचा पाया किती तकलादू आहे हे लक्षात येतं. मग पुन्हा सुरू होतो मनाचा शोध मनःशांतीसाठी. 
कोणत्याही विचारांचा प्रभाव तात्पुरता टिकणं याला आपल्याच मनाचा कमकुवतपणा म्हणावं का ? पण या जगात कायमस्वरूपी काहीच नाही म्हणे. मग अशा शाश्वत सुखाची, आनंदाची अपेक्षा करणच चूक आहे का ? सगळ छान, आनंददायी चाललेल असतानाच अचानक आपल्याच विचारांमुळे त्या आनंदावर पाणी पडतं. ही त्या त्या वेळची मनःस्थिती असते बहुतेक. मग अशा तात्पुरत्या नाराजीवर उपाय आपणच शोधावा लागतो. 
मनावर नियंत्रण ठेवावं म्हणे. कसं ठेवायचं ते नियंत्रण? कारण मनच तर पळत मनाविरूध्द. त्याचं ते पळणच गोड वाटू लागतं. पण नंतर जेव्हा दमछाक होते तेव्हा कळतं. या मनाचं न ऐकलेलचं बरं. सगळं तत्वज्ञान कोळून प्यायलेलं हे मन त्या  तत्वज्ञानाला न जुमानता आपल्या  तालावर नाचायला भाग पाडतं. खरं, शाश्वत, कायमस्वरूपी असं काहीच नाही हे समजूनही त्या शाश्वत सुखाची, प्रेमाची अपेक्षा का करतय हे मन? नेमकं काय हवय हे कळलं असत तर किती बरं झालं असतं नाही ? निदान ते मिळवण्याचा प्रयत्न तरी करता आला असता. आज हवसं वाटणारं सगळ उद्या तसं नसणार आहे. हे माहिती असूनही हवेपणा, नकोपणा का संपत नाही ? साक्षीभावानी पहायला कधी जमणारे ? पण मनाला हे माहितीय की, असं काहीतरी घडेल की आलेलं मळभ ओसरून समाधानाची बरसात नक्की होईल. कारण आपलं स्टेटस ठरलय बॉस, जगायचं तर आनंदानीच.....