Thursday, 17 November 2016


मन की बात....



माझा हा ब्लॉग म्हणजे माझ्या मनातल्या भावनांच प्रतिबिंब. तिथं डेडलाईन नाही की जिलब्या पाडणं नाही (बऴेच लिहिलेला लेख म्हणजे जिलब्या पाडणं). म्हणूनच आज तुमच्याशी काहीतरी बोलावसं वाटतय. माझ्या एका friend cum guide नी माझ्यातल्या लेखिकेला जागवलं. आत्ताच्या चाललेल्या नोटाबंदीवर तू लिहायला पाहिजेस असं सुचवलं. मग काय माझ्यातली लेखिका जागी झाली आणि मी  ब्लॉगच्या माध्यमातून तुमच्या भेटीलाआले.
नोटाबंदीच्या निर्णयावर लिहिण्याइतकं माझं ज्ञान पुरेसं आहे की  नाही हे माहिती नाही. पण हा ब्लॉग म्हणजे माझी 'मन की बात' आहे. व्हॉटस् अॅपचे सगळे विचारवंत आणि प्रसारमाध्यमं यांच्यामुळे ज्ञानात बरीच भर पडली आहे. एक व्यक्ती आणि तिनी घेतलेला निर्णय सगळ्यांना आवडेल अशी आशा करणं चुकीचं आहे. पण मला असं वाटतं आपली बुध्दी आणि अर्थात मन याला विचारून आपली मतं मांडायला हवीत. विरोध करणं तसं फारच सोपं आहे. पण मग त्यावर पर्याय सुचवता येतात का विरोध करणा-यांना? आत्ताच्या सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतलाय,  पण खरं तर तो नोटाबदलाचा निर्णय आहे. घरातलं एखादं कार्य असेल तर त्यामध्ये कितीतरी गोंधळ होतो. कितीही काटेकोर नियोजन केलं तरी ' नक्टीच्या लग्नाला सतराशे विघ्न 'असं होतच की. मग प्रचंड लोकसंख्या असलेल्या या देशाला बदलणं इतकं का सोपं आहे ? कुटुंबप्रमुखाला विरोध करत राहीलं तर ते कुटुंब संकटांचा सामना करू शकेल का ? 'wait and watch'  अशी भूमिका का घेत नाही आपण? आपल्याला जे कळलय ते दुस-यांपर्यंत पोहोचवायला हवं. नोटाबदलाच्या निर्णयात आपण काय भूमिका बजावू शकतो? याचा विचार करायला हवा. सुशिक्षितांनी फेसबुक आणि व्हॉटस् अॅप पेक्षा प्रत्यक्ष मदतीसाठी वेळ द्यायला हवा. कारण या माध्यमांचा वापर सगळेच करत असतील असं नाही. विशेषतः सुशिक्षित असूनही अशिक्षितासारखं वागणा-यांनी थोडं सबुरीनं घ्यायला हवं. ज्या लोकांमध्ये या निर्णयामुळे संभ्रम निर्माण झाला आहे त्यांना प्रत्यक्ष मदत करायला हवी.  इतका मोठा निर्णय आहे, त्याची अंमलबजावणी व्हायला काही वेळ तर द्या ना राव. 
लग्न झाल्यावर हे सगळे लोक आपलेच आहेत हे माहिती असूनही त्या मुलीला सासरच्या घरात रूऴायला काही तरी वेळ लागतो. हे तर फक्त एका व्यक्ती आणि कुटुंबापुरतं झालं. नोटाबदलण्याच्या निर्णयाबाबत सगळ्या देशासाठी एक व्यक्ती कशी पुरी पडू शकते? या निर्णयाचे सकारात्मक बदल आपण बातम्यांमधून वाचतोय. आपण निवडून दिलेल्या मतावर आपला इतकाही विश्वास नाहीये का ? म्हणजे आपला आपल्यावरच विश्वास नाही असं म्हणावं लागेल. आपल्याच नवीन घरात रहायला गेल्यानंतर सगऴं स्थिरस्थावर होईपर्यंत थोडाफार गोंधळ होतोच. पण घर आपलच असतं आणि घर बदलण्याचा निर्णयही आपलाच. मग तोच समजुतदारपणा आता दाखवुया. 
कमी पैशातही किती छान जगता येतं. लग्नकार्यासाठी कल्पकतेनी प्रेझेंटस देता येतात. एका प्लेटमध्ये पाणीपुरी खाता येते. गाडीवर न जाता मस्तपैकी चालत जाऊन एकमेकांशी  संवाद साधता येतो.  बाहेर कुठेही न जाता आपल्याच घरात खूप मजा करता येते याचा साक्षात्कार होऊ शकतो. या दोन महिन्यातच सगळं जग खरेदी करण्याचा वेडेपणा करायचाच कशाला ? श्रध्दा और सबुरी हा साईबाबांचा संदेश कोणत्याही परिस्थितीत. महत्त्वाचा ठरतो. 
संत तुकाराम महाराजांचा हा संदेश खूपच मोलाचा वाटतो. किती पैसा कमावला म्हणजे माणूस श्रीमंत 
समजावा ? नीतीधर्माचे आचरण करता यावे, मुलाबाळांचे संगोपन करता याव, आईवडिलांची काळजी करता यावी, अब्रूने जगता यावं इतका पैसा जवळ असला की तो मनुष्य श्रीमंत समजावा. मग काय आपण सगळे भारतीय आहोत ना श्रीमंत ?