Saturday, 10 September 2016

मना तुझे मनोगत मला कधी कळेल का ? .......




'कळत नकऴत' सिनेमामधलं 'मना तुझे मनोगत मला कधी कळेल का ?' हे गाणं ऐकलं आणि मीही माझ्या मनाशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मोठमोठ्या कार्यक्रमांमध्ये आता अमुक तमुक आपलं मनोगत व्यक्त करतील असं सांगितलं जातं. ते खरच मनोगत असतं का ? ब-याचदा समोरच्याला काय आवडेल हेच बोलाव लागतं. आपल्या मनातलं अगदी खरं बोलण्याची संधी किती वेळा मिळते ? खरं तर आपल्या मनासारखं वागणारी लोक भाग्यवानच म्हणायला हवी. कारण बाकीच्यांच्या मनाचा विचार करून आपल्या मनाला वळवणं हेच खूपदा वाट्याला येतं. मग ते बिचारं मन एखाद्या दिवशी बंड करून उठतं. अरे काय चाललय काय ? ऐकून घेतं म्हणून किती अति करायचं. 
लहान सहान गोष्टीतही मनाचं मनोगत न ऐकता जगरहाटीचा विचार करून मनाला समजावलं जातं. सगळे आनंदी तर आपण आनंदी ही आदर्शवादी भूमिका नक्कीच चांगली. पण या आदर्शवादाचाही कधीतरी उबग येतो. अनेक गोष्टी मनाविरूध्द करण्याची मनाला इतकी सवय लागून जाते की मनाचं मनोगत ऐकू येईनासं होतं. मग काही वेळा आतून एक प्रश्न विचारला जातो, तुला नक्की हे हवय का ? त्याचं उत्तर द्यायलाही ते तयार नसतं. कारण उत्तर नकारात्मक असेल आणि त्याचा परिणाम दुस-याच्या मनाविरूध्द होणार असेल तर... त्यापेक्षा नकोच  मनाशी संवाद. नाही तरी त्याचं मनोगत ऐकून कृती घडणारे कुठे. 
गम्मत म्हणजे आजुबाजुची माणसं सांगतात , 'ऐकावं जनाचं, करावं मनाचं '. पण खरचं मनाचं ऐकून त्या सगळ्यांशी वागायच ठरवलं तर कितीतरी लोकांना दुखवावं लागेल. कारण दुस-याकडून अपेक्षा ठेवल्याच जातात, त्या पूर्ण झाल्या नाही की मनाला त्रास होतो. अपेक्षा पूर्ण झाल्या की मन खुष होईल, पण घडी बिघडेल का ? संबंध तुटतील का? नात्यांच काय मग? अशा विचारांनी त्या मनाचं न ऐकलेलं बर असं वाटतं. काही प्रॅक्टिकली विचार करणारे लोक म्हणतात, 'मन आणि बुध्दि जे सांगेल ते ऐकावं.' पण ब-याचदा मन आणि बुध्दिची युती होतच नाही.  समाज समाज म्हणून जे म्हणलं जातं, त्यात वावरताना बुध्दिच वरचढ ठरते. मन बिचारं माघार घेतं. मनातले मांडे मनातच खावे लागतात. 
जगरहाटी वगैरे ठीक आहे. पण त्या मनाचंही ऐकलं पाहिजे थोडं. कारण जग साथ सोडून जाणार आहे. पण मन.... ते आपल्यासोबतच रहाणार शेवटच्या श्वासापर्यंत . अगदी मनातल्या साथीदारासारखं. कारण आपलं मन जपणारे आपणच. आपल्याला जपणारं आपलं मनच. बाकीचे सगळे व्यवहार. म्हणूनच आता तरी मनाचं मनोगत ऐकण्याची बुध्दि मनानी द्यावी. गा-हाणं देवापुढे मांडतात. पण तोही मनातलाच ना?