Sunday, 21 August 2016


शिक्षक म्हणजे काय असतं रे भाऊ? 






आज ब-याच महिन्यांनी मी तुम्हाला भेटतीय. आठवण रोजच येते आणि मनात विषयही  खूप असतात. पण एका वेगळ्या लिखाणात अडकल्यामुळे मनातलं शेअर करायला वेळ पुरत नाही. आज एका वेगळ्याच अपप्रवृत्तीविषयी बोलायचं आहे मला. गेली दोन वर्ष शिक्षणक्षेत्राशी थोडा जवळून परिचय आला आहे. कोणत्या वर्गाला कोणता शिक्षक क्वॉलिफाईड असतो हे या निमित्तानी कळलं. या क्षेत्राला क्वॉलिफाईड लोकांइतकीच क्वॉलिटी असणा-या लोकांची खूप जास्त गरज आहे. कारण शिक्षणानी माणूस सुसंस्कृत होतोच असं नाही. शिक्षण आवश्यक आहेच. पण शिक्षक या श्रेणीसाठी शैक्षणिक पात्रतेबरोबर मुलांना घडवण्याची तीव्र इच्छा आवश्यक आहे. एखाद्या ऑफिसमध्ये पाटी टाकणा-या कारकुनासारखं काम शिक्षकानी करता कामा नये. कारण आपल्यासमोर बसणारी सगळी मुलं उद्याचे भावी नागरिक आहेत. त्यांना घडवताना आपल्या हातून झालेली छोटीशी चूक आपल्या देशाचं , पर्यायानी आपलं नुकसानं करू शकते. 
सिनिअर कॉलेजला आलेल्या विद्यार्थ्यांचं मराठी इतकं भयंकर का असतं ? ज्या गोष्टी अगदी पायाभूत आहेत, त्या समजावून सांगण्याची वेळ का येते ? या सगळ्याला तो विद्यार्थी जबाबदार आहे का? वाचनाची आवड नसणं ही विद्यार्थ्यांची चूक आहे का ? आपल्या कामाविषयी शिक्षकांची अनास्था वाढण्याची कारणं काय आहेत ? या सगळ्याचा नीट विचार केला पाहिजे. अगदी कावळ्याच्या छत्र्यांसारखी शिक्षणसंकुलं तयार होत आहेत. धनिक, राजकारणी आपल्या नावानी या संस्था सजवत आहेत. मुलांकडून वारेमाप फीया घेतल्या जात आहेत. पण या संस्थेचा कणा असलेले शिक्षक त्यांना मात्र अगदी कमी मोबदल्यात नोकरी करावी लागत आहे. अनुदान नसलेल्या शाळा- कॉलेजची स्थिती अशीच आहे. 'गरजवंताला अक्कल नसते' या म्हणीप्रमाणे शिक्षक नोकरी करतात. पण तुझा पगार किती आणि तू बोलतोस किती ? या प्रश्नाप्रमाणे त्याचं काम असतं. काही ठिकाणी मी असं ऐकते की शिक्षक मुलांना म्हणतात, ''इतक्या पगारात एवढच शिकवता येतं.'' किती भयंकर आहे हे सगळ.
 आमच्या लहानपणी आमच्या बाई घरी बोलवून आम्हाला किती गोष्टी शिकवायच्या. नाट्यवाचन, नाट्यसंगीत, सुगम संगीत, स्नेहसंमेलन या सगळ्यामध्ये त्यांनी केलेली मदत मी आजही विसरू शकत नाही. पण हल्ली स्नेहसंमेलनात सिनेमातल्या गाण्यांवर हिडीस नाचणारी निरागस बालक  दिसतात. पालकांनाही याचा अभिमान वाटतो. स्टेजवर २०, २५ मुलं, मुली असतात. त्यात आपलं पिल्लू त्यांना दिसतं  का तरी ? ज्या शब्दांचा अर्थही कळत नाही अशा शब्दांवर ही मुलं हावभाव करतात. या सगळ्यामध्ये चूक त्या मुलांची आहे  का ? 
पैसे भरून नोक-या मिळवण्याचं लोण शिक्षणसंस्थांमध्ये आल्यानी सगळा बट्याबोळ झालाय. ज्याच्याकडे  डिगरी आणि पैसा तो परमनंट. ज्याच्याकडे डिगरी आहे, शिकवण्याची तळमळ आहे पण पैसा नाही त्यांनी कायम संघर्ष करायचा. हे सगळं कुठेतरी थांबल पाहिजे. कारण या कारणांमुळे या क्षेत्राकडे बुध्दिजीवी लोक यायला तयार होत नाहीत. आत्ता परिस्थिती निदान हातात आहे. हे असच चालू राहीलं तर मुळात ढासळलेली आपली शिक्षणव्यवस्था कोलमडायला वेळ लागणार नाही. सगळीकडे हे प्रकार चालतात असा माझा दावा नाही. पण  ८० टक्के हे प्रकार चालू आहेत. मग उरलेल्या २० टक्यांचा प्रभाव किती पडेल ? 
आत्ताच्या काळाशी सुसंगत ज्ञान आपल्या विद्यार्थ्यांना दिलं पाहिजे. आता या नात्यात खूपच मोकळेपणा आलाय. तो खरच स्वागतार्ह आहे. अगदी व्हॉटसअॅप वर शिक्षक आणि विद्यार्थी चॉटिंग सुध्दा करतात. पण या मोकळेपणाचा स्वैराचार न होता त्याचा चांगला उपयोग करून घ्यायला हवा. गुरू शिष्याच्या या पवित्र नात्याचा मान राखला पाहिजे. गरज आहे मानसिकतेतल्या बदलाची. शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि हो संस्थाचालकांची सुध्दा.