बरस आता तू....
खरं म्हणजे या दिवसांमध्ये एव्हाना मी तुझ्यावर तीन चार लेख लिहीले असते. पण तू अजून आलाच नाहीस. तुझ्या येण्याचा गंध , तुझा शिडकावा तनमनाला फुलवणारा... का असा अंत बघतोयस ? मला मान्य आहे आम्ही सगऴ्यांनीच खुप चुका केल्यात त्याची इतकी मोठी शिक्षा नको देऊस. आता तर म्हणे तुझं येणं लांबलय. हवामान खात्यावर विश्वास ठेवावा असं त्यांच भाकित नसतच. पण तू माझा विश्वास गमवू नकोस प्लीज. गेली दोन वर्ष खरचं खूप वाईट गेलीत. पण या वर्षी नाही.
सगळीकडे कोरडं, उदास वाटतय. तू आल्याचा सारखा भास होतोय. समोरच्या घरावरचे पत्रे चिंब भिजलेत की काय असं रोज सकाळी खिडकी उघडल्यावर वाटतय. सगळे डोंगर भकास, कोरडे, पिवळे पडलेत. या सगळ्यामध्ये आणि माझ्या मनामध्ये चैतन्य फुलवण्यासाठी तुला यावच लागेल. तू आल्यानंतर नाकं मुरडणा-यांकडे तू वक्ष देऊ नकोस. तुझी किंमत आता सगळ्यांनाच कळलीय. मला तर तू कधीही आलास तरी आवडतोस. वेळ अवेळ हे आपल्या नात्यातलं गणित नाहीच, नाही का?
मुक्त मनाने तू केलेली उधळण कशी विसरता येईल. संथ लयीत तुझं येणं, त्यानंतरचा तुझा आवेग, बरसून चिंब करण्याचं तुझं कसब, कधी कधी आता पुरे हं असं म्हणायला लावणारा तुझा खोडकरपणा, तुझ्या येण्यानी नव्याने काहीतरी करण्यासाठी मिळणारी उर्मी... ओ हो.... खरचं मी तुला खूप मिस करतीय. बहुतेक तुलाही हे कळत असेल, पण प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते ती वेळ आल्याशिवाय काही होत नाही. पण मला काय वाटतं... आता ती वेळ आलीय. सगळीकडे बरसून, सगळ्यांना तृप्त करून टाक. तू येणार म्हणून किती छान छान गाणी ऐकली पण नाहीत अजून. कांदा भजी नाही, आल्याचा चहा नाही, मक्याचं कणीस नाही. बोअर झालयं खूप. तुझं येणं सगळ्याच दृष्टीनी खूप आवश्यक आहे. वर्षभराचा ओलावा या तीन - चार महिन्यात द्यायचाय तुला. आत्ता उषीर करतोस, मग नको त्या वेळी येऊन सगळा घोळ करतोस. मग सगळे तुला नाव ठेवतात. मला नाही आवडत ते. तुझी काय चूक ? चुका बाकीचे करतातआणि बोल मात्र तुला. आता हे काही नकोच. ठरलं तर.... येतोयस ना ?