Wednesday, 20 April 2016


कैरीची फोड, लागते गोड..............




हिरवीगार, आंबट, तिखट - मीठ लावलेली मस्त कैरीची फोड. आहाहा... नुसतं म्हणलं तरी तोंडाला पाणी सुटतं. बाजारातून विकत आणून कैरी खाणं हे म्हणजे सणावारी केळ्याची शिकरण खाण्यासारखं वाटतं. कैरी ही काय विकत आणून खायची गोष्ट आहे का ? त्यात माझ्यासारख्या ग्रामीण भागात राहीलेल्यांसाठी तर हास्यास्पदच वाटतं. म्हणजे आमच्या भोरला एस. टी स्टॅंडवर उतरून रिक्षेनी जाणं जितक गमतीदार तितकंच कैरी विकत आणून खाणं. आमच्या गावात रीक्षानी वगैरे फिरायचे लाड नव्हते बरं का. भोरमधले कोणीच रीक्षानी गावात फिरायचे नाही. एस. टी. तून उतरलं की पायी पायी घरी जायचं. आता मात्र परिस्थिती बदललीय. पण आजही मला भोरला उतरून रीक्षा करणं मजेशीरच वाटतं. या भोरमध्येच या दिवसात चोरून  कै-या खाणं हा आमचा आवडीचा छंद असायचा.
हे सगळ मला एकदम आठवलं याच कारण आमच्या समोरच्या एका आज्जींनी मला हाक मारून चक्क चार  कै-या तोडून दिल्या. वर म्हणाल्या, ''तुला हवं तेव्हा कै-या घेऊन जात जा.'' मी मनात म्हणलं साला हे काय जिणं झालं. कै-या अशा सहजतेनी मिळाल्या तर त्याची काय गोडी? झाडाच्या मालकीणीचं लक्ष नसताना हळूच दुपारच्या झोपेच्या वेळी मस्तपैकी कै-या चोरून, घरात आईच्या नकळत तिखट- मीठ- मसाला चोरून , कै-या पाण्यानी न धुता तशाच फोडून खाण्यात कसलं सॉलिड थ्रिल होतं. 

मी आणि माझा भाऊ तर फारच धमाल करायचो. शेजारच्यांच्या झाडाच्या कै-या चौरून आणण्यासाठी आम्ही एक स्पेशल आकडी बनवली होती. किती हे कष्ट....  या बाबतीत देव अगदी आमच्या बाजूनी होता.   झाडं    दुस-याचं पण कै-या मिळायच्या आम्हाला. ते गाणं नाही का, ''बहरला पारिजात दारी, फुले का पडती शेजारी?'' तसच काहीसं.  झाड पूर्णपणे आमच्या घराच्या पत्र्यावर झुकलेलं असायचं. त्यामुळे शेजारच्या आजी झोपी गेल्या की आमचे उपद्व्याप सुरू. चुकून कधी त्यांना आवाजानी जाग आली की मग आम्ही मेलोच. त्यात हा सगळा प्रकार आईला कळला की तिच्याकडून मिळणारे धपाटे वेगळेच. पण हे सगळे कष्ट करून जेव्हा फळ (कैरी)मिळायचं तेव्हा तो थकवा अगदी कुठच्या कुठे पळून जायचा. 
शत्रू जितका बलाढ्य तितकं युध्द आणखीन मजेशीर होतं. आमच्या बाबतीत तसच व्हायचं. कैरी काढून आमच्या झोळीत पडताना चुकून त्यांच्या अंगणात पडली आणि आजी आल्या की आम्ही अगदी निरागसतेचा आव आणून त्यांच्याकडे बघायचो. एक कैरी त्यांच्या अंगणात आणि एक आमच्या पत्र्यावर अशा परिस्थितीत त्यांनी पकडलं तर अगदी प्रामाणिकपणे आमची कैरी त्यांच्याकडे टाकायचो. तो प्रामाणिकपणा इतका टोकाचा होता की, ती कैरी बरोबर त्यांच्या गटारीत कशी पडेल अशी फेकायचो. शत्रू बलाढ्य असल्यानी तोही हार मानायचा नाही. ती गटारात पडलेली कैरी सुध्दा त्या आजी उचलून घ्यायच्या. दिवसा हा सगळा प्रकार जरा अवघड वाटू लागला मग आम्ही रात्री कैरीची शिकार करायला बसायचो. आईचा डोळा चुकवून करावी लागणारी ही शिकार आजही उत्साह निर्माण करते. आमचा बलाढ्य शत्रू आज नाही, त्यामुळे अजिबात न घाबरता सगळं वर्णन केलं हा. तसंही आम्ही काय त्यांना घाबरायचो नाही म्हणा, वयाचा मान ठेवून वागायचो झालं. 

आमची पिढी खरच खूप नशीबवान आहे. या अशा थ्रिलिंगच्या गोष्टी आम्ही खूप अनुभवल्या. आत्ताच्या मुलांना यातली गंमत कशी कळणार ? कॅंडी क्रशच्या लेव्हल वाढवणं हेच आत्ताच्या पिढीचं थ्रिल....