आई होण्याआधी, झाल्यावरही...
एक सिरिअल म्हणून व्हॉट्सअॅप वर सगळीकडेच खुप टिंगल केली गेली अशी सिरिअल म्हणजे होणार सून मी.... याविषयी अनेकांची वेगवेगळी मतं असतील. काहींना ती सिरिअल, त्यामधली पात्रं खूप आवडतही असतील. माझ्या आजच्या ब्लॉगचा विषय तो नाही. पण परवाच्या एपिसोडमध्ये एक कमाल सीन दाखवला. खरच कमाल. आपली बायको आपल्या बाळाला जन्म देत असताना वेदना होणारा नवरा सिरिअलमध्ये दिसला. खुप बरं वाटलं.
हे एक निमित्त झालं . पण त्या निमित्तानी डोक्यात विचार सुरू झाले. बाळ हे दोघांच असतं . पण निसर्गनियमानुसार भोगावं लागतं आईला. अर्थात हे भोग ती आनंदाने भोगते. हे भोग आहेत, दुःख आहे असं तिला कधी वाटतच नाही. आपल्या जीवातून दुसरा जीव जन्माला घालणं ही अदभुत गोष्ट आहे. हे वरदान फक्त स्त्रियांनाच मिळालं आहे. त्यासाठी परमेश्वराचे आभार मानावेत तेवढे थोडे आहेत.
मुलाची चाहुल लागल्यापासून त्याला जन्म देईपर्यंत आई कितीतरी दिव्यं पार करत असते. तिचं आयुष्यच बदलून जातं. स्वतःसाठी काहीतरी करणारी ती आपल्या पिलासाठी जगू लागते. आई कितीही आधुनिक विचारांची असली तरी आपल्या होणा-या मुलाबाबत ती तितकीच सेंटी असते, किंबहुना तिने असलं पाहिजे. शिक्षण, नोकरी या धबडग्यात लग्न, संसार, मुलं होणं या आनंदापासून आपण वंचित रहात नाही आहोत ना ? याचा विचार आत्ताच्या पिढीनी करायला हवा. या संदर्भातले सगळे प्रॉब्लेम्स योग्य वेळी, योग्य गोष्टी न केल्यानी होतायत असा निष्कर्ष पुढे येतोय. नोकरी आणि करिअर हे महत्त्वाचं आहेच. पण आई होण्याचा आनंद त्यापेक्षा कितीतरी मोलाचा आहे. स्वतःपुरतच जगण्यात काय अर्थ? समाजाला एक आदर्श, सुजाण, सुशिक्षित नागरिक देणं हीसुध्दा आपली जबाबदारी आहे. विशेषतः बुध्दिजीवी पिढीची नितांत गरज आहे. त्यामुळेच दात आहेत तिथे चणे नाहीत , चणे आहेत तिथे दात नाहीत अशी अवस्था झालीय.
एकीकडे हा प्रश्न आहे, तर दुसरीकडे कमी होत चाललेली आपुलकी. मुलं जर दोघांच आहे, किंबहुना सगळ्या घराचं आहे तर त्या आईची काळजीदेखील सगळ्यांनी घेतली पाहिजे. विशेषतः तिच्या जोडीदारानी. या दिवसांमध्ये होणारी भावनिक आंदोलनं, चिडचिड, वेदना, अवघडलेपणा समजुन घेतला पाहिजे. ही वेदना शेअर करता येत नाही. पण मी तुझ्यासोबत आहे असा आधार तरी देता आला पाहिजे. कारण या वेदना फक्त ती आईच जाणू शकते. भक्कम मानसिक आधारानी ती ही वेदना सहन करते. सिरिअलमध्ये दाखवलेला श्री फारच अति आदर्श वागतो. पण आपल्या बायकोच्या बाळंतपणात तिची वेदना शेअर करणं अति वाटत नाही. किंबहुना ते आवश्यक वाटतं. खात्या, पित्या घरच्या गरोदर स्त्रियांचे लाड होत असतीलही. पण आजही मोलमजुरी करून बाळाला जन्म देणा-या कुपोषित माता आहेतच. आजही मुलीची गर्भ असेल तर गर्भपात करून घे असं म्हणणारे बाप आहेतच की. त्यांच्या नशीबात दोन वेळचं अन्न सुध्दा नाही, तर प्रेमळ आणि इतकी काळजी घेणारा नवरा शक्यच नाही. स्त्रिच्या या नव्या पर्वाच्या सुरूवातीला त्यानी तिच्याजवळ असणं must आहे. तिला होणारा त्रास त्याला समजणं गरजेचं आहे. निरोगी बाळाला जन्म देण्यासाठी पोषक आहाराची जितकी गरज आहे तितकीच पोषक मानसिकतेची सुध्दा आहेच. तिच्या मनाला होणारा आनंद होणा-या बाळाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचा आहे.
ही फेज अजून ज्यांच्या आयुष्यात यायची आहे त्यांनी याचा विचार करावा. ज्यांच्या आयुष्यात ही फेज येऊन गेलीय, त्यांनी आपल्या बाळाच्या आईची काळजी घ्यायला हवी. निदान उरलेल्या आयुष्यात तरी पोषक मानसिकता जपण्याचा प्रयत्न करायला हवा. तरच आत्ताची पिढी अधिक संवेदनशील, सजग आणि सुजाण होईल.