अतूट नातं......
खूप दिवस झालेत तुमच्याशी बोलून. रोज शेअर करावं असं काही ना काही असतच. पण गेल्या काही दिवसात नाही जमलं. खुप व्यस्त वगैरे नव्हते. पण तरी नाही वाटलं लिहावं असं . तुमच्या माझ्यामधला अतूट धागा हा ब्लॉग आहे याची मला जाणीव आहे. त्यामुळेच कदाचित मी न बोलताही आपल्यातली कनेक्टिव्हीटी तशीच होती. जशी माझ्या आणि त्याच्यामधली.... ओळखलं असेलच तो कोण ते . बरोबर... पाऊस. आज मला हवा तसा तो आला. अगदी अचानक. कोणत्याही अटीशिवाय , कोणत्याही हानिशिवाय. फक्त आनंद देण्यासाठी.
रोजच्या आयुष्यातही हल्ली, उगाच आनंद देण्याचं प्रमाण खूपच कमी झालय. मध्यंतरी तो असा काही रूसला होता की विचारू नका. असं वाटलं , आता येतोय की नाही. खरं तर त्याला रुसण्याचा पूर्ण हक्क आहे. काय विचित्र वागलोय आपण सगळेच. तो मात्र मला हवा तसा. समोरचा कसाही वागला तरी आपण आपल्याला जे योग्य वाटेल तसच वागावं असं सांगणारा. कोणताही राग मनात न ठेवता तो आज बरसला. मनाची काहिली दूर केली. स्वच्छ आणि मोकळा झाला बरसून, अगदी मला हवा तसा.
अचानक एखादी मनासारखी गोष्ट घडावी तसा आला तो. अगदी दुपारपर्यंत येण्याची चाहूलही न देता मस्त बरसला, मला हवा तसा. अनेकांची धांदल उडवणारा खोडकर, धरणीला तृप्त करणारा मेघदूत, मरगळ घालवणारा आनंददायी अशी किती नावं देऊ त्याला. माझ्या मनात तर तो कायमच भरून असतो. मनाविरूध्द काहीही घडलं की मग त्याला हक्कानी बोलवते. मनात बरसून तो माझं बिनसलेलं पार घालवून टाकतो. बाहेर कितीही वादळं असली तरी मनातला हा पाऊस कुठल्यातरी कोप-यात असाच ठेवायला हवा. कारण बाहेरचं कोणीच मनातली वादऴं, अप्रिय, राग येईल असं दूर करू शकत नाही. बरोबर ना ? कारण प्रत्येक नात्याला लिमिटेशन्स आहेत. कितीही आणि काहीही वाटलं तरी दुस-यासाठी फार काही करता येत नाही आणि कोणी आपल्यासाठी काही करू शकत नाही. या सत्याचा सामना झाला की मनातला पाऊस मस्त बरसतो. आपल्याला हवा तसा. कधी रिमझिम, कधी कोसळणारा, कधी सगळ वाहून नेणारा..... जसा आज तो आला, अगदी मला हवा तसा.