Be Natural......
परवा एक वेगळा विचार ऐकला. खरं म्हणजे आपण सगळेच हा विचार नेहमी अनुभवतो. पण दुसरं कोणीतरी म्हणलं की अंतर्मुख होऊन विचार करायला लागतो. ''निसर्ग आपल्याला आवडतो, पण आपण नैसर्गिक वागत नाही. '' हाच तो विचार. किती खरं आहे ना हे. निसर्गरम्य ठिकाणी गेल्यावर मन शांत होतं. कसले मुखवटे, कसलाही खोटेपणा नसलेलं एक जग अनुभवायला मिळतं. निसर्गातल्या कितीतरी गोष्टी आपल्याला भुरळ घालतातच , पण जगायलाही शिकवतात. तत्वज्ञान न कळणा-या तुमच्या माझ्या सारख्या... मी माझ्याच म्हणायला हवं. कारण तुम्हाला सामान्य म्हणायचं धाडस होत नाहीये. पण निसर्गाबद्दल बोलताना तरी मनमोकळं बोलावं , नाही का ? म्हणून जे मनात आलं ते बोलले. तर मुळ मुद्दा असा की, तत्वज्ञान न कळणा-यांनी निसर्गाला गुरू करावं. बरेचसे प्रश्न चुटकीसरशी सुटतील.
बघा ना.. निसर्गात झाडावरून गळणारं पान कधीतरी रडताना पाहिलय का ? त्याचं हिरवेपण संपल्यावर ते झाडापासून अलगद , तक्रार न करता वेगळं होतं. पुन्हा मातीत मिसळून त्याच झाडावर पुन्हा उगवण्यासाठी. ते झाडही कधी पान गळून पडल्याचा शोक करत बसत नाही. कारण झाडावरल्या उरलेल्या पानांना त्याला जोपासायच असतं. आपण मात्र आपल्याला सोडून गेलेल्या माणसांबद्दल किती दुःख करत बसतो. कित्येक वर्ष हे दुः ख उगाळत बसतो. निसर्गासारखं वागता आलं पाहिजे. म्हणजे जवळच्या माणसांचा दुरावा त्रास देणारच. पण आत्मक्लेष करून न घेणं , हे तरी केलच पाहिजे.
कित्येक वेळा लावलेलं रोप काळजी घेऊनही उगवत नाही. पण मातीत मिसळणारं ते रोप तक्रार करत नाही. आपण मात्र मी एवढी मेहेनत करूनही यश मिळालं नाही म्हणून नाराज होतो. मातीत मिसळून पुन्हा उगवण्याची जिद्द निसर्गाकडून घ्यायलाच हवी.
निसर्गातला कोणताही अविष्कार डोळ्यांना हवाहवासा वाटतो. त्याचं भरभरून कौतुक करताना आपल्याला संकोच वाटत नाही. किती सहजपणे आपण निसर्गावरच प्रेम व्यक्त करतो. पण हेच सगळं आपल्या माणसांच्या जगात अलाऊड नाही. कोणी छान दिसतं असेल तर त्याचं कौतुक करणं यात काय वाईट आहे ? ते नैसर्गिकच आहे. अर्थात मनातली शुध्द भावना तितकीच महत्त्वाची. म्हणजे एखाद्या फुलपाखराकडे बघताना जितकी निरागसता मनात असते, तितकीच असली पाहिजे. काही व्यक्ती मनापासून आवडतात. ते नैसर्गिक रीतीने सांगितलं तर भलताच गैरसमज होऊन नाती तुटतात. असं होता कामा नये. आवडणं ही नैसर्गिक भावना आहे. ओरबाडणं हे अनैसर्गिक.
अंधाराकडून उजेड आणि उजेडाकडून अंधार हा निसर्गाचा नियम आहे. त्याप्रमाणे आयुष्यातही सुख, दुःख येणारच. कोणत्याही परिस्थितीत आपलं मानसिक संतुलन ढळू न देता आनंदात राहीलं पाहिजे. हे सगळ बोलणं कितीही सोप्प असलं तरी तसं वागणं अवघड आहे. पण निसर्ग आवडतो असं म्हणणा-या प्रत्येकानी असं वागण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. हिरवी झाडं, खळाळून वाहणारी नदी, थंडगार वारा, पाऊस, कोसळणारे धबधबे, रंगीबेरंगी फुलपाखरं, प्राणी - पक्षी , दरी - डोंगर असा निसर्ग न आवडणारा एक तरी माणूस असेल का ? अर्थातच नाही. त्यामुळेच निसर्ग आवडतो असं नुसतं न म्हणता त्याच्यासारख वागता आलं पाहिजे.