Monday, 27 April 2015


संवाद मनाशी.....




मित्र. मैत्रिणींनो मी तुम्हाला ब-याच दिवसांनी भेटतीय. खरं तर मी खुप मिस केलं तुम्हाला.  मला माहितीय तुम्ही सुध्दा माझ्या लेखाची वाट पहात होतात. कारण आपल्यामधल्या संवादाचं हे एकच महत्त्वाचं माध्यम आहे. पण या ब्ल़ॉगवर काहीही लिहिताना एक मनाशी नक्की केलयं. मारून मुटकून काहीही लिहायचं नाही. अगदी मनाला वाटेल ते, मनात येईल ते आणि मनाला भावेल तेच लिहायचं. गेल्या काही दिवसांत मनात काही आलच नाही असं नाही. पण का कोणास ठाऊक खूप शांत रहावसं वाटलं. मध्येच एकदा एक लेख लिहायला घेतला पण तो मनाला भावला नाही. मी तुमच्याशी यापूर्वी सुध्दा शेअर केलय की  मन, प्रेम आणि पाऊस  हे माझे आवडते विषय आहेत. त्यातल्या '' मन '' या एका विषयावर गेल्या काही दिवसांमध्ये खुप काही ऐकलं , अनुभवलं. 
आपल्या आयुष्यातली सुख, दुःख  तीव्र किंवा सौम्य प्रमाणात जाणवणं हे आपल्या मनावर अवलंबुन आहे. . एखादी किरकोळ गोष्ट मनाला लागून गेली की त्याचे परिणाम आत आणि बाहेर दिसतात. काही वेळा अगदी मोठ्ठ संकटदेखील आपल्या मनाच्या कणखरपणामुळे अणू, रेणूसारखं भासतं. त्यावेळी आश्चर्य वाटतं. अरे हे सगळं आपण कसं सहन केलं. तेच आपलं मन एखादा छोटासा अपमान सहन करू शकत नाही. काय आहे हा सगळा प्रकार? मनाच्या लहरीपणामुळे आपण वहावत जातो. कित्येकदा चुकीचे वागतो, समोरच्याला दुखावतो, स्वतः दुखावले जातो, काही वेळा खुप काही गमावतो, काही वेळा खुप काही मिळवतो. आपल्या आयुष्यातल्या ब-याचशा गोष्टी आपल्या मनाच्या सांगण्यानुसार आपण करतो. मग या मनालाच जिंकता आलं तर....
बहिणाबाई चौधरींनी केलेलं मनाचं वर्णन अनुभवानंतर पटतं. ''मन लहरी लहरी त्याचं न्यारं रे तंतर, आता व्हतं भुईवर गेलं गेलं आभायात.. ''मनातल्या विचारांचा विचार करता येत नाही हो. भयानक उड्या मारायला लावत ते आपल्याला. त्याचा गुणधर्म बदलणं इतकं सोप्प नाही. आपण मनाचं ऐकतो. पण आपल्या मनाला गुलाम बनवणं कठीण आहे.  आपलं बोलणं, वागणं, आपल्या महत्वाकांक्षा, नातेसंबंध जपणं, आपलं समाधान, असमाधान, काम करण्यासाठी मिळणारी उर्जा, आपल्याला होणारे आजार, मनात येणारे विकार हे सगळ या अदृश्य अशा मनावर अवलंबून आहे. आपल्याच मनाचा आणि संवेदनांचा आपण विचारच करत नाही. सगळ फार वरवर विचार करून सोडून देतो. कित्येकदा आपण कृती करतो, बोलतो आणि म्हणतो माझ्या हे मनात नव्हतं. पण असं नसतं. आपले विचार, आचरण, कृती हे सगळं मनावरच अवलंबून असतं. म्हणूनच मन शांत, स्वच्छ, एकाग्र करता यायला हवं. अनित्य अशा सुख दुःखांचा आपल्या मनावर परिणाम होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. आपल्या मनासारखं झालं म्हणजे सुख आणि मनाविरूध्द झालं म्हणजे दुःख. बरं ही परिस्थिती कधीच कायम टिकत नाही. हे सगळं कळत असतानाही आपण किती आत्मक्लेष करून घेतो. या सगळ्यात वर्तमान बिघडवून घेतो. काय चूक काय बरोबर हे आपलं मन आपल्याला सांगत असतं. त्याची हाक ऐकणं गरजेचं आहे. बाहेर सगळ्यांशी संवाद साधता साधता आपल्याच मनाशी संवाद साधणं बंद होतं. तो संवाद साधला पाहिजे. मनाला सतत वर्तमानात जगायला शिकवता आलं पाहिजे. तरच आनंदी रहाण्याची इच्छा पूर्ण होईल. नाहीतर जे नाही त्याचा शोक करण्यात आयुष्य कधी संपेल कळणारच नाही.